शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा “कैवार” काव्यसंग्रह

माजी प्राचार्य डॉ. अशोकराव भोईटे यांनी "कैवार" या काव्यसंग्रहाचे केलेले परीक्षण.

Spread the love

शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूरचे माजी प्राचार्य डॉ.अशोकराव भोईटे यांनी “कैवार” या काव्यसंग्रहाचे केलेले परीक्षण.

कवी डॉ.शिवाजीराव शिंदे यांच्या “कैवार” या कविता संग्रहाने मी भारावून गेलो. प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाचे ते प्रातिनिधिक मनोगत आहे असे मला वाटते. डॉ.शिंदे सर हे कवी मनाचे संवेदनशील प्रशासक आहेत असे आपल्या शुभेच्छा संदेशात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस मॅडम म्हणतात त्याची प्रचिती “तू वागला नाहीस तर” या कवितेतून येते. ते म्हणतात..

“अडवू नकोस कोणालाच, तू सर्वांची मदत कर
तूच टाकशील त्यांच्या जीवनात आनंदाची भर
मदतीची भावना ठेवून तू आपले काम कर
सर्वांशी नम्रतेने वाग, जोडून तुझे दोन्ही कर

पण नियम डावलून काही करू नकोस, चिडचिड करू नकोस आणि कामावरची निष्ठाही ढळू देऊ नकोस…
म्हणूनच त्यांच्या कार्यालयात केव्हाही जा ते नेहमीच हसतमुख असतात. कामाचा प्रचंड ताण असला तरी ते समोरच्याला जाणवू न देता त्यांच्याशी प्रेमानेच बोलतात त्यांचे काम समजून घेतात.
आईबद्दल सर्वजण भावनिक असतात, बरेचजण लिहितात सरांनीही “माझी आई” या कवितेत आईचे यथोचित वर्णन केले आहे.

आनंदाचा ही झरा | देते दीनदलितांना आसरा |
नेहमी ठेवते प्रसन्न चेहरा || माझी आई ||

सतत राबणारी, सोशिक, शांत, निगर्वी संयमी, संस्काराची खाण असे आईचे वर्णन डॉ.शिंदे यांनी केले आहे.

वात्सल्याचे भांडार | मनाने उदार |
प्रेमळ आहे फार || माझी आई ||

पण आई इतकाच किंबहुना जास्तच खपत असतो तो आपला बाप ! “बाप नावाचा माणूस” आणि “माझा कष्टकरी बाप” या कवितेत ते म्हणतात,

संकटाला खंबीरपणे तोंड देणारा
परिस्थितीपुढे कधीही हार न मानणारा
बाप पाहिला मी !

कष्टकरी बापाच्या व्यथा पाहून चिडून म्हणतात,

कर्जमाफीचं गाजर शासनानं दाखवलं
भरपूर कर्ज घेणाराचं इथं फावलं
म्हणून म्हणतो बाबा, तुम्ही पेटून उठावं
नाकर्त्या शासनाला आता तुम्ही हटवावं

बहुतांशी कविता या शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणाऱ्या आहेत. त्याला शेतकरी राजा म्हणतात,जगाचा पोशिंदा म्हणतात पण ” जगाच्या पोशिंद्यानं कसं जगावं “, “हुलकावणी”, “अवकाळी पाऊस” या कवितेत अस्मानी व सुल्तानी संकटांनी त्याला कसं नाडलं जातं आणि शेवटी यातून काहीच मिळणार नसल्यानं, शेतकऱ्यांनं मात्र मरणाला कवटाळावं,मला सांगा जगाच्या पोशिंद्यानं कसं जगावं ?

