लोकशाही भंगारात निघू नये म्हणून भंगारवाला बनून मैदानात उतरायला हवे…!

डॉ. विजय चोरमारे यांचा बेधडक लेख

Spread the love

‘अमुक अमुक अंगार है… बाकी सब भंगार है.. ‘ अशा घोषणा ज्या नेत्यांसाठी दिल्या जात होत्या अशा डझनावारी नेत्यांचे एका नोटिशिवर मांजर झाल्याचे चित्र अलीकडच्या काळात पाहायला मिळाले आहे. त्यामुळे अंगार भंगारची घोषणा देताना यापुढे सगळ्यांनाच विचार करावा लागेल !

क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला झालेली अटक हा अपहरण आणि खंडणीचा मामला आहे, असा आरोप करून त्याच्या पुष्ट्यर्थ ढीगभर पुरावे सादर करून कौशल्य विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी अलीकडच्या काळातले शोधपत्रकारितेचे एक अनोखे उदाहरण सादर केले आहे. तमाम प्रसारमाध्यमे सत्ताधा-यांच्या ओंजळीने पाणी पीत असताना आणि प्रचार म्हणजेच पत्रकारिता असा समज बळकट केला जात असल्याच्या काळात नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणाचा केलेला पाठपुरावा थक्क करणारा आहे. खरेतर ही गोष्ट कुठलेही चॅनल किंवा वृत्तपत्र करू शकले असते. परंतु फिल्डवरचे पत्रकार माहिती देणा-या अधिका-याचे म्हणजे वृत्तपत्रीय भाषेत आपल्या सोर्सचे हितसंबंध जपण्याचा प्रयत्न कसोशीने करीत असतात. संबंधित अधिका-याला सिंघम वगैरे फोकनाड विशेषणे लावून त्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याच्या अनेक चुका डोळ्यासमोर घडत असताना त्यासंदर्भात प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवत नाहीत. पत्रकारांची हीच मानसिकता हेरून अनेक अधिकारी आपल्याला सोयीस्कर बातम्या पसरवण्यासाठी त्यांचा वापर करून घेत असतात. रिया चक्रवर्ती प्रकरणापासून ते तमाम बॉलीवूडला वानखेडे आणि टोळीने वेठीस धरले होते त्यासाठी या पत्रकारांचा आणि वाहिन्यांचाही वापर करून घेतला जात होता, हे त्यांच्या गावीही नसावे.

क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणातल्या दोन ठळक गोष्टी आहेत, त्यासंदर्भात माध्यमांनी त्याच वेळी प्रश्न विचारायला हवे होते. आठ ते दहा जणांना अटक केली आहे, असे वानखेडे यांनी सांगितले त्यात कुणालाही काही चुकीचे वाटले नाही. आठ जणांना असू शकते किंवा दहा जणांना. आठ ते दहा कसे काय असू शकते? दुसरी गोष्ट म्हणजे किरण गोसावीचा आर्यन खानसोबतचा सेल्फी प्रसिद्ध झाल्यानंतर घाशीराम कोतवाल नाटकातल्यासारख्या वेशभूषेतला हा टकलू मनुष्य कोण, असा प्रश्न कुणी उपस्थित केल्याचे आठवत नाही. वानखेडेंच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या लोकांना असा प्रश्न विचारावासा वाटला नाही. नवाब मलिक यांनी यासंदर्भात तसेच नंतरही काही गंभीर प्रश्न उपस्थित केल्यानंतर एनसीबीला धारेवर धरण्याऐवजी काही पत्रकार सुपारी घेऊन त्या पार्टीत अमूक अमूक नेत्याचा मुलगा होता काय वगैरे प्रश्न विचारत होते, आणि त्याच्या बातम्याही केल्या जात होत्या. नवाब मलिक यांनी एका मोठ्या विषयाला हात घातल्यामुळे त्यांच्या आरोपांना प्रसिद्धी देण्याशिवाय पर्याय नव्हता. पण एवढी पोलखोल होऊनही कुणी एनसीबीच्या कार्यपद्धतीबद्दल, त्याच्या गेल्या वर्षभरातील संशयास्पद कारवायांबद्दल उत्खनन करण्याचा प्रयत्न केला नाही. हेच जर उलट्या बाजूने घडले असते तर प्रसारमाध्यमे कशी वागली असती, याचा विचार केलेला बरा!

मूळ मुद्दा आहे नवाब मलिक यांनी उभ्या केलेल्या लढाईचा. जावयावर कारवाई झाली म्हणून नवाब मलिक आरोप करीत आहेत, असे एनसीबीचे अधिकारी, भाजपचे तमाम नेते आणि ट्रोल गँग म्हणत आहेत. अर्थात त्यात तथ्य आहेसुद्धा. परंतु त्यामागची वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतरच्या काळात एनसीबीच्या कारवायांसंदर्भात नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे दुखावलेल्या समीर वानखेडे यांनी मलिक यांचे जावई समीर खान यांना खोट्या आरोपात अडकवले, असा नवाब मलिक यांचा दावा आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यासंदर्भात अशी सुडाची कारवाई होत असेल तर बॉलीवूडच्या लोकांना किती त्रास दिला जात असेल, याची कल्पन त्यांना आली. कारण बॉलीवूडच्या कुणाही कलावंताचे ड्रग्ज प्रकरणात नाव आले तरी त्याच्या अनेक जाहिराती काढून घेतल्या जातात, त्याअर्थाने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात वानखेड़े यांचा `कॉफी विथ बॉलीवूड`चा जो सिलसिला सुरू आहे, त्यातून किती ‘अमृत’ निघाले असेल, त्याची कल्पनाही सामान्य माणूस करू शकणार नाही. समीर खान यांना जामीन मिळाल्यानंतर काही दिवसांतच क्रूझवरील ड्रग्ज प्रकरण समोर आले. आणि नवाब मलिक यांना मधल्या काळात शोधमोहीम राबवून मिळवलेली माहिती लोकांसमोर मांडण्याची आयती संधी मिळाली. किरण गोसावीच्या सेल्फीने त्याला चालना मिळाली. आता या प्रकरणात आर्यन खान अलगद सापडला, की समीर वानखेडे सापडले, याचे नेमके उत्तर मिळण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. परंतु वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीची जी नावे समोर आली आहेत, उदा. किरण गोसावी, मनीष भानूशाली, फ्लेचर पटेल, सॅम डिसूझा, प्रभाकर सैल वगैरें ही वानखेडे यांच्या एकूण कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणारी आहेत. शिवाय मोहित कांबोज, सुनील पाटील, विजय पगारे, नीरज यादव, धवल भानूशाली वगैरे मंडळींचा तपशील अजून पुरेसा बाहेर आलेला नाही.

