वाटंबरे येथे पशूवैद्यकीय कर्मचाऱ्यास बेदम मारहाण, एकावर गुन्हा
सांगोला (डॉ. नाना हालंगडे) : पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर कोठे आहेत? डॉक्टर नसताना तुम्ही का दवाखाना उघडला? असे म्हणून पशूवैद्यकीय कर्मचाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी करून हाताने, लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना वाटंबरे (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे घडली आहे.
याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून संतोष मधुकर पवार (रा. वाटंबरे, ता. सांगोला) याच्याविरुद्ध सांगोला पोलिसात शिवाजी बाबा लवटे (रा. निजामपूर, ता. सांगोला) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की दि. 13 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पशुवैद्यकीय दवाखाना वाटंबरे (ता. सांगोला) येथील परिचर शिवाजी बाबा लवटे व त्याचा मित्र सागर सुभाष व्हनमाने (रा. जुनोनी, ता.सांगोला) हे कामाच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी संशयित आरोपी संतोष मधुकर पवार हा तेथे आला. पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर कोठे आहेत? डॉक्टर नसताना तुम्ही का दवाखाना उघडला? असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी व दगडाने मारून सरकारी कर्मचाऱ्यास जखमी केले व सरकारी कामात अडथळा आणला. म्हणून फिर्यादीने सांगोला पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
अधिक तपास सांगोला पोलीस करत आहेत.