थिंक टँक / नाना हालंगडे
शेतशिवाराचं रक्षण व्हावं म्हणून शेतकरी बांधावर, शिवेवर म्हसोबाची स्थापना करतात. अचानक हाच म्हसोबा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात येऊन बसला. रस्त्याने जाणाऱ्यांना धक्काच बसला. तेवढ्यात म्हसोबाच्या नावानं चांगभल…. हे मस्होबा देवा तूच आता खड्ड्याने जर्जर झालेल्या या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे रक्षण कर रे देवा… अशा घोषणा ऐकू आल्याा.
महूद ते वेळापूर मार्गावर तरुणांनी रस्त्यावरील खड्ड्यात म्हसोबाची स्थापना करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करून या रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सांगोला तेअकलूज या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आले आहे. हा नवीन राष्ट्रीय महामार्ग पाटस-बारामती-इंदापूर-अकलूज-वेळापूर-महूद-सांगोला-जत असा असून त्यास एन.एच.९६५ जी हा क्रमांक देण्यात आला आहे. सांगोला-महूद-अकलूज या मार्गावर गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती व्हावी ही मागणी वारंवार होत आहे. गेल्या काही वर्षापासून या रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या राष्ट्रीय महार्गामधील महूद ते सांगोला या २४.०६ की.मी.रस्त्याचा कामासाठी २५५ कोटी मंजुरी मिळाली आहे. या कामाची निविदा ही प्रसिद्ध झाली आहे.महूद ते सांगोला हा प्रवास रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अतिशय खडतर आहे.मात्र या कामास मंजुरी मिळाली असली तरी काम होईपर्यंत अजूनही या खडतर मार्गानेच प्रवास करावा लागणार आहे.
महूद ते सांगोला रस्त्याचा प्रश्न निकाली निघणार असला तरीही महूद ते वेळापूर हा रस्ताही अतिशय जीवघेणा झालेला आहे.गेल्या अनेक वर्षापासून यावर कोणतेही काम न झाल्याने जागोजागी खड्डे आहेत. जत, सांगोला मार्गे पुणे व मुंबईकडे होणारी प्रवासी आणि जड मालाची वाहतूक याच मार्गाने होत आहे. सध्या साखर कारखाने सुरू असल्याने याच मार्गाने उसाची वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर होत आहे. सर्वच प्रकारच्या वाहन चालकांना महूद-वेळापूर-अकलूज या रस्त्याने प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
या मार्गावर अनेक वेळा झालेल्या अपघातांमध्ये निष्पापांचे बळी गेलेले आहेत. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ऊस वाहतूक करणारी वाहने रस्त्यामध्येच बिघाड होऊन उभी असलेली दिसतात. वाहना बरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
महूद- वेळापूर-अकलूज मार्गाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी वारंवार केली जात आहे.मात्र प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलेला आहे.
रस्त्याच्या या दुरावस्थेकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी अनेक वेळा निवेदने दिली.रास्ता रोको आंदोलन केले.रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण ही केले. मात्र तरीही प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने येथील तरुणांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
शेत-शिवाराचे रक्षण करणाऱ्या रखवालदार म्हसोबाला चक्क महामार्गावरील खड्ड्यात आणून बसविले.त्यास शेंदूर थापून हार घातला.उदबत्त्या लावून आरतीही केली.लोकप्रतिनिधी व प्रशासन यांना जाग यावी व त्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीकडेेे गांभीर्याने पहावे.अशी मागणी त्यांनी मस्होबाकडे केली. या रस्त्याने प्रवास करणाऱ्या्या प्रवाशांचेही रक्षण करण्याची प्रार्थना मस्होबाकडे केली.हा आंदोलनाचा अनोखा प्रकार सर्वांनाच चकीत करणार आहे.
या आंदोलनात कैलास खबाले, काका नागणे,संचित लोखंडे,सुनील जाधव,स्वप्निल धोकटे,ईश्वरा कोळेकर,नागू कांबळे,बाहूबली दोशी,बबलू बोडरे, आप्पा जाधव आदी तरुण सहभागी झाले होते.