सांगोला आगारातील 25 कर्मचारी निलंबित
15 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव पाठविले
सांगोला : नाना हालंगडे
राज्यात एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सरकारकडून चिरडण्याचा प्रयत्न होत असताना सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई सांगोला येथे करण्यात आली आहे. सांगोला आगारातील तब्बल 25 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर इतर 15 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पगारवाढ आणि पगाराची हमी, विलागिकरण या प्रमुख मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्यशासनाने पगारवाढ केली आहे. तरीपण कामावरती हजर न राहणाऱ्या कर्माच्याऱ्यावर निलंबनाची कारवाई करा असे, आदेश दिले आहेत.
त्याअनुषंगाने सांगोला आगारातील 25 जणांना निलंबनाची कारवाई करण्यात आली असून,15 जणांचे निलंबनाचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविले आहेत, अशी माहिती आगारप्रमुख पांडूरंग शिकारे यांनी दिली.
विलागिकरणासाठी राज्यभर एस.टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असून, सांगोला आगारातील 330 कर्मचारी यामध्ये उतरले आहेत. पगारवाढ केल्याने वरिष्ठांच्या आदेशाने कामावर हजर राहा म्हणून काहीजण हजर राहत आहेत. 290 कर्मचारी कामावर येत नाहीत. त्याअनुषंगाने या आगारातील 25 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 15 जणांवर कारवाई करा म्हणून, वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविले आहेत. यामध्ये चालक, वाहक व यांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सांगोला आगारात 330 कर्मचारी आहेत. सर्वांनीच संपात सहभाग घेतल्याने एसटी सेवा ठप्प झाली आहेत. त्यामुळे आगाराचा 1 कोटी 25 लाख रुपयाचा तोटा झालेला आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून कामावर हजर राहा, म्हणून सक्त सूचना असताना हे कर्मचारी हजर राहत नाहीत, त्यामुळे हे कारवाईचे सत्र असे सुरूच राहणार आहे, अशी माहिती आगारप्रमुख पांडूरंग शिकारे यांनी दिली.
डॉ. देशमुख यांच्याकडे कर्मचाऱ्यांची धाव
निलंबनाचे आदेश प्राप्त होताच निलंबीत कर्मचाऱ्यांनी शेकाप नेते तथा भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी डॉ. देशमुख यांना या प्रकरणात लक्ष घालून न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.