
थिंक टँक / नाना हालंगडे
ग्लोबल टीचर रणजित डिसले यांना सळो की पळो करून सोडणारे, सतत विविध तक्रारींमुळे चर्चेत असलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई नुकतीच झाली आहे.
पाचवी ते आठवीचे वर्ग वाढण्यासाठी एका स्वयंअर्थसहाय शाळेने वर्गवाढीच्या परवानगीची मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे केली होती. त्याचा आयडी देण्यासाठी ५० हजारांची लाच शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मागितली. सुट्ट्यांमुळे पैसे द्यायला थोडा विलंब झाला होता. सोमवारी तक्रारदाराला कार्यालयात बोलावून त्याच्याकडून २५ हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी परिसरात दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार यांना रंगेहाथ पकडले.
किरण लोहार यांच्या सोबतच एका लिपिकास यावेळी पकडण्यात आले आहे. किरण लोहार यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा पदभार घेऊन साधारण 13 महिने झाले होते मात्र त्यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज पाहिले तर कायमच वादग्रस्त राहिले आहे. कोणतीही फाईल वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नव्हती अशा तक्रारी वारंवार ऐकण्यास मिळत होत्या. शेवटी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा हातोडा पडलाच.
या प्रकरणातील तक्रारदार यांची उत्तर सोलापूर तालुक्यात एक स्वयं अर्थसहाय्य शाळा आहे त्यांच्या यूडायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती . तडजोडी यांनी 25000 देण्याचे ठरले मात्र तक्रारदार यांनी अँटी करप्शन विभागाशी संपर्क साधून तक्रार केली . सोमवारी जिल्हा परिषदेच्या त्यांच्या कार्यालयात पाच वाजून 45 मिनिटांनी त्यांना 25000 घेतल्याचे रंगेहात पकडण्यात आले.
काल पुरस्कार, आज लाच
शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याविरूध्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे अनेक शिक्षकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी स्वामी यांनी लोहार यांना नोटीस काढून काहीही न बोलण्याचा सल्ला दिला होता. रविवारी ( ता . ३० ) लोहार यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील , राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता .
त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते लाच घेताना रंगेहाथ पकडले , हे विशेष . लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक उमेश महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
या धाडसी कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठे खळबळ उडाली आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी जागतिक दर्जाचे ग्लोबल टीचर डिसले गुरुजी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्याने लोहार हे राज्यभरात चर्चेत आले होते. डिसले यांचे प्रकरण लोहार यांनी खूपच ताणून धरले होते.
त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत होती. आपण स्वतः अत्यंत शिस्तप्रिय आणि पारदर्शी शिक्षणाधिकारी आहोत याचा सतत आव आणणाऱ्या शिक्षणाधिकारी लोहार यांच्या या लाचेच्या कारवाईमुळे त्यांचा खरा चेहरा उघडा पडला आहे. यासोबतच जिल्हा परिषदेची अब्रू ही चव्हाट्यावर आली आहे.