एनसीबी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर अंमली पदार्थांविरोधात काम करणा-या अनेक संघटनांशी संलग्न राहून काम करणारी संघटना आहे. तिच्यावर खंडणीखोरीचे आरोप होणे ही नुसती लाजिरवाणी नव्हे, तर जागतिक पातळीवर नाचक्की करणारी बाब आहे. इतके गंभीर आरोप झाल्यानंतरही एनसीबीकडून मात्र तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वानखेडे यांच्यावर आरोप होत असताना त्यांच्या समर्थनासाठी पुढे येणारे ज्ञानेश्वर सिंग यांच्याकडे त्यांची चौकशी सोपवण्याचा प्रकार त्यातलाच होता. समीर वानखेडे यांना सहा प्रकरणाच्या तपासांतून हटवल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यासंदर्भात सारवासारव करून एनसीबीने या प्रकरणात आपण कसे पुढे जाणार आहोत, याची झलकच दाखवली. अर्थात मुंबई पोलिसांची एसआयटीही चौकशी करीत असल्यामुळे सत्य दडपले जाणार नाही, असे सध्यातरी वाटते. पुढे महाराष्ट्र सरकारने किंवा गृहखात्याने माती खाल्ली तर त्याला कुणाचाच इलाज नाही

सध्या एकटे नवाब मलिक लढताहेत. परिणामांची तमा न बाळगता एकट्याच्या बळावर ते एनसीबीसारख्या यंत्रणेला भिडले आहेत. सत्तेचा आणि अधिकाराचा गैरवापर करून कुटुंबाला नाहकपणे त्रास दिल्यानंतर दुखावलेला अन्यायग्रस्त माणूस किती जिद्दीने एखाद्या शक्तिमान यंत्रणेविरुद्ध उभा राहतो, याचे अलीकडच्या काळातील उदाहरण म्हणून नवाब मलिक यांच्या या लढाईकडे पाहता येते.

भंगारवाला, हे खरंतर नवाब मलिक यांची हेटाळणी करण्यासाठी त्यांच्या विरोधकांनी वापरलेले विशेषण. परंतु दूषण म्हणून वापरलेले विशेषण नवाब मलिक यांनी भूषण म्हणून मिरवले आणि सुरू केलेल्या लढाईतून इंचभरही मागे हटणार नसल्याचे संकेत देताना ते म्हणाले, “होय, मी भंगारवाला आहे. माझे कुटुंबीय आजही हा व्यवसाय करतात, त्याचा मला अभिमान आहे. पण भंगारवाला काय करू शकतो, हे या लोकांना माहिती नाही. उपयोगात नसलेली वस्तू तो उचलून आणतो. त्याचे तुकडे करतो आणि शेवटी भट्टीत टाकून पाणीपाणी करण्याचं काम भंगारवाला करतो. या शहरात जेवढे म्हणून भंगार आहे, त्या सगळ्याचे एकएक नटबोल्ट खोलून भट्टीत टाकणार आहे. त्यांचं पाणीपाणी केल्याशिवाय हा नवाब मलिक भंगारवाला थांबणार नाही.”

समीर वानखेडे यांच्याकडून अन्याय झालेल्या लोकांनी पुढे येऊन बोलावे, असे आवाहन मलिक यांनी केले आहे. परंतु त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे धाडस बॉलीवूडमध्ये दिसत नाही, दिसणारही नाही. कारण एनसीबीच्या विरोधात गेले तर उद्या इन्कमटॅक्सची धाड पडू शकेल, ईडीची नोटिस येऊ शकेल किंवा एखाद्या दहशतवादी प्रकरणात गुंतवायला एनआयए मागेपुढे पाहणार नाही. देश म्हणून सरकारी दहशत कुठल्या थरापर्यंत पोहोचली आहे याचे हे निदर्शक आहे. सामान्य माणूस, त्याचे मानवी हक्क, स्वातंत्र्य आणि एकूणच लोकशाही भंगारात निघण्याची वेळ आली आहे. अशा काळात लोकशाही आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी या यंत्रणेशी भिडायचे असेल तर भंगारवाला बनून मैदानात उतरण्याची गरज आहे, हेच नवाब मलिक यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.

‘अमुक अमुक अंगार है… बाकी सब भंगार है.. ‘ अशा घोषणा ज्या नेत्यांसाठी दिल्या जात होत्या अशा डझनावारी नेत्यांचे एका नोटिशिवर मांजर झाल्याचे चित्र अलीकडच्या काळात पाहायला मिळाले आहे. त्यामुळे अंगार भंगारची घोषणा देताना यापुढे सगळ्यांनाच विचार करावा लागेल !

– डॉ. विजय चोरमारे (ज्येष्ठ पत्रकार, मुंबई)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका