शेकापचे संयमी वादळ डॉ. बाबासाहेब देशमुख
वाढदिवस विशेष लेख, तालुक्यातील तरुणाईत चेतविला अंगार
सांगोला / डॉ. नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, विक्रमवीर आमदार तथा भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सांगोला तालुक्यातील शेकापचे काय होणार? पक्षाला दिशा देणारे नेतृत्व मिळणार का? पक्षासोबत पदाधिकारी, कार्यकर्ते टिकून राहतील का? असे अनेक प्रश्न मुद्दामहून उपस्थित करण्यात आले. मात्र या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे कृतीतून देत स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मागील काही महिन्यांपासून शेकापला ऊर्जितावस्था दिली आहे. आज डॉ. बाबासाहेबांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच..
भाई गणपतराव देशमुख यांनी तालुक्याला विकासाची दिशा दिली. पाण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यात त्यांना यश आलेही. पाण्याच्या अनेक योजना राबविल्या. अजूनही काही कामे सुरू आहेत. दुष्काळी भागाच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न स्व. गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांनी केले. त्यांचे निधन होऊन काही महिने लोटले आहेत. अजूनही अनेक कार्यकर्ते दुःखातून सावरलेले नाहीत. अशा स्थितीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नेटाने पुढे येत कार्यकर्त्यांना धीर दिला आहे. जणू बाबासाहेबांच्या रूपाने आबासाहेबच आपल्यासोबत आहेत याचा अनुभव कार्यकर्ते घेत आहेत.
सडतोड उत्तर
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सांगोला तालुक्यातील शेकापचे काय होणार? पक्षाला दिशा देणारे नेतृत्व मिळणार का? पक्षासोबत पदाधिकारी, कार्यकर्ते टिकून राहतील का? असे अनेक प्रश्न मुद्दामहून उपस्थित करण्यात आले. मात्र या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे कृतीतून देत स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मागील काही महिन्यांपासून शेकापला ऊर्जितावस्था दिली आहे. ते सक्रियपणे शेकापची धुरा सांभाळत आहेत. पायाला भिंगरी लावून ते तालुका पिंजून काढत आहेत. लोकांच्या सुख, दुःखात सहभागी होत त्यांना आपलेसे करत आहेत.
रोखठोक भूमिका
डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा स्वभाव शांत, संयमी असला तरी रोखठोक आणि तितकाच आक्रमक आहे. सांगोला तालुक्याच्या हिताच्या प्रत्येक प्रश्नात बाबासाहेब स्वतः जातीने लक्ष घालून भूमिका घेत आहेत.
मध्यंतरी महावितरणने तालुक्यातील हजारो वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन थकबाकीपोटी तोडले होते. विद्यमान लोकप्रतिनिधीच काय इतर कोणालाही या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. त्यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख हे लोकांच्या मदतीला धावले. त्यांनी शेकापतर्फे भव्य मोर्चाचे आयोजन केले. याचा धसका घेऊन महावितरणला ही कारवाई मागे घ्यावी लागली.
प्रश्नांचा अभ्यास आणि पर्याय
राजकारण करताना केवळ प्रश्न, समस्या मांडून उपयोग नसतो. तर प्रश्नाचे अचूक उत्तर आणि पर्याय दिला तर ते प्रश्न मार्गी लागू शकतात. भाई गणपतराव देशमुख यांनी आपल्या राजकीय आयुष्यात याच भूमिकेतून काम केले. त्यांच्या नंतर त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे हीच भूमिका आणि विचारांचा वारसा पुढे चालवत आहेत.
सांगोला तालुक्यातील हजारो एकर डाळिंब क्षेत्रावर तेल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रश्न वर्षानुवर्षे पुढे येत आहे. यावर केवळ राजकीय भूमिकेतून न पाहता कायमस्वरूपी उपाय काढण्याच्या मानसिकतेतून डॉ. बाबासाहेब देशमुख हे प्रयत्न करताना दिसत आहेत. अनेक तज्ज्ञांशी ते सल्लामसलत करत आहेत.
कोरोना काळात दिला धीर
कोरोनामुळे अवघे विश्व हादरून गेले आहे. अशा काळात राजकीय नेत्यांनी लोकांना धीर देणे गरजेचे असते. किंबहुना ही त्यांची नैतिकता असते. मात्र अनेक नेते ही बाब विसरतात. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी कोरोना काळात सांगोला तालुक्यातील हजारो लोकांना स्वतः फोन करून धीर दिला. त्यांचे मायेचे चार शब्द आजही लोक विसरलेले नाहीत. तालुक्यातील अडल्या नडलेल्या लोकांच्या, रुग्णाच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात. ते स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा लोकांना फायदा होताना दिसतो.
यासाठीच राजकारणात..
50 वर्षाहून अधिक काळापासून देशमुख कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्या तालुक्यातील तमाम जनतेला वाऱ्यावर न सोडणे, आबासाहेबांच्या निधनानंतर पक्ष संपतो, अशी भाषा वापरणाऱ्या नेत्याला त्याची जागा दाखवून देण्यासाठी मी जनतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध असणार असून, पक्ष संघटन अधिक मजबूत करणार असल्याचे डॉ. बाबासाहेब देशमुख बोलताना सांगतात.
राज्य पातळीवरील जबाबदारी
शेतकरी कामगार पक्षाचे युवक संघटन असलेल्या पुरोगामी युवक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब देशमुख यांची काही दिवसांपूर्वी निवड करण्यात आली आहे. ही खरे तर मोठी जबाबदारी आहे. हे पद मिळताच बाबासाहेब यांनी राज्यभरात संघटन बांधण्याचा सपाटा लावला आहे. सांगोला तालुक्यातील विविध गावात ते संघटन बांधत आहेत. कार्यकर्त्यांना कृती कार्यक्रम देत आहेत.
तरुणांमध्ये नवचैतन्य
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अल्पावधीतच तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे. त्यांच्या माणसे जोडण्याच्या स्वभावामुळे अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकाभरात मोठ्या प्रमाणात बॅनर लागले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हे त्यांच्या लोकप्रियतेचे गमक आहे.
त्यांना उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा.