संघर्षाचा इतिहास पुन्हा घडवा : शरद पवार

वाचा सोलापूरच्या सभेतील संपूर्ण भाषण

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर ग्रामीण येथील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधला. वाचा सोलापूरच्या सभेतील संपूर्ण भाषण
——

महाराष्ट्राच्या समोर आज अनेक प्रश्न आहेत. काही भागांमध्ये अतिवृष्टीने नुकसान झाले, पीक उद्ध्वस्त झाले. काही भागांमध्ये दुसरे काही प्रश्न आहेत. म्हणून मी ठरवले की, ज्यावेळी आपले सहकारी संकटात आहे, त्यावेळेस आपण स्वतः जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजेत.

राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आवश्यक असे निर्णय घेण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. या दृष्टीने माझ्या दौराची सुरुवात सोलापूर पासून करत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी वर्तमानपत्रांमध्ये पक्षासंबंधी न आवडणारे लिखाण होत होते. अखेर स्थिती काय आहे, या हेतूने महाराष्ट्राचा दौरा करायचे ठरवले. त्याची सुरवात सोलापूरातूनच केली.

सोलापुरात दौरा सुरू करून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेलो. आणि चित्र हे दिसले की, जे सोडून गेलेत त्यातील बहुतेकांना जनतेने सोडून दिले. जनतेनेच त्यांची सुट्टी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या जागा मिळवल्या तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात यश आले.

त्यानंतर घडलेल्या घडामोडींनंतर श्री. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आपल्या लोकांचे सरकार आले. आज महाराष्ट्राचे राज्य चालवण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते योग्य पद्धतीने काम करत आहेत.

मंत्रालयात सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत जो कोणी असतो, जो आलेल्या कार्यकर्त्यांचा प्रश्न सोडवतो, तो राष्ट्रवादीचा आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला कळले आहे.

हे सरकार आपल्याला टिकवायचे आहे. मुख्यमंत्र्यांचा सन्मान करून चालवायचे आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात जाऊन द्यायचा नाही. काही करून महाराष्ट्र सावरायचा आहे.

ज्यांच्या हातात सत्ता देण्याचा लोकांचा आग्रह होता त्यांचा अनुभव काही चांगला नाही. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा उत्तम प्रकारे शेती करणारा भाग आहे. ऊसाचे क्षेत्र महाराष्ट्रात अधिक आहे. कारखानदारी अधिक आहे. पण शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत.

या देशातील ६० टक्क्यांहून अधिक असलेल्या, काळ्या आईशी इमान राखणाऱ्या, शिवारात पीक घेणाऱ्या, समस्त देशातील लोकसंख्येचा भुकेचा प्रश्न सोडवणाऱ्या वर्गाशी तुमची-माझी बांधिलकी ही असली पाहिजे.

म्हणून आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या हिताचे समाजकारण, धोरण आणि राजकारण करणे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांचा प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी निदर्शनं करायची ठरवली.

काही हजार शेतकरी मोर्चा घेऊन उत्तर प्रदेशातील मंत्र्यांना आपलं निवेदन देण्यासाठी आणि शांततेने निदर्शनं करण्यासाठी आले. भाजपाच्या नेत्यांनी शिस्तीने चाललेल्यांच्या अंगावर गाड्या घातल्या.

आपल्या मागण्यांसाठी रस्त्याने शांततेने जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर मोटार घालून त्यांची हत्या करणारे आपले भाऊबंद असू शकत नाहीत. त्यांचा विरोध करून त्यांना त्यांची जागा दाखवणे हे केल्याशिवाय आपल्याकडे गत्यंतर नाही.



आज राज्यातील सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी समंजसपणे काम करत आहे. अतिवृष्टीबाधितांना पहिला हप्ता देण्यासाठी ३६० कोटी रुपये काल सरकारने दिले, आणखीही देणार आहेत कारण शेतकऱ्यांला संकटातून बाहेर काढायचे आहे.

