सांगोला कारखान्याच्या चौकशीची मागणी करणार : किरीट सोमय्या
सांगोल्यातील पत्रकार परिषदेत घणाघात
सांगोला (विशेष प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी पळविले आहे. सांगोला तालुक्यातील पाणी प्रश्न, कारखान्याचे प्रकरण त्याबाबत मी आजच माहिती घेतली आहे. याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी सांगोल्यात सांगितले. या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून सांगोला तालुक्याला न्याय मिळवून देऊ असे सोमय्या म्हणाले.
- हेही वाचा : सांगोल्यातील ‘कोण’ किरीट सोमय्यांच्या रडारवर?
- खरीप पिकांना हमीभाव दिला तरच शेती टिकेल
- हात धुतल्याने २५ टक्के आजार कमी होतात : ना. गुलाबराव पाटील
भाजप सोलापूर शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हा संघटक सरचिटणीस शशिकांत चव्हाण, भाजप किसान मोर्चाचे कोषाध्यक्ष शशिकांत देशमुख, प्रदेश सदस्या राजश्रीताई नागणे, भाजप जिल्हा मोर्चा अध्यक्ष धनश्री खटके- पाटील, ओबीसी सेलचे माया माने, माजी सभापती संभाजी आलदर, पंढरपूर तालुकाध्याक्ष भास्कर कसगावडे, सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, आनंद फाटे, डॉ. परेश खंडागळे आदी उपस्थित होते.
भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या हे रविवारी सोलापूर जिल्हा दौर्यावर होते. सोलापूरातील दौरा उरकून ते दुपारी चार वाजता सांगोल्यात दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करून पत्रकार परिषद घेतली. प्रारंभी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगोला सहकारी साखर कारखाना, विविध सिंचन योजनेतील अनियमितता आदी विषयांवर भाष्य केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत सांगोल्यावर होणार्या अन्यायाबाबत व्यथा मांडून आपण यात लक्ष घालावे, अशी मागणी केली.
भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यावेळी म्हणाले की, उजनीच्या पाण्याचा इंदापूर सर्वाधिक फायदा घेतात. सोलापूर जिल्ह्यात माढा, मोहोळ, करमाळा आदी परिसराला उजनीच्या पाण्याचा जास्त फायदा मिळतो. सांगोला तालुक्याच्या वाट्याचे 2 टीएमसी पाणी आहे. सध्या तालुक्यातील बर्याच गावांना पाणी मिळू शकतो. विशेषतः महूद परिसरातील दहा ते पंधरा गावे यामध्ये समाविष्ठ आहेत. परंतु विद्यमानही आमदारही याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था सांगोला तालुकावासियांची आहे. 18 टीएमसी पाण्यापैकी मंगळवेढा तालुक्यास 2 टीएमसी पाणी मिळण्याची तरतूद आहे. मागील दोन वर्षांपासून प्रशासन हे शेतकर्यांकडून पाणीमागणी अर्ज स्विकारत नाहीत, अशा तक्रारी आहेत. अधिकारीही यांना पाणी नको असे भासवून ते पाणी इंदापूरला नेतात. सांगोला तालुक्याला मिळणारे दोन टीएमसी पाण्याच्या योजनेचा ड्रोन सर्व्हे सुरु आहे. डाव्या कालव्याचे पाणी उजव्या कालव्यात नेऊन सध्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी या भागातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार आल्याने हा निर्णय रद्द करून खोडा घालण्यात आला. सध्या जिल्ह्यामध्ये भाजपाचे 8 आमदार व 2 खासदार असून जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याची धमक फक्त भाजपातच आहे.