‘वंचित’ला सोलापूरात खिंडार, प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे राष्ट्रवादीत जाणार

दोन नगरसेवकांसह करणार प्रवेश, राष्ट्रवादीची खेळी यशस्वी

Spread the love

सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीला सोलापूरात खिंडार पडले आहे. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर व जिल्ह्यात वंचितची ताकद वाढवणारे प्रदेश प्रवक्ते तथा सोलापूरचे नगरसेवक आनंद चंदनशिवे हे दोन नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी महापालिका व दोन वर्षांनंतर येणा-या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या राजकीय उलथापालथीने वंचित बहुजन आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

कोण आहेत आनंद चंदनशिवे?
आनंद चंदनशिवे हे मूळचे बहुजन समाज पार्टीचे कट्टर कार्यकर्ते. ते स्वत: 2017 च्या महापालिका निवडणुकीत विजयी झाले. सोबत दोन नगरसेवकांनाही निवडून आणले. महापालिकेतील गटनेते म्हणून त्यांनी आपल्या कामाचा झंझावात तयार केला. सत्ता कोणाचीही असो, अाक्रमक स्वभाव व कामाच्या हातोटीद्वारे आपल्या प्रभागात सर्वाधिक निधी आणून सर्वाधिक विकासकामे करणारा नगरसेवक अशी त्यांची सोलापूरात प्रतिमा आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चंदनशिवे यांनी दोन नगरसेवकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे वंचितला सोलापूरात बळ मिळाले. दरम्यान, वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरात उमेदवारी घोषीत केली. त्यांच्या पाठिशी खंबीरपणे जनसमुदाय उभा करून निवडणूक चुरशीची बनविण्यात चंदनशिवे अग्रभागी होते.

विधानसभा निवडणुकीत दिली भाजपला टक्कर
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्याविरोधात शहर उत्तर विधानसभा मतदार संघातून चंदनशिवे यांनी निवडणूक लढवली होती. त्यात चंदनशिवे यांना 27 हजार मते मिळाली होती. ही मते द्वितीय क्रमांकाची होती.

राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याचा निर्णय
वंचितचे प्रदेश प्रवक्ते आणि सोलापूर महापालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे हे आपल्या दोन नगरसेवकांसह वंचितला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. अखेर चर्चेअंती त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हातावर बांधण्याचा निर्णय घेतलाय. चंदनशिवे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. त्यांनी मागील चार महिन्यांपासून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बरोबर सलगी वाढवली होती. ना. भरणे यांच्या मध्यस्थीने मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. अजित पवारांकडून ग्रीन सिग्नल येताच चंदनशिवे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

महापालिकेत वाढेल राष्ट्रवादीची ताकद
बहुजन समाज पार्टीतून आनंद चंदनशिवे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. मात्र आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकण्या निर्णय घेतलाय.आनंद चंदनशिवे यांच्यासोबत नगरसेवक गणेश पुजारी ,ज्योती बमगोंडा हे दोन नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. आनंद चंदनशिवे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पालिकेतील राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

अवघ्या काही महिन्यातच सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत आपले सत्तास्थान बळकट करण्याची तयारी राष्ट्रवादीने आतापासूनच चालविलीय. दत्तात्रय भरणे हे पालकमंत्री बनल्यापासून राष्ट्रवादीत अनेकजणांनी प्रवेश केला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळाही घडून आला. शिवसेनेचे नेते महेश कोठे, एमआयएमचे नेते तौफीक शेख यांच्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंद चंदनशिवे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने सोलापूरचे राजकारण निवडणुकीला अवधी असतानाच तापू लागले आहे.

हेही वाचा : आंबेडकरी जनतेचा दीपस्तंभ

काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले महेश कोठे हे कित्येक वेळा राष्ट्रवादीच्या मंचावर उघडपणे दिसून आले आहेत. मात्र राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघेही सत्तेत एकत्रित असल्याने अद्याप तरी महेश कोठे यांचा राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश झालेला नाही. मात्र ते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख हे देखील आपल्या सहकारी नगरसेवकांसह राष्ट्रवादीत जाण्यासाठी इच्छुक दिसत आहेत. तौफीक शेख यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. आनंद चंदनशिवे, तौफिक शेख, महेश कोठे या तिघांमुळे राष्ट्रवादीला हत्तीचे बळ मिळणार आहे.

वंचित’साठी धोक्याची घंटा
नगरसेवक आनंद चंदनशिवे हे दोन नगरसेवकांसह वंचित बहुजन आघाडीत आले होते. सोलापूर महापालिकेत वंचितचे गटनेतेपद त्यांनी मिळवले होते. त्यांच्या कामाचा धडाका पाहून वंचित बहुजन आघाडीने त्यांना राज्याचे प्रदेश प्रवक्तेपद दिले होते. ते मुंबईतील अनेक बैठकांतही दिसत होते. मात्र सहा महिन्यांपासून ते वंचितपासून अलिप्त असल्याचे दिसत होते. वंचित बहुजन आघाडीला चंदनशिवे यांनी सोलापूरात ताकद मिळवून दिली होती. चंदनशिवे हेच आता बाहेर पडणार असल्याने सोलापूरात चंदनशिवे यांच्या ताकदीचा एकही नेता वंचितकडे नाही. आगामी निवडणुकांच्या तोंडावर आत्मचिंतन करण्याची वेळ वंचितवर आली आहे.

हेही वाचा

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक जयंत पवार यांचे निधन

महाराष्ट्रातील कोणत्याही कलाकाराला उपाशी मरू देणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका