श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची वचने मानवी जीवनासाठी मौलिक : डॉ.बी.बी.पुजारी
विद्यापीठात कन्नड विभागातर्फे विशेष व्याख्यान
सोलापूर : आजचे सोलापूर हे बाराव्या शतकात ‘ सोनलगी ‘ या नावाने ओळखले जायचे. सोनलगी या छोट्याशा खेड्यात श्री सिद्धारामेश्वर यांनी लोकांसाठी तलाव, अन्नछत्र, ६८ लिंगांची स्थापना, आणि देवालये बांधून गावचा विकास केला. तसेच, दक्षिणकाशी, अभिनव श्रीशैल, भूकैलास अशी सोनलगी गावाची ओळख त्यांनी निर्माण केली. त्याचबरोबर त्यांनी अनेक वचने लिहिली. यामुळे ते खूप लोकप्रिय झाले. त्यांना लोकांनी दैवत्व रूप बहाल केले. त्यामुळे ते प्रसिद्ध वचनकार म्हणून ओळखले जाऊ लागले, असे मत कन्नड शास्त्रीय अध्ययन केंद्र कर्नाटक केंद्रीय विश्वविद्यालय कलबुर्गी येथील डॉ. बी. बी. पुजारी यांनी व्यक्त केले.
ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, भाषा व वाड्. मय संकुलतील कन्नड विभागाच्यावतीने मकर संक्रांती आणि श्री सिद्धरामेश्वर महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ” श्री सिद्धरामेश्वर यांच्या वचनातील जीवन दर्शन ” या विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
श्री सिद्धरामेश्वर यांनी त्यांना आलेल्या अनुभवांवर वचने रचली आहेत. त्यांनी एकूण 68 हजार वचन लिहिली आहेत. भक्ती, कायक, स्त्री-स्वातंत्र्य, समानता इत्यादी विषय त्यांच्या वाचनांमध्ये आलेले आहेत. भाषा व वाड् मय संकुलाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी श्री सिद्धरामेश्वर यांच्यावरती संशोधन करणे ही आजची गरज आहे अशी अपेक्षा व्यक्त केली. आजच्या आधुनिक काळात श्री सिद्धरामेश्वर यांच्या वचनांचे अध्ययन – अध्यापन करण्याची आवश्यकता आहे, असेही ते यावेळी म्हणाले. या दृष्टीकोनातून भाषा व वाड्.मय संकुल कार्यरत असेल असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि व्याख्यातांचा परिचय प्रा. शिवानंद तडवळ यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत डॉ. गीता एळंगडी यांनी केले.
आभार प्रा. सागर सुरवसे यांनी मानले.तत्पूर्वी कन्नड विभागाची एम ए प्रथम वर्षांची विद्यार्थिनी कुमारी रेशमा धनशेट्टी व कुमारी शिल्पा संगोळी यांनी श्री सिद्धरामेश्वर यांची वचने गायिली. कार्यक्रमाला भाषा व वाड्.मय संकुलातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.