‘शेकाप’च्या लाल रंगाशी एकरूप झालेली नवदुर्गा
सांगोल्याच्या सभापती राणीताई कोळवले
रणरागिनी नवदुर्गा : आजचा रंग – लाल
सांगोला/ डॉ. नाना हालंगडे
लाल रंग हा शौर्याचे प्रतिक मानला जातो. हे शौर्य केवळ पुरुषच दाखवतात असे नव्हे तर महिलांनीही आपली शूरता दाखवल्याचा इतिहास आहे. आज नवरात्रौत्सवाच्या सहाव्या दिवशीचा रंग लाल आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या झेंड्याचा रंगही लालच आहे. याचेच निमित्त साधून आम्ही सांगोला पंचायत समितीच्या सभापती सौ. राणीताई कोळवले यांची संघर्षमय यशोगाथा खास थिंक टँकच्या वाचकांसाठी मांडत आहे.
आपल्या विश्वविक्रमी कार्याने अजरामर झालेले माजी आमदार कै. भाई गणपतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात शेकडो कार्यकर्ते घडले. त्यात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे सांगोला पंचायत समितीच्या सभापती सौ. राणीताई कोळवले. कोळवले यांचा राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रवास प्रेरणादायी असाच आहे.
अजनाळे गावच्या कन्या व सून
सभापती सौ. राणीताई कोळवले या सांगोला तालुक्यातील अजनाळे गावाच्या कन्या आहेत. विशेष म्हणजे याच अजनाळे गावच्या त्या सूनही आहे. त्यांचं सासर व माहेर हेच गाव आहे. सभापती सौ. राणीताई कोळवले यांचे आजोबाही राजकारणात दीर्घकाळ सक्रिय होते. त्यांचे पती हनमंत कोळवले हे प्राध्यापक आहेत. सभापती सौ. राणीताई कोळवले यांच्या सासर व माहेर या दोन्ही घरातील बुजुर्ग मंडळी शेतकरी कामगार पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते, नेते होते. सध्याही दोन्ही कुटुंबे शेकाप सोबतच आहेत. आजोबांचे राजकीय कार्य पाहून राणीताई यांनाही राजकारणात आवड निर्माण झाली. त्यांनी शेकापचे कार्य गावात सुरु केले.
मिनी मंत्रालयाचे मुख्य पद भूषवण्याची संधी
नवदुर्गा, रणरागिणी,समाजसेविका तसेच पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष सभापती राणीताई कोळवले याचे कार्य अचंबित करणारे असे आहे. राणीताई यांनी अजनाळे पंचायत समिती गणातून शेकापकडून पहिल्यांदाच निवडणूक लढविली आणि त्यात त्या विजयी झाल्या. तालुक्याच्या चौफेर विकासाबरोबर पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे राबवून त्यांनी पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्यांची ही समाजसेवा प्रेरणादायी अशीच आहे. आज त्यांच्या कार्याला सलामच करावा लागेल. ऐन कोरोना काळात त्यांच्यावर ही जबाबदारी आली अन् त्यांनी पंचायत समितीचा चेहरा-मोहराच बदलला. ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, आयसीडीएस, महिला बचतगट, पशुवैद्यकीय यासह अन्य विभागात भरीव कामे करून पंचायत समितीला जिल्ह्यामध्ये अव्वलस्थानी नेले.
नवरात्रौत्सव ही महिलांसाठी पर्वणी
नवरात्र उत्सव हा महिलांसाठी पर्वणी असते. आज सहावा दिवस आहे चंद्रकाळ गणनेनुसार अश्विन महिन्यात शक्तिरूपिणी मातेच्या नऊ रुपांच्या पूजनाला प्राधान्य दिले आहे. प्रतिपदेपासून घटस्थापनेद्वारे नवरात्रीच्या उत्सवाला प्रारंभ होतो. तर समारोप हा महानवमीच्या रात्री होतो. प्रकृति आणि पुरुषाच्या मिलनातून मानवाची निर्मिती झाली. माता ही जन्मदात्री. सज्जनाचा अंश धारण करून बाळाच्या जन्मानंतर त्याचे भरण-पोषण माता करते. त्यामुळे सज्जनाला कार्यप्रवण करणारी माता जगभरात वंदनीय ठरली आहे. अशाच या आदिशक्ती महिसासूर मर्दिनी असलेल्या नवरात्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी याच नवरात्रातील नवदुर्गा, महिषासुर मर्दिनी, कर्तव्य दक्ष सभापती राणीताई कोळवले यांच्या निमित्ताने हा दिवस उजागर झाला आहे.
कोरोना काळात दमदार काम
सभापती राणीताई कोळवले यांनी आपल्या सभापती पदाचा कार्यभार ऐन कोरोना काळात ३१ डिसेंबर २०१९ रोजी घेतला. सर्वच विभागात उल्लेखनीय कामे करत कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. घरकुल, शौचालय, महिला बालकल्याण विभागात भरघोस कामे केली. वृक्षारोपण चळवळ हाती घेत एक पद एक झाड या अनुषंगाने तालुक्यात हजारो झाडे लावून पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला. तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीमधील १०२ गावांमध्ये कोरोना काळात भेट देऊन प्रत्येक गावांना झाडेही भेट दिली. जागतिक महिला दिन, शिक्षक दिनी, नेते मंडळींच्या वाढदिनी मोठ्या संख्येने कोरीना लसीकरण व रक्तदान शिबिरे घेतली.
गुजरात जिल्हा परिषदेत आवाज घुमला
सभापती राणीताई कोळवले यांनी गुजरातच्या अहमदाबाद जिल्हा परिषदेत आवाज उठवला. तेथील बडोद्यातील अंकुंडिया ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्राला भेट दिली. गुजरात व आपल्या राज्यातील योजना सारख्याच आहेत. विशेष बाब म्हणजे येथील सभापतींना जिल्हा नियोजन समितीत घेतले जात नाही. सभापती राणीताई कोळवले या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील गणपतराव देशमुख यांच्या तालुक्यातील सभापती आहेत. म्हणून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
लाल रंगाचे महत्त्व
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. कात्यायनी देवीला लाल रंग आवडतो. लाल रंग हा माणसाचे शारिरीक स्वास्थ हे सुंदर आणि आनंदीत ठेवण्यास मदत करतो.