शेतकऱ्यांची अवस्था इंग्रज काळापेक्षाही भयावह : पी. साईनाथ
माध्यमांचे भांडवलीकरण झाल्याने धोक्याची घंटा
रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, द हिंदू या आघाडीच्या दैनिकाचे संपादक, आंतरराष्ट्रीय पत्रकार पी. साईनाथ रविवारी सोलापुरात होते. पी. साईनाथ हे भारतातील ग्रामीण वास्तव आणि शेतकरी आत्महत्येचा प्रश्न यांवर लेखन करणारे पत्रकार आहेत. द हिंदू या इंग्लिश वृत्तपत्राच्या ग्रामीण व्यवस्था विभागाचे ते माजी संपादक आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. Everybody Loves a Good Drought हे त्यांनी लिहिलेले पुस्तक खूप गाजले..
सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
देशात इंग्रजांच्या काळात ज्याप्रमाणे शेतकरी दबला होता, पिचला होता त्याप्रमाणेच सध्याच्या शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. यूपीए व एनडीए सरकारच्या काळात संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक दिवसही चर्चा होऊ शकत नाही हे या देशाचे दुर्दैव आहे. बड्या भांडवलदारांच्या घशात माध्यमे गेली असल्याने धोक्याची घंटा असल्याची भीती रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते तथा द हिंदू या आघाडीच्या दैनिकाचे संपादक पी. साईनाथ यांनी व्यक्त केली.
पी. साईनाथ हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. सायंकाळी त्यांचे व्याख्यान होणार आहे. पी. साईनाथ यांच्याशी वार्तालापाचे आयोजन सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
मंचकावर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, दैनिक दिव्य मराठीचे वृत्तसंपादक श्रीकांत कांबळे, कॉम्रेड रवींद्र मोकाशी, प्रा. विलास बेत आदी उपस्थित होते.
पी. साईनाथ म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश असताना देशात शेतकऱ्यांना आपल्या न्यायासाठी झगडावे लागते. कृषी कायदाच्या विरोधात दिल्लीत झालेले आंदोलन हे देशातील सर्वाधिक ताकदीने चाललेले व यशस्वी झालेले आंदोलन आहे. या आंदोलनाची इतिहासात नोंद होईल. कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वर्ग नाहीत. त्या सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात. त्यामुळे शेतीमाल विपणनाबाबत सतत पेच निर्माण होत असतात.
देशात प्रत्यक्ष शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शेतीमालाला योग्य व हमीभाव मिळाला तर अनेक प्रश्न सुटू शकतात. समाजाच्या चुकीच्या मानसिकतेमुळे शेतात राबणाऱ्या स्त्री शेतकऱ्यांची योग्य दखल घेतली जात नाही. कृषी क्षेत्राला चांगले दिवस हे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केल्यानंतर येवू शकतील. यासाठी झगडण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी ठेवावी.
माध्यमांचे भांडवलीकरण
कोरोना काळात सर्व क्षेत्रे बाधित आणि तोट्यात असताना अंबानींच्या वैयक्तिक उत्पन्नात दुपटीने वाढ होते हे कशाचे लक्षण आहे? अंबानीने अनेक माध्यम संस्था विकत घेतल्या आहेत. त्या संस्था त्यांचीच री ओढणार यात नवल नाही. मात्र त्यांच्याशी आहेत संबंध नसलेल्या माध्यम संस्था जाहिरातीच्या लालसेने त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाहीत. माध्यमेच अशी झुकू लागली तर जनतेच्या प्रश्नांवर बोलणार कोण. आयपीएलमधून सर्वाधिक जाहिराती माध्यमांना मिळतात. परिणामी क्रिकेट व्यवहारावर माध्यमे बोलायचे टाळतात.
डिजिटल माध्यमांचे दमण
मुख्य प्रवाहातील माध्यमांना पर्याय बनू पाहत असलेल्या इंडिपेंडंट मीडिया अर्थात डिजिटल माध्यमांचे दमण होताना दिसते.
साखर कारखानदारीत साटेलोटे
साखर कारखानदारीचे खाजगीकरण करून सहकारी तत्वाला हरताळ फासला जात आहे. कारखाने कर्जात बुडवून ते भांडवलदारांना विकले जात आहेत. सरकारच्या मदतीने हे घडताना दिसत आहे.
माध्यम स्वातंत्र्याची भीषण स्थिती
माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत भारत देश हा १५७ व्या स्थानी. ही चिंतेची बाब आहे. याचा अभ्यास करणाऱ्यासाठी स्थापन केलेल्या कमिटीत मी होतो. कमिटीत पत्रकार नसलेल्यांचा भरणा होता. मी पत्रकारांच्या बाजूने लढलो. मात्र सरकारने कमिटी गुंडाळली.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, द हिंदू या आघाडीच्या दैनिकाचे संपादक, आंतरराष्ट्रीय पत्रकार पी. साईनाथ रविवारी सोलापुरात होते. पी. साईनाथ हे भारतातील ग्रामीण वास्तव आणि शेतकरी आत्महत्येचा प्रश्न यांवर लेखन करणारे पत्रकार आहेत. द हिंदू या इंग्लिश वृत्तपत्राच्या ग्रामीण व्यवस्था विभागाचे ते माजी संपादक आहेत. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. Everybody Loves a Good Drought हे त्यांनी लिहिलेले पुस्तक खूप गाजले..