शिवचरित्र अभ्यासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. श्रीमंत कोकाटे यांचा विशेष लेख
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान होते. त्यांनी अनेक विषयांवर प्रभुत्व संपादन केले होते. त्यांनी विपुल लेखन केले. त्याचप्रमाणे उपेक्षित, वंचित, कष्टकरी, शेतकरी वर्गासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांनी आपल्या देशासाठी संविधान दिले. ते घटनातज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, कृषीतज्ज्ञ,जलतज्ज्ञ, तत्त्वज्ञानी, राजकीय नेते, धर्मअभ्यासक, संपादक, प्राध्यापक होते. तसेच ते इतिहासतज्ज्ञ देखील होते.अर्थशास्त्रज्ञ हा त्यांचा मूळचा पिंड होता. असे हे बहुआयामी महामानव होते.
ते छत्रपती शिवरायांच्या चरित्राचे मोठे अभ्यासक होते. शिवरायांच्या विचारांचे मोठे अनुयायी होते, पण ते अंधभक्त नव्हते. शिवचरित्राचे ते डोळस अभ्यासक होते. त्यांच्या साहित्यात छत्रपती शिवाजीराजांचे संदर्भ अनेक ठिकाणी प्रसंगानुरूप आलेले आहेत. त्यांच्या जगविख्यात अशा ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य कर्तृत्वाचे अनेक दाखले आलेले आहेत. त्यांच्या जातीनिर्मूलन या महत्त्वपूर्ण ग्रंथात अनेक ठिकाणी त्यांनी शिवरायांचे संदर्भ दिलेले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या लेटरहेडवर प्रथम “जय भवानी” आणि नंतर “जय शिवराय” असा उल्लेख करत होते. १ आज सर्व विचारधारांचे लोक “जय भवानी, जय शिवराय” असा जयघोष करतात, परंतु या घोषणेचे जनक कोण? असा प्रश्न जर महाराष्ट्राला विचारला, तर किती लोक योग्य उत्तर देतील? या प्रश्नाचे उत्तर आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर !
“जय भवानी जय शिवराय” ही घोषणा प्रथमत: डॉ. बाबासाहेबांचे आंबेडकर यांनी सुरू केली, २ असे अॅड. प्रकाश आंबेडकर देखील सांगतात.
25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन व चवदार तळ्याचे आंदोलन संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले सहकारी सहस्त्रबुद्धे, चित्रे, प्रधान बंधू, खोळवडीकर, गंगावणे, गायकवाड, गणपत बुवा जाधव, सूभेदार घाटगे, राजभोज वगैरेंना (३) घेऊन रायगडावर गेले. गड चढताना सर्व मंडळी “शिवाजी महाराज की जय” (४) असा जयंघोष करत होती. किल्ला चढताना वाटेत विखुरलेल्या तोफा त्यांनी व्यवस्थित केल्या, (५) जेणेकरून पर्यटकांना त्या पाहता येतील, म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रायगड मोठ्या आस्थेने पाहिला, असे वर्णन “बहिष्कृत भारत” या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या नियतकालिकात आलेले आहे. रायगडावर पोचल्यावर गडावरील सर्व वस्तू त्यांनी पाहिल्या, त्यानंतर सर्वजण शिवरायांच्या समाधीस्थळावर आले. महाराजांच्या समाधीवर तांब्याचा पुतळा बसवण्यात यावा वगैरे संबंधात अनेक वाटाघाटी झाल्या.(६)
शिवरायांच्या समाधीवर शिवरायांचा तांब्याच्या धातूचा पुतळा बसवावा, ही योजना प्रथमतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती. “बहिष्कृत भारत”मधील वर्णनावरून स्पष्ट होते. रायगड चढताना, पाहताना आणि उतरताना “शिवाजी महाराज की जय”(७) या घोषणा कायम दिल्या जात होत्या, हा वृत्तांत ‘बहिष्कृत भारत’मध्ये आलेला आहे.
बदलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्रिशताब्दीजन्मोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावकऱ्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देण्याचे निश्चित झाले. संयोजकांनी मुंबईला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रीतसर निमंत्रण दिले. ते निमंत्रण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत आनंदाने स्वीकारले. नियोजित कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३ मे 1927 रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबईवरून आपले सहकारी रा. नाईक, सिताराम नामदेव शिवतरकर, रा. गणपत महादू जाधव या मंडळींसह बदलापूर येथे आले. पाल्येशास्त्री, मेंबर्स काळे, सुळे, पाटील, मोकाशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत केले.
बदलापूर येथील शिवजयंतीच्या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विराजमान झाले. त्यांनी एक तासाच्या भाषणात शिवरायांच्या अंगच्या निरनिराळ्या गुणांवर प्रभावी असे भाषण केले. शिवरायांनी आपल्या लोकोत्तर गुणांनी राज्य मिळवले, पण पुढे पेशव्यांमुळे ते राज्य पुढे टिकले नाही, असे डॉ.आंबेडकर म्हणाले. त्यानंतर पाल्येशास्त्री यांच्याकडे सर्वांचे सहभोजन झाले. नंतर रात्री नऊ ते अकरा कीर्तन झाले. रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढारपणाखाली अदमासे पंधरा हजार लोकांचयसह शिवरायांची नगरात पालखी निघाली. अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बदलापूर येथे शिवजयंती उत्सव संपन्न झाला.(८)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ग्रंथसंपदा विपुल आहेत. यापैकी “शूद्र पूर्वी कोण होते?” हा एक त्यांचा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. त्या ग्रंथात डॉ. बाबासाहेबांनी शिवरायांच्या राज्याभिषेकप्रसंगी झालेल्या धार्मिक राजकारणाचे अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे.(९) ते मुळातच अभ्यास करण्यासारखे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील नामवंत शिल्पकार गजानन वडके यांच्याकडून शिवरायांचा पुतळा तयार करून घेतला.(१०)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांचे अनुयायी होते, पण ते अंधभक्त नव्हते, ते डोळस आणि चिकित्सक होते. त्यांचे शिवरायांच्या कार्यकर्तृत्वावर, ऐतिहासिक स्थळांवर नितांत प्रेम होते. त्यांनी शिवरायांवर वास्तव स्वरूपात लेखन केले. त्यांनी शिवरायांचा इतिहास लिहून, सांगून शिवप्रेमींचे प्रबोधन केले. शिवरायांचे शौर्य, समता, गुणवत्ता यांचा त्यांनी जयघोष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिवचरित्राचा उपयोग विधायक कार्यासाठी केला. अशा महामानावाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
– डॉ. श्रीमंत कोकाटे
(शिवचरित्रावर पीएच.डी.)
संदर्भसूची
१ सावंत इंद्रजीत, शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध आणि बोध, सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र, आवृत्ती तिसरी, 2017, पृष्ठ क्रमांक 102.
२ ॲड . आंबेडकर प्रकाश, शिवरायांवरील भाषण, यू-ट्यूब
३ संपादक- नरके हरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, प्रधान सचिव- उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, द्वितीय आवृत्ती, 2008, पृष्ठ क्रमांक 172.
४ तत्रैव, पृष्ठ क्रमांक 172.
५ तत्रैव, पृष्ठ क्रमांक 172.
६ तत्रैव, पृष्ठ क्रमांक 172.
७ तत्रैव, पृष्ठ क्रमांक 173.
८ तत्रैव, पृष्ठ क्रमांक 37.
९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, (मराठी अनुवाद -चांगदेव भगवान राव खैरमोडे), शूद्र पूर्वी कोण होते?, सुगत प्रकाशन, नागपूर, द्वितीयावृत्ती 1974, पृष्ठ क्रमांक 215.
१० पूर्वोक्त, सावंत इंद्रजित, पृष्ठ क्रमांक 106.