‘शेकाप’ने सांगोल्यातून फुंकले निवडणुकीचे रणशिंग

विधानसभा उमेदवारीबाबतही केले मोठे विधान

Spread the love

सांगोला (एच. नाना) : शेतकरी कामगार पक्षाने आगामी जि.प., पं.स., नगरपालिका, विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकलंय. या निवडणूका स्वबळावर लढविल्या जातील असे घोषित करून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आलेत. शेकापच्या या आक्रमक भूमिकेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण निवडणुकीपूर्वीच तापू लागलंय.

शेकापच्या दोन दिवशीय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीचा शनिवारी समारोप झाला. शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, भाई कै. गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनबाई देशमुख, चिटणीस मंडळाचे माजी सदस्य भाई संपतराव पवार, आ. बाळाराम पाटील, माजी आ. धैर्यशील पाटील, कार्यालयीन चिटणीस अॅड. राजेंद्र कोरडे, राज्य कार्यकारिणीचे बाबासाहेब कारंडे, चंद्रकांतदादा देशमुख, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता धांडोरे, संगम धांडोरे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, दादाशेठ बाबर, सभापती राणीताई काेळवले, उपसभापती नारायण जगताप, खरेदी विक्री संघाचे चेअरमन पी.डी. जाधव, बाळासाहेब झपके, उद्योगपती मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, माजी उपसभापती तानाजी चंदनशिवे आदींसह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

या महत्त्वपूर्ण बैठकीस संबोधित करताना शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्ष हा फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. कार्ल मार्क्स, लेनिनची विचारधारा प्रमाणभूत मानून भांडवलवादी व्यवस्थेला विरोध आणि नवा पर्याय देण्याचे काम शेकाप करीत आहे. देशात सध्या धार्मिक, जातीयवादी विचारांच्या राजकारणाने सामाजिक वातावरण दूषित केले आहे. त्याला रोखण्याचे काम डाव्या चळवळीसह शेकाप करीत आहे.

शेकापच्या तालुका, जिल्हा कार्यकारिण्या बरखास्त
यावेळी बोलताना आमदार भाई जयंत पाटील यांनी शेकापच्या तालुका, जिल्हा कार्यकारिण्या बरखास्त करत असल्याचे घोषित केले. नवीन कार्यकारिणीत तरुणांना संधी दिली जाईल. तरुणांनी मोठ्या संख्येने शेकापमध्ये काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

विधानसभा उमेदवारीबाबत मोठे विधान
कै. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सांगोल्यात शेकाप कार्यकर्त्यांत काही मुद्द्यांवरून होणारे मतभेद चव्हाट्यावर येत होते. आगामी उमेदवार हे डॉ. बाबासाहेब देशमुख हेच असावेत, असे अनेकांना वाटत असल्याचे सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसते. अनेकांनी उघडपणे ‘डॉ. बाबासाहेब, तुम्हीच आमचे आबासाहेब” अशी टॅगलाईन वापरून वातावरण निर्मिती केलीय. याबाबत आ. जयंत पाटील हे या बैठकीत काय बोलणार याकडे अनेकांच्या नजरा होत्या. आ. जयंत पाटलांनी सांगोल्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. उमेदवारीबाबत आताच गडबड करू नये. पक्षाचे काम झटून करावे. उमेदवारीचा निर्णय त्यावेळी घेऊ. पक्षाने प्रसंगी माईसाहेबांनाही (कै. गणपतराव देशमुख यांच्या पत्नी) उमेदवारी दिली तरी निवडून आणावे लागेल. आणि शेकापचे बहाद्दर कार्यकर्ते हे काम सहज करतील, असा विश्वास असल्याचे सांगत आ. पाटील यांनी उमेदवारीवरून कार्यकर्त्यांनी उभे केलेल्या वातावरणातील हवा काढून घेतली.

भाई चंद्रकांतदादांचा कंठ आला दाटून
माजी आमदार तथा कै. भाई गणपतराव देशमुख यांचे चिरंजिव चंद्रकांत देशमुख हे भाषणाला उभे राहिले असता आबासाहेबांच्या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. “आबासाहेबांनी आपणा सर्वांना पोरके केले असले तरी मी स्वत: तसेच डॉ. अनिकेत व डॉ. बाबासाहेब असे आम्ही तिघेही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत. तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी आम्ही आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू असे सांगत देशमुख परिवारात कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले.

सांगोला झाले लालबावटामय
सांगोला सूतगिरणीजवळील हर्षदा लॉन्सवर ही दोन दिवसीय बैठक झाली. या निमित्ताने सांगोल्यात शहरभर स्वागताच्या कमानी, भाई कै. गणपतराव देशमुखांची प्रतिमा असलेले डिजिटल बॅनर तसेच शेकडो लालबावटे फडकवण्यात आल्याने सांगोला शहर लालबावटामय झाले होते. या बैठकीमुळे शेकाप कार्यकर्त्यांत उत्साह संचारल्याचे दिसून येत होते.


टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका