श्रोत्यांसाठी गुडन्यूज, ‘विद्यावाहिनी’ वेब रेडिओवर कार्यक्रमांची मेजवानी
उद्या सोमवारी व मंगळवारी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांची विशेष मुलाखत
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : तमाम महाराष्ट्रातील नभोवाणी श्रोत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागाचा “विद्यावाहिनी” वेब रेडिओ आपल्यासाठी “ज्ञानपर्व” हा आगळावेगळा मुलाखतींचा कार्यक्रम घेऊन येत आहे. सोमवार, 9 आणि मंगळवार 10 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.00 ते 10.00 या वेळेत दोन भागात अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांची ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुहास पुजारी यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित केली जाणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागात अद्ययावत टीव्ही व वेब रेडिओ कार्यान्वित करण्यात आला आहे. रेडिओ स्टुडिओद्वारे ‘विद्यावाहिनी’ या वेब रेडिओची सुरुवात झाली आहे. याद्वारे विविध शैक्षणिक, साहित्य, संस्कृती विषयक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा आगळावेगळा कार्यक्रम म्हणजे “ज्ञानपर्व”. या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रांत अलौकिक कार्य करीत असलेल्या महनीय व्यक्तींच्या प्रकट मुलाखती प्रसारित केल्या जातील. या मालिकेतील पहिली मुलाखत अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांची आहे. ज्येष्ठ साहित्यिक सुहास पुजारी यांनी ही मुलाखत घेतली आहे. सोलापूरचे सुपूत्र आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, वनअभ्यासक, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी आपले संपूर्ण आयुष्य वृक्ष, प्राणी, पक्षी अभ्यासाला समर्पित केले. त्यांचा हा थक्क करणारा प्रवास नेमका कसा आहे? त्यांची साहित्य संपदा, संशोधन, निरीक्षण, भेटलेली माणसे याबाबतची रंजक, चित्तवेधक माहिती या मुलाखतीतून श्रोत्यांना ऐकायला मिळू शकेल. कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोत्यांनी प्ले स्टोअर वरून ‘विद्यावाहिनी’ हे अॅप मोबाईलवर डाऊनलोड करावे असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
📱खालील गुगल प्ले-स्टोअर लिंकवर क्लिक करून अॅप इन्स्टॉल करा व कार्यक्रमाचा आनंद घ्या.
लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=atclabs.VidyaVahin