सांगोला/नाना हालंगडे
बहुजन नायक वामन मेश्राम हे आज सांगोला दौऱ्यावर आहेत. रविवार, 26 रोजी सकाळी ठिक 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे त्यांचे आगमन होईल. त्यांच्या स्वागतासाठी व बहुजन महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पाहार अर्पण करण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी केले आहे.
भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी व ओ.बी.सींची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी अहोरात्र संघर्ष करणारे बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम हे सांगोला शहाराला सदिच्छा भेट देणार आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे मेश्राम यांचे बहुजन समाजाच्या वतीने स्वागत व सत्कार होणार आहे.
त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. नंतर राजमाता अहिल्यामाई होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले जातील.
तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन बामसेफ व सहयोगी संघटना सांगोला यांच्यातर्फे करण्यात आले आहे.