सांगोला कारखान्यातून 20 ऑक्टोबरपर्यंत साखर बाहेर काढणार
बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभात दीपकआबा व अभिजीत पाटलांचा निर्धार
- तब्बल 7 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर सांगोला साखर कारखान्याचे धुराडे पेटले
सांगोला / एच. नाना
दुष्काळी परिस्थितीसह अनंत अडचणीवर मात करत तब्बल 7 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना तथा धाराशिव साखर कारखाना युनिट 4 चे धुराडे अखेर पेटले आहे. रविवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी गेली अनेक वर्ष बंद असलेल्या सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न झाला. यावेळी 20 ऑक्टोबर पर्यंत सांगोला साखर कारखान्यातून साखरेचे पोते बाहेर काढणार असल्याचा निर्धार कारखान्याचे चेअरमन मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील व धाराशिव उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांनी केला.
- हेही वाचा ::सांगोला तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार
यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर पवार महाराज, मनसेचे नेते दिलीप धोत्रे कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वनाथ चव्हाण, संचालक सागर पाटील, शहाजी नलवडे, अशोक शिंदे, उल्हास ढेरे, भिकाजी बाबर, वसंत जरे, राजेंद्र देशमुख, दिलीप जाधव, सुभाष जाधव, तुकाराम जाधव, मच्छिंद्र खरात, कल्याण कांबळे, संजय जाधव, अॅड.ढाळे, आदींसह धाराशिव उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक पाटील साहेब, संचालक सावंत तात्या, संतोष कांबळे, रणजित देशमुख, भैया शिंदे, जनरल मॅनेजर शिंदे सो आदींसह कारखाना प्रशासनाचे अधिकारी संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
- हेही वाचा ::नगरपरिषद निवडणूक ठरवणार सांगोल्याचा आमदार
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेला सांगोला साखर कारखाना सुरु करण्यासाठी मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या माध्यमातून धाराशिव उद्योग समूहाचे प्रमुख अभिजीत पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. अखेर किरकोळ डागडुजी व आवश्यक बाबींची पूर्तता करून कारखाना सुरू होण्यास सज्ज झाला आहे. कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न झाल्यानंतर आता कारखाना प्रत्यक्ष सुरू होण्याची फक्त औपचारिकता उरली आहे. अवघ्या आठ ते दहा दिवसात कारखान्यात प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात होईल व सांगोला तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रतीक्षा त्याद्वारे संपेल असा विश्वास यावेळी धाराशिव उद्योग समूहाचे प्रमुख अभिजित पाटील यांनी व्यक्त केला.
सांगोला तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने असलेली दुष्काळी परिस्थिती व यामुळे कारखाना लाभक्षेत्रात ऊस लागवडीखाली असलेले अत्यल्प क्षेत्र यामुळे सांगोला सहकारी साखर कारखाना साठी पाऊस अनेक मैलांचा प्रवास करून लांबून आणावा लागत होता ऊस वाहतुकीवर होणारा अतिरिक्त खर्चामुळे सांगोला कारखाना गेली सात आठ वर्षे बंद अवस्थेत होता अखेर कारखान्याचा वनवास संपला आणि चेअरमन मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळाने कारखान्याला म्हणजेच सामान्य शेतकरी बांधवांच्या या राजमहालाला सुरू करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आग्रही भूमिका घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हालचाली गतिशील केल्या. अखेर या सर्व परिश्रमाला यश आले असून शेतकरी बांधवांचा राजमहल लवकरच येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुला होणार आहे.
धाराशिव साखर कारखाना युनिट 4 च्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ दरम्यान कारखान्यावर भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील धाराशिव उद्योगसमूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यासह सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना व धाराशिव उद्योग समुहाच्या सर्वच संचालकांनी यावेळी टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरत भजन कीर्तनाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी उपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचारी तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कारखाना लवकरच सुरू होणार असल्याने हसू फुलले होते.