शेतकऱ्याच्या भल्याची भूमिका सरकार घेत असताना दिल्लीतून सतत त्रास देण्याची भूमिका घेतली जाते. महाराष्ट्राच्या वाट्याचे पैसे अद्याप केंद्राने दिलेले नाहीत. आपल्या विचारांचे सरकार राज्यात नाही म्हणून सहकार्य करणार नाही, ही नीती केंद्राची आहे.

मी केंद्रात कृषिमंत्री असताना गुजरातमधील जनतेशी आपले भांडण नाही, शेतकऱ्यांशी आपले भांडण नाही. नियमाने, कायद्याने, अधिकाराने त्यांना जे हवंय ते देणं आपलं कर्तव्य आहे. देशाच्या दृष्टीने आपल्याला संकुचित भूमिका घ्यायची नाही, हे धोरण मी ठेवले.

त्याकाळात गुजरात सरकारला कोणतीही अडचण आली तर त्या राज्याचे मंत्री माझ्याकडे येत असत. त्यांची अडचण मी कृषिमंत्री म्हणून सोडवत असे. मी कधी पक्ष बघितला नाही, तिथला शेतकरी आणि सामान्य माणूस बघितला.

आज मात्र ज्यांच्या हातात सत्ता आहे ते वेगळ्या पद्धतीने वागत आहेत. त्यामुळे याविरोधात एक जनमत तयार करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. ते जनमत तयार करण्याची संधी मनपा, जि.प., पंचायत समित्या, ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून मिळेल.

मला आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की या निवडणुकीत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वा आघाडीने एकत्रितपणे निवडणुका लढवल्यास आपल्या लोकांना निवडून देऊया. भाजपला खड्यासारखं बाजूला ठेवूया.

कालच्या पोटनिवडणुकांमध्ये आपण स्वतंत्रपणे लढलो असतानाही आपल्याला साधारणतः ७० टक्क्यांच्या आसपास जागा मिळाल्या. एकत्र लढलो असतो तर भाजपचा १०० टक्के पराभव केला असता.

त्यामुळे इथून पुढच्या निवडणुका कशा लढायच्या याचा तालुकावार नेत्यांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ. एकत्रित लढल्यास अपेक्षित यश मिळेल याची माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

या ११ तारखेला लखीमपुर खीरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सबंध महाराष्ट्र बंद ठेवायचा आहे. माझी विनंती आहे की तुमचे गाव, तालुका, जिल्हा इथे शांततेने, कायदा हातात न घेता, पोलिसांशी संघर्ष न करता आपल्या हा बंद पाळायचा आहे.

शेतकऱ्यांच्या वाट्याला कोणी गेले तर या देशातील माणूस गप्प बसणार नाही. आज शांत आहोत पण अतिरेक करण्याची भूमिका केंद्राने घेऊ नये, असा संदेश यातून पूर्ण देशाला द्यायचा आहे, यादृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे.

जगात इंधन स्वस्त होत असताना आपल्या देशात सातत्याने इंधन दरवाढ होत आहे. महागाईमुळे गृहिणींना संसार चालवणं कठीण होतंय. या महागाईला जबाबदार भाजप सरकार आहे. महागाईच्या गर्तेत जनतेला लोटणाऱ्यांविरोधात आपली चीड व्यक्त केली पाहिजे.

त्यासाठीही महाराष्ट्र बंद महत्त्वाचा आहे. सोलापूर जिल्हा हा नेहमीच संयमाने, शांततेने पण अन्यायाविरोधात उभा राहणारा आहे. या जिल्ह्याने स्वातंत्र्यलढ्यात हुतात्म्यांचा इतिहास निर्माण केला.

संघर्ष करण्याच्या प्रसंगी सोलापूर जिल्हा मजबुतीने उभा राहिला. तो इतिहास पुन्हा एकदा पुनरुज्जीवीत करायचा आहे, याची जाणीव सर्वजण ठेवूया.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका