वादळी शिवशाहीराची अखेर
बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
मुंबई : थिंक टँक न्यूज नेटवर्क
सुप्रसिध्द इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्याचे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. कालपासून त्यांचे निधन झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शिवशाहीर अशी बिरुदावली मिरवणारे बाबासाहेब पुरंदरे यांचे उभे आयुष्य वादळी होते. त्या घटनांना देण्यात आलेला उजाळा.
कोण होते बाबासाहेब पुरंदरे?
बाबासाहेब पुरंदरे शिवशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्याचं जन्म नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुण्याजवळच्या सासवड इथे झाला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ग्रंथ लिहिले आहेत. त्यामध्ये राजमाता जिजाऊ यांची बदनामी झाल्याचा आरोप पुरोगामी चळवळीतील लोकांनी केला होता. हा वाद अद्यापही मिटलेला नाही.
पुरंदरे यांनी 29 जुलै 2021 रोजी वयाच्या शंभरीत पदार्पण केले.’राजा शिवछत्रपती’ ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती मानली जाते. तसंच जाणता राजा हे नाटकही लोकप्रिय आहे. जाणता राजा या नाटकाचे 1200हून अधिक प्रयोग झाले आहेत. हे नाटक 5 भाषांमध्ये भाषांतरित झालं आहे.
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बारा हजारहून अधिक व्याख्याने दिली आहेत.
ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललिक कादंबरी लेखन, नाट्य लेखन बाबासाहेब पुरंदरे यांनी केले आहे.
पुरस्कारांनी गौरविण्यात आले
बाबासाहेब पुरंदरे यांना 2015 मध्ये महाराष्ट्रभूषण तर 2019 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
वादळी शिवशाहीराची अखेर
बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या पुस्तकात राजमाता जिजाऊ यांची बदनामी केल्याची मांडणी करण्यात येते. यावरून कित्येक वर्षांपासून वाद सुरू आहे. पुरंदरे यांनी त्यांच्या हयातीत हा वाद मिटवला नाही.