सांगोला गटविकास अधिकाऱ्यांचा मेडशिंगी शाळेला दणका
हजेरी पुस्तकावर जातीचा उल्लेख करणे भोवले, बजावली कारणे दाखवा नोटीस
सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील मेंडशिंगी येथील जि.प.प्रा.शाळेतील विद्यार्थ्यांच्या हजेरी पुस्तकावर जातीचा उल्लेख करुन जात निहाय वर्गवारी केल्याचे सांगोल्याचे गट विकास अधिकारी आनंद लोकरे यांना आज या शाळेच्या भेटी दरम्यान आढळून आले आहे.त्यामुळे या शाळेचे मुख्याध्यापक यांना गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत येत्या दोन दिवसात खुलासा सादर करण्याची सुचना शेरे बुकमध्ये केल्याने तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सांगोला पंचायत समितीचे नुकतेच हजर झालेले गट विकास अधिकारी आनंद लोकरे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत , शाळा , अंगणवाडीस भेट देण्यास सुरुवात केली आहे.आज बुधवार ६ अॉक्टोबर रोजी त्यांनी मेंडशिंगी येथील जि.प.प्रा.शाळेस भेट दिली.
त्यावेळी त्यांना या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हजेरी पुस्तकावर जातीचा उल्लेख करुन जात निहाय वर्गवारी केल्याचे आढळून आले आहे.सदरची नोंद कोणाच्या निर्देशानुसार केली आहे याबाबतचा खुलासा या शाळेचे मुख्याध्यापक यांना गट विकास अधिकारी यांचे मार्फत करावी.तसेच दर्शक फलकावर देखील विद्यार्थी व शिक्षक यांचे जातीचा उल्लेख व शाळेचा परिसर अस्वच्छ असल्याचे आढळून आले आहे.
यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात जातीय भावना रुजविण्यास खतपाणी घालणारी आहे.या गंभीर बाबींची गट शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन जातीनिहाय विद्यार्थी व वर्गवारी , दैनंदिन हजेरी पुस्तकावर जातीचा उल्लेख तसेच दर्शक फलकावरील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख न करण्याबाबत तालुक्यातील सर्व शाळांना तात्काळ निर्देश द्यावेत तसेच सदरचे उल्लेखाबाबत स्वयंस्पष्ट खुलासा दोन दिवसांत करण्याची सुचना गट विकास अधिकारी लोकरे यांनी गट शिक्षणाधिकारी यांना केली आहे.
दरम्यान गट विकास अधिकारी लोकरे यांनी नुकताच पदभार घेतल्यानंतर तालुक्यात अचानक भेटी सुरू देऊन नोटीस देण्यास सुरूवात केल्याने तालुक्याच्या प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे.
——