सदाभाऊ खोतांशी नडणाऱ्या हॉटेलवाल्याला वाळू चोरीत अटक
पंढरपूर : विशेष प्रतिनिधी
भाजपचे माजी मंत्री सदाभाऊ खोत हे मागील तीन महिन्यांपूर्वी सांगोला येथे पंचायत राज समितीच्या दौऱ्यावर असताना खोत यांच्याशी जेवणाचे बिल न देण्यावरून वाद घालून प्रकाशझोतात आलेले हॉटेल मालक अशोक शिनगारे यांना पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी वाळू चोरी प्रकरणात अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पत्रकारांना दिली.
सांगोल्यात आली ‘गद्दार मटण थाळी’
तिसंगी (ता. पंढरपूर) येथे बेकायदेशीर वाळू चोरी करून जात असताना पोलिसांनी अशोक शिनगारे आणि तुषार सलगरे यांना यांचे पिकअप वाहन पकडले. त्यावेळी अशोक शिनगारेने पोलिसांशी वाद घातला. त्यामुळे त्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून भादवि 353, 379, 34 तसेच गौण खनिज कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अशोक शिनगारे याला अटक केली असून तुषार सळगरे याचा शोध पोलीस घेत आहेत.
सदाभाऊ खोत सांगोला येथे आल्यावर मागे जेवण केल्याचे बिल मागण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी अशोक शिनगारे प्रकाशझोतात आला होता. सदाभाऊ खोत यांनी त्याच्यावर वाळूमाफिया असल्याचा त्यावेळी आरोप केला होता.
दरम्यान बिलावरून वाद झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी मी किंवा माझे कार्यकर्ते त्या हॉटेलवर कधी जेवलेच नाहीत, असा पवित्र घेत हा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असल्याचा दावा केला होता. जेवणाच्या बिलावरून रंगलेले हे नाट्य राज्यभर चांगलेच गाजले होते. या टिकेनंतर मागील तीन महिने शिनगारे किंवा खोत यांचे प्रकरण कुठे चर्चेत नव्हते. आज वाळू चोरीमध्ये शिनगारे यांना अटक केल्यानंतर पुन्हा एकदा ते प्रकाशझोतात आले आहेत.
पाहा खास व्हिडिओ