सांगोला खरेदी-विक्री संघाचे चेअरमन पी. डी. जाधव यांचे निधन
सांगोला खरेदी-विक्री संघ आणला नावारूपाला
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाचे विद्यमान चेअरमन, स्व. आ. गणपतराव देशमुख यांचे विश्वासू सहकारी पी. डी. अप्पा तथा पांडुरंग दगडू जाधव ( वय ८३) यांचे सोमवार, १५ रोजी रात्री सात वाजता अल्पशा आजाराने मिरज येथे निधन झाले.
पी. डी. अप्पा हे मूळचे बलवडी गावचे. १९८९ सालापासून ते सांगोला तालुका खरेदी विक्री संघाचे चेअमन म्हणून काम करत होते. मागील गेली कित्येक वर्षांपासून संघाचे चेअरमन पद भूषवत होते. गतवर्षी त्यांचा हा खरेदी विक्री संघ पुणे विभागात प्रथम आला होता. अत्यंत नियोजन पद्धतीने कारभार करणारे पी. डी. अप्पा यांच्यामुळे यावर्षी खरेदी विक्री संघाला सात कोटी रुपयांचा नफा मिळाला होता.
यापूर्वी त्यांनी भूविकास बँकेचे दहा वर्षे संचालक म्हणून, मार्केट कमिटीचे ५ वर्षे संचालक म्हणून, तर जिल्हा लेबर फेडरेशनच्या चेअरमन व संचालकपदी काम केले. ते औद्योगिक विकास महामंडळचे सदस्य होते. सांगोला शहरात खरेदी विक्री संघाची मोठ्या प्रमाणात मालमत्ता असून स्व. आ. गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पी. डी. अप्पा यांनी या संघाचा कारभार चांगल्या प्रकारे हाकला होता. त्यांच्या या अकाली निधनामुळे सांगोला तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्यावर मंगळवारी १६ रोजी सकाळी दहा वाजता सांगोला येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.