शिक्षकांचे व्यक्तीमत्व घडविते आदर्श विद्यार्थी

- प्रा.अॅड. दिनेशकुमार सहारे यांचा विशेष लेख

Spread the love

शिक्षकदिनाच्या (Teachers Day) निमित्ताने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी शिक्षकाचं स्थान अनन्यसाधारण असते. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा आदर्श. शिक्षकाच्या प्रत्येक हालचालीवर विद्यार्थ्यांची नजर असते. त्यामुळेच की काय शिक्षक सर्वगुणसंपन्न असेल तर त्याच्या सानिध्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी शिक्षकासारखेच किंबहुना त्याहूनही सरस असेच प्रतिभासंपन्न घडत असतात. याला इतिहासाची साक्ष आहे. माझ्या अल्पशा शैक्षणिक प्रवासात वर्ग १ ते ५ पर्यत लाभलेले राऊत सर खरेच माझे आदर्श होते. त्यावेळच्या चिमुकल्या दृष्टीलाही राऊत सरांचा मनोमन आदर होता. त्यांचे निटनेटके राहणीमान, साधी केसरचना, उंच आणि काहीसा हडकुळा बांधा, सावळा पण तजेलदार वर्ण. एकंदरीत आकर्षक व्यक्तीमत्व. मी त्यांच्या प्रत्येक गोष्टी जवळून बघायचो. त्यांच्या हातावर गोंदलेले त्यांचे नाव, त्यांच्या खोलीत शाळेची चावी आणायला जायचो तेव्हा त्यांच्या खोलीतील सामानाची रचना, या साऱ्या गोष्टींचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आणि जीवन जगण्याचा एक नवीनच मार्ग गवसला.

राऊत सरांची पहिली नियुक्ती माझ्या गावीच झाली. अतिशय दुर्गम असा प्रदेश, वाहतुकीच्या साधनांचा अभाव, आधुनिक सुखसोईंचा तुटवडा, वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवतांना होणारा भाषेचा त्रास या सर्व समस्यांवर मात करीत सरांनी आपल्या आयुष्याची बहुमुल्य अशी पाच वर्षे माझ्या गावातील कौलारू शाळेत घालवितानाच माझ्यातला विद्यार्थी हेरला. या पाच वर्षात मी सरांच्या सर्व चांगल्या गोष्टी जवळून बघितल्या. आयुष्यात चांगल्या व्यक्तीचा सहवास फार कमी काळ लाभतो आणि लाभलेला सहवासच आयुष्यभर पुरणारी आणि पुरुनही उरणारी शिदोरी ठेवून जातो. याची आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रचिती आली.

आमच्या WhatsAap Group ला ज्वाईन व्हा : https://chat.whatsapp.com/CGzx2Z4spwMFLjqjQbMzgc

प्राथमिक शाळेत असताना मी एक नामांकित असाच विद्यार्थी होतो. कोणतीही गोष्ट शिताफिनं आणि सर्वप्रथम करण्यात माझा हातखंडा. वर्गात नेहमी पहिला क्रमांक. शाळेचा गणवेश नेहमी स्वच्छ आणि चकचकीत. एकंदरीत काय तर अतिदुर्गम गाव – खेडयातील सर्वात आकर्षक आणि जागरुक विद्यार्थी अशीच राऊत सरांसमक्ष माझी प्रतिमा असायची. मनात इवलीशी इच्छा असायची की एक दिवस नक्कीच राऊत सरांसारखे बनेल. पण म्हणतात ना की इच्छेला जोपर्यंत दुर्दम्य महत्त्वाकांक्षेची साथ लाभत नाही तोपर्यंत इच्छा निष्फळ असते. ज्याप्रमाणं कोलंबस समुद्राला आम्हान देताना म्हणतो,

“अनंत आमची ध्येयशक्ती अनंत अमुच्या आशा, किनारा तुला पामराला…”

आज मागील पटावर जेव्हा दृष्टीक्षेप टाकतो तेव्हा राऊत सरांच्या सहवासात गेलेला एकेक क्षण आठवतो. आठवतात ते कबड्डी आणि खो – खोचे मैदान आखतानाचे प्रसंग, ध्वजारोहजासाठी सरळ आणि लांब खांब शोधण्यासाठी जंगलातील भटकंती, नवोदय विद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून सरांनी दिलेली गणिताची शिकवणी, खो – खो खेळतांना सरांना वेलीतच बाद करण्याची चुरस, वर्गात गोंडी बोलायचं नाही म्हणून सरांनी दिलेली दमदाटी.. आणखी बरंच काही. त्यासोबतच हेही कटु सत्य की ते प्रसंग पुन्हा न घडणारे .. मी पण सरांच्या पावलावर पाउल टाकून त्यांच्यासारखाच आदर्श व्यक्तीमत्व बनण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार … ” कायदयाचा अभ्यास करून माझ्या हातून नामांकित वकील , न्यायाधिश घडविणार तसेच विधी क्षेत्रातील अनेक प्रतिमासंपन्न व्यक्ती घडविणार.. विविध सामाजिक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून आपले अस्तित्व सिध्द करण्याचा प्रयत्न करणार. समाजातील हीन – दीन, शोषित, पीडित लोकांच्या न्यायहक्कांसाठी न्यायालयीन लढाई लढून त्यांना न्याय मिळवून देण्यास खारीचा वाटा उचलणार आहे… हो हे सर्व होईल पण सरांची सर मला नाही येणार! खरंच त्यांच्यासारखे तेच.
My mentor for forever!

– प्रा.अॅड. दिनेशकुमार सहारे
रा.तु.म. नागपूर विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आबेडकर विधी महाविद्यालय (मुख्य शाखा) नागपूर
मो.8421505323

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका