सांगोला गटविकास अधिकारीपदी आनंद लोकरे रुजू
सांगोल्याला मिळाला प्रथमच डॅशिंग अधिकारी
सांगोला (डॉ. नाना हालंगडे): सांगोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी आनंद लोकरे शुक्रवारी रुजू झाले. तात्पुरता पदभार असललेल्या मंगळवेढ्याच्या गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी लोकरे यांच्याकडे पदभार सुपूर्त केला. आनंद लोकरे यांच्या रूपाने सांगोल्याला प्रथमच डॅशिंग अधिकारी मिळाला आहे.
आनंद लोकरे यांनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून दमदार कामगिरी केली आहे. ते मुळचे मंगळवेढ्याचे आहेत. खडतर परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून ते प्रशासकीय सेवेत रुजू झाले. १३ ऑगस्ट रोजी सांगोल्याचे गटविकास अधिकारी संतोष राऊत यांची बत्तीस शिराळा (जि.सांगली) येथे बदली झाली होती. तेव्हापासून सांगोला गटविकास अधिकारी पदाचा पदभार सुप्रिया चव्हाण यांच्याकडे होता. शुक्रवारी लोकरे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
सांगोला पंचायत समितीचे उपसभापती नारायण जगताप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले. बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे, नगरसेवक सूरज बनसोडे, रिपाइं नेते दीपक चंदनशिवे, अरुण बनसोडे, शेकाप नेते किशोर बनसोडे, दीपक एेवळे, रामस्वरूप बनसोडे, रिपाइं तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, पत्रकार डॉ. नाना हालंगडे यांनीही गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांचा सत्कार केला.
सांगोला तालुक्यात १०२ गावे आहेत. ७६ ग्रामपंचायती आहेत. जिल्हा परिषदेचे ७ गट, तर पंचायत समितीचे १४ गण आहेत. पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आरोग्य, रस्ते, बांधकाम, शिक्षण, पशु संवर्धन आदी विभागाला गती देवून कामे मार्गी लावण्याचे काम लोकरे यांना करावे लागणार आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील शाळा सुरु होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकरे यांना काम करावे लागणार आहे. यापूर्वीचे गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनीही दमदार कामगिरी केली होती.