सांगोला तालुका धुक्याने व्यापला
तब्बल 3 तास धुक्याचे साम्राज्य; पिकांचे नुकसान
पहाटेपासूनच थंडीत कमालीची वाढ झालेली होती. त्यातच संपुर्ण परिसर धुक्याच्या दाट चादरीत हरवून गेला होता. काही फुट अंतरावरील दिसणं सुध्दा अवघड झालं होतं. त्यातच थंडगार हवेसोबत थंडीच्या लाटावर लाटा येत होत्या. त्यामुळे थंडीची तीव्रता कमालीची वाढली होती.
सांगोला/ नाना हालंगडे
वर्षाचा शेवटचा दिवसही सांगोला तालुकावासियांना दाट धुक्यामुळे नुकसानग्रस्त असाच ठरला. अगदी 10 फुटापर्यंतचे दिसत नव्हते, यामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान पहावयास मिळणार आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे हे सारे चित्र बदलले असून, गेली वर्षभरापासून बळीराजा हे सोसत आहे.
आज शुक्रवार 31 डिसेंबर 2021 वर्षाचा शेवटचा दिवस. सकाळी सकाळी रामप्रहरी 6 वाजले पासून संपूर्ण सांगोला तालुक्यावर दाट धुक्याने हाहाकार माजविला. अगदी 1o फुटापर्यंत ही दिसत नव्हते.सध्या रब्बी हंगामातील ज्वारी,मका,गहू,हरभरा व अन्य पिके डौलदार आली आहेत. अगोदरच अवकाळीने ही पिके वाया गेली आहेत. जी आहेत ती ही पिके वाया गेल्यात जमा आहेत.
पहाटेपासूनच तालुक्यातील बहुतांशी परिसर धुक्याच्या चादरीत हरवून गेला. तर थंडीच्या लाटेने सर्वांना हुडहुडी भरली. वातावरण आल्हादायक असले तरी पिकांवर होणारा विपरित परिणामामुळे शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
सध्या वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहाटे पासून सकाळ पर्यंत हुडहुडी भरवणारी थंडी असते. तर त्यानंतर उन्हाचा तडाखा सुरु होतो. सायंकाळच्या सुमारास ढग दाटून येतात. मोठ्या प्रमाणात दव पडते. अधूनमधून धुक्याची गडद चादर सर्व व्यापून टाकते.
पहाटेपासूनच थंडीत कमालीची वाढ झालेली होती. त्यातच संपुर्ण परिसर धुक्याच्या दाट चादरीत हरवून गेला होता. काही फुट अंतरावरील दिसणं सुध्दा अवघड झालं होतं. त्यातच थंडगार हवेसोबत थंडीच्या लाटावर लाटा येत होत्या. त्यामुळे थंडीची तीव्रता कमालीची वाढली होती. सकाळच्या वेळी नित्यनियमाची शेती वा जनावरांची करावयाची कामे करण्यासाठी सुध्दा बाहेर पडण्यासाठी शेतकरी अनुत्सुक दिसत होते. अशा वातावरणातही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मात्र लगबग सुरु होती. वाहने मात्र लाईट लावूनच ये-जा करताना दिसत होती.
परिसरात सकाळी धुके पडत आहे. वातावरणातील या बदलामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
धुके कसे तयार होते?
हवेतील सापेक्ष आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास मोठ्यातल्या मोठ्या व जास्तीत जास्त क्रियाशील असलेल्या कणांवर जलबाष्पाचे संद्रवण होण्यास सुरूवात होते. अशा हवेचे तापमान कमी झाल्यास तिची सापेक्ष आर्द्रता व धूसरताही वाढते आणि त्या क्षेत्रावर करड्या रंगाची झाकळ निर्माण होते. हवा ह्यापेक्षा अधिक थंड झाल्यास व सापेक्ष आर्द्रता ९५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास झाकळीचे धुक्यात रूपांतर होऊ लागते. या वेळी दृश्यमानता १,००० मी. पेक्षाही कमी असते. धुक्यात सापेक्ष आर्द्रता १००% असलीच पाहिजे असे नाही.
मात्र साधारणपणे ती ९५ टक्क्यापेक्षा अधिक असते म्हणजे हवा जवळजवळ संतृप्त अवस्थेत असते. शहरांवरील प्रदूषित हवेत धुक्याचा प्रादुर्भाव होतो तेव्हा अंधुकता, धूसरता, झाकळ आणि धुके असा अनुक्रम आढळतो. झाकळीचे धुक्यात होणारे रूपांतर हे अंशतः संद्रवित कणांचे आकारमान वाढल्यामुळे व बव्हंशी कणांची संख्या वाढल्यामुळे होते. हवेतील सापेक्ष आर्द्रता ७०% होताच लवणकण चिघळतात व त्यामुळे सापेक्ष आर्द्रता ७५% ते ९५% असतानासुद्धा समुद्रावर धुके पडलेले असते.