‘कर्जाच्या व पोराच्या भविष्याच्या चिंतेपायी
केले मृत्यूला रे जवळ त्यांनी
नको देऊ रे पावसा हुलकावणी ‘
असं म्हणतात आणि माझ्या सारख्या शेतकऱ्याच्या पोराच्या डोळ्यात अश्रू येतात हीच त्यांच्या कवितांची यशस्विता आहे. “शेतकऱ्यांच्या जगण्याचे वांदे” या कवितेत कांदा महाग झाला म्हणून बोंब मारणाऱ्यांना त्यांनी चपराक मारली आहे.

म्हणून म्हणतोय बाबांनो
म्हणू नका महाग झालेत कांदे
कोणी तरी समजून घ्या ना हो
माझ्या शेतक-याच्या जीवनाचे वांदे

शेतमालाला हमीभाव पाहिजे हा विषयही सर विसरले नाहीत.
“शेतकऱ्यांचं दुःख” आणि “सांग माझ्या सरकारा” या कवितेत म्हणतात,

शेतकरी शेतामध्ये राबराब राबतो
शेतमालाची किंमत मात्र व्यापारी करतो
शेतकऱ्याला स्वतःच्या शेतमालाचा
भाव ठरविण्याचा अधिकार मिळेल का ?
कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतमालाला
मायबाप सरकार हमीभाव देईल का?
मायबाप सरकार हमीभाव देईल का?

” पोरीचं लगीन ”
सांगा बरं यंदा कसं व्हईल
मह्या पोरीचं लगीन ?
अशी आर्त साद ते घालतात कारण शेतकऱ्यांच्या समस्या किती आहेत पहा…

पाऊस दगा देतो, व्यापारी डल्ला मारतो, भारनियमन, कर्जाचा बोजा या सर्वांना कंटाळून तो आपलं जीवनचं संपवतो; मग कसलं आलंय पोरीचं लगीन ? ही कविता वाचताना सुद्धा डोळ्याच्या कडा ओलावतात.

“कोवळ्या अर्भकाचा काय दोष”
एक बातमी वाचून या हळव्या मनाच्या कवीचं कविमन जागृत झालं आणि नुकतीच जन्मलेली दोन अर्भकं पाहून त्यांनी भावना शब्दबद्ध केल्या…

“काय होता त्या अर्भकाचा गुन्हा
रस्त्यावर टाकून देताना
कसा फुटला नसेल त्या
अर्भकाच्या मातेला पान्हा”

आणि पुढच्या “माणुसकी” या कवितेत’ हरवत चाललेल्या माणुसकीला जपायची वेळ आलीय ! ‘ असे ते म्हणतात.
काही दिवस प्राध्यापक म्हणून काम केलेल्या डॉ. शिंदे सरांनी “विनाअनुदानित धोरणावरही” कटाक्ष टाकला आहे.लते म्हणतात,काही झाले तरी मी माझे विद्यार्थी वाऱ्यावर सोडणार नाही. माझे शिक्षकाचे व्रत मी प्रामाणिकपणाने निभावेन! विद्यार्थ्यांना थोरामोठ्यांच्या कथा सांगेन, संस्काराचे बीजारोपण त्यांच्यात करेन, नाविन्यपूर्ण अध्यापन करेन, ज्ञानामृतानं विद्यार्थ्यांना समृद्ध करेन, विज्ञान-तंत्रज्ञान वापरून त्यांना मी शिकवीन. अर्ज, विनंत्या सनदशीर मार्गानं या धोरणाचा विरोध करेन पण विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. हे सध्याच्या विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या सेवकांचे अंतर्मनच सरांनी व्यक्त केले आहे.

“मानवा” या कवितेत,
” आनंद व्हावा सर्वांना तुझ्या येण्यानं
गहिवरून यावं सर्वांना तुझ्या जाण्यानं “

हे जीवनाचे सारच या कवितेत डॉ.शिंदे सरांनी सांगितले आहे.
” वास्तविकता ” – काय तर सुखाच्या क्षणी सर्वच असतात सोबतीला, दुःखद प्रसंगी सदैव राहा एखाद्याच्या पाठीशी उभा.
कुणाला आनंद देता आला नाही तरी चालेल
परंतु निदान दुःख तरी कुणाला देऊ नका !

“आजकाल” – माणूस भावनाशून्य झालाय
कर्तव्यापासून दूर चाललाय

“तुम्ही येणार आहात म्हणून” – देशाची सेवा करून शहीद झालेल्या वीरपत्नीची अवस्था पुढीलप्रमाणे शब्दबद्ध केली आहे.

“आज तुम्ही येताय
भारत मातेसाठी शहीद होऊन
मी त्यांना कसं सांगू
तुम्ही या जगात नाहीत म्हणून !”

ही कविता वाचून हृदय भरून आलं, मनाला असहय्य वेदना झाल्या.
याबरोबरच सांगली, कोल्हापूर, कराड याठिकाणी झालेल्या पुरग्रस्तांची हालअपेष्टा याचे वर्णन करणाऱ्या दोन कविता “महापुरानंतरचं उदवस्थ गाव” आणि पुरग्रस्तांचे मनोगत या कविता वाचताना जणू काही हे प्रसंग समक्ष डोळ्यानं अनुभवतोय असंच वाटत राहतं इतके वास्तवस्पर्शी वर्णन या दोन्ही कवितेत कवीनी केले आहे.
आपल्या ध्येयाप्रती ठाम राहण्याचं आव्हान “प्रवृत्ती” या कवितेतून ते करतात.
माणसाकडूनच माणसाचा घात, फसवणूक, चेष्टा, धोका होतो हे त्यांच्या ” माणसाकडूनच या कवितेत दाखवले आहे.
सध्याच्या महामारीच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी “चला सर्व एकजुटीने कोरोना विषाणूशी लढू”; “वर्दीतल्या माणसाला सलाम ” आणि “जरा ऐका ना हो” या कवीतातून जिद्दीचे वर्णन कवीने केले आहे.काळजी न घेणाऱ्यांना साद घातली आहे. कोरोना योद्धयाना त्यांनी सलाम केला आहे.

समस्त महिलांच्याप्रती दाखवलेला आदराचा भाव “संकल्प महिला दिनाचा” या कवितेतून प्रतीत होतो.
रयतेचे राजे वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही कवी विसरले नाहीत या कवितासंग्रहात त्यांच्यावरही कवीनी कविता केल्या आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मानवाला माणूसपण मिळालं हे त्यांच्या कवितेतून कवी मांडतात.
आज छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या तेजस्वी व लोककल्याणकारी राजाची गरज कवीला प्रकर्षाने जाणवते ते त्यांच्या ” राजे,आपण आज हवे होतात ” या कवितेत ते म्हणतात,
” समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायला
राजे, आपण आज हवे होतात !
या कवितासंग्रहात काही प्रेमकविता व काही भक्ती कवितांचा शिडकावा कवीने केला आहे.
या “कैवार” कवितासंग्रहास जेष्ठ साहित्यिक,सुप्रसिद्ध कवी व वक्ते डॉ.राजेंद्र दास सरांची प्रस्तावना लाभली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाच्या कुशल प्रशासक, अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ.मृणालिणी फडणवीस मॅडम यांनी शुभेच्छापर संदेश लिहून कवीला मनापासूनशुभेच्छा दिल्या आहेत.
मला या कविता खूप भावल्या, वाचकांनाही या कविता नक्कीच भावतील यामध्ये तिळमात्र शंका नाही.
याप्रसंगी मी डॉ.शिवाजीराव शिंदे सरांकडून भविष्यातही उत्तोमोत्तम साहित्यकृतीची निर्मिती व्हावी हीच ईश्वररणी प्रार्थना करतो आणि थांबतो.

– प्राचार्य डॉ. अशोकराव भोईटे
सातारा, माजी प्र-कुलगुरू शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
तथा माजी प्राचार्य कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, जि.सोलापूर

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका