वासूद अकोल्यात सख्या भावाने केला भावाचा खून
ऐन दीपावलीत सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना
थिंक टँक न्यूज नेटवर्क : एच. नाना
शेतजमिनीच्या कारणावरून चिडलेल्या भावाने झोपेतच सख्ख्या भावाच्या डोक्यात काहीतरी मारुन त्यास जीवे ठार मारून खून केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री रात्री १२:३० च्या सुमारास अकोला ता. सांगोला येथील चिंचमळा वस्तीवर घडली. समाधान सुखदेव कदम वय -३४ असे मृताचे नाव आहे. याबाबत मृताची पत्नी गीतांजली समाधान कदम यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी तात्यासाहेब उर्फ संतोष सुखदेव कदम रा.अकोला ( चिंचमळा )याचे विरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
अकोला( चिंच मळा) ता.सांगोला येथील समाधान सुखदेव कदम यांची जनावरे सख्ख्या भाऊ तात्यासाहेब उर्फ संतोष सुखदेव कदम यांच्या शेतात जात होती तर शेत जमिनीच्या बांधाच्या कारणावरून मागील सात-आठ महिन्यांपासून तात्यासाहेब हा भाऊ समाधान यास शिवीगाळी दमदाटी करीत भांडण करीत होता. तो त्यास तुला तीन मुली आहेत, तुला जमीन कशाला पाहिजे , मला दोन मुले आहेत, मला जमीन पाहिजे असे म्हणून तुम्हा दोघांनाही महिन्यात खल्लास करतो अशी धमकी त्याने दिली होती . समाधान हा चिंचमळा येथील वस्तीवर झोपला असताना मध्यरात्री १२:३० च्या सुमारास तात्यासाहेब उर्फ संतोष कदम यांनी भाऊ समाधान हा झोपेत असताना काहीतरी त्याच्या डोक्यात घालून जीवे ठार मारून खून केला. त्याने एवढ्यावरच न थांबता शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे जनावरांच्या गोठ्यातील शेण गहाण काढून घरात निवांत बसला होता.
या घटनेची माहिती वडील सुखदेव कदम यांनी समाधानची पत्नी गीतांजली हीस कळवली तर पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती सांगोला पोलीस स्टेशनला दिली.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील पोलीस निरीक्षक सुहास जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू राजुलवार यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृताचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे पाठवून दिला तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राजुल वार करीत आहेत