लोकमान्य टिळक ते क्रांतिकारक गांधी!
ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचा सडेतोड लेख
लोकमान्य टिळक हे खरोखरच असामान्य असे महापुरूष. तेजस्वी प्रतिभावंत आणि सर्वगामी बुद्धिमत्ता असलेले. कॉंग्रेस नावाचा ‘डिबेटिंग क्लब’ हे आक्रमक आंदोलन झाले, ते लोकमान्यांमुळे. लोकमान्य ज्या ‘तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी’ म्हणून मानले गेले, त्या तेल्यांविषयी आणि तांबोळ्यांविषयी- जातपितृसत्तेविषयी त्यांचे काय मत होते, हे सर्वज्ञात आहे. त्याविषयी इथे मांडणी करत नाही. पण, कॉंग्रेस आक्रमक अशी चळवळ व्हावी, हा प्रयत्न लोकमान्यांचाच. त्यासाठी त्यांनी अनेकविध कल्पना लढवल्या आणि त्यातून कॉंग्रेसला जनाधार मिळू लागला.
कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर पाच वर्षांनी म्हणजे १८९० मध्ये लोकमान्य कॉंग्रेसमध्ये आले आणि अल्पावधीतच महत्त्वाचे नेते झाले. १९०५ च्या बंगालच्या फाळणीनंतर तर ‘लाल-बाल-पाल’ यांचे पर्व भारतीय राजकारणात सुरू झाले.
लोकमान्य कॉंग्रेसमध्ये दाखल झाले, त्याच वर्षी गांधी बॅरिस्टर झाले. गांधी लोकमान्यांपेक्षा १३ वर्षांनी धाकटे. २१ वर्षे आफ्रिकेत घालवल्यानंतर नऊ जानेवारी १९१५ मध्ये गांधी भारतात परतले, तेव्हा ते ४५ वर्षांचे होते. गांधींकडे आफ्रिकेतील कामाचे वलय होते हे खरे, पण भारताच्या राजकारणात गांधी नवखे होते. गोपाळकृष्ण गोखले यांनी गांधींना भारताच्या राजकीय प्रक्रियेत उतरण्याचे आवाहन केले होते. गोखले आणि टिळक यांच्यातील तीव्र मतभेद लक्षात घेता, हा फक्त योगायोग नव्हता! (गांधी आणि टिळक यांच्यात उदंड मतभेद होते. मात्र, दोघांचा परस्परांशी उत्तम संवाद होता. टिळकांच्या मृत्यूपूर्वी तीन महिने अगोदर गांधी त्यांना भेटले होते.)
गांधींनी चंपारण्य सत्याग्रह केला तो १९१७ मध्ये. अल्पावधीत गांधींनी कॉंग्रेसवर मांड बसवली. १९२० मध्ये टिळक गेल्यावर ‘गांधीयुग’ सुरू झाले. १९२४ मधील बेळगाव कॉंग्रेसचे गांधी अध्यक्ष झाले. आणि, लगेच १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. हिंदू महासभेची स्थापना झाली १९१५ मध्ये. कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषवलेले पं. मदनमोहन मालवीय हेच महासभेचे संस्थापक. अर्थात, महासभा जोरकसपणे रिंगणात उतरली ती १९२७ मध्ये आणि पुढे ती पोलिटिकल पार्टीही झाली.
हिंदू महासभेला सशक्त करणारे बी. एस. मुंजे कॉंग्रेसमध्येच होते. टिळकांचे खास अनुयायी होते. टिळक कॉंग्रेसचे सर्वेसर्वा व्हावेत, यासाठी मुंजेंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सुरतमध्ये १९०७ मध्ये झालेल्या अधिवेशनात कॉंग्रेसमधील फूट उघड झाली. ‘मवाळ विरुद्ध जहाल’ असा संघर्ष उफाळून आला. तेव्हा दोन्ही गटांमध्ये तुंबळ जुंपली. भाडोत्री पैलवान आणण्याची वेळ आली होती. मुंजे तेव्हा साम-दाम-दंड-भेद वापरून टिळकांसोबत खंबीरपणे उभे राहिले. (हेच मुंजे पुढे १९३१ मध्ये, त्यांचा आदर्श असलेल्या, मुसोलिनीलाही भेटले होते.)
डॉ. हेडगेवारही कॉंग्रेसमध्येच होते.
गांधी कॉंग्रेसमध्ये येईपर्यंत वेगळ्या संघटनेची गरज कडव्या हिंदुत्ववाद्यांना वाटत नव्हती. टिळकांची कॉंग्रेसच आपली आहे, असा त्यांचा समज होता. (तोही फार खरा नव्हता!) गांधी आल्यानंतर मात्र ही कॉंग्रेस आपली नाही, किंबहुना ही आपल्या विचारांच्या अगदी विपरित आहे, असे या हिंदुत्ववाद्यांना खात्रीने का वाटले असेल?
गांधी तर स्वतःला ‘सनातन हिंदू’ म्हणत होते. रामाचे भजन गात होते. आश्रमात राहात होते. गीतेला पवित्र मानत होते. तरीही, गांधी आपल्या विचारांचे विरोधक आणि शत्रू क्रमांक एक आहेत, असे हिंदुत्ववाद्यांना का वाटत होते?
ही गंमत लक्षात घेतली पाहिजे. गांधी केवळ संत नव्हते. आधी राजकारणी होते. कॉंग्रेस ज्या प्रस्थापितांच्या ताब्यात आहे, त्या पक्षावर आपण मांड ठोकायची आणि त्याचवेळी या संघटनेला नवी दिशा द्यायची, हे गांधींना माहीत होते. त्यांची परिभाषा परंपरेची स्पेस व्यापणारी होती आणि कृती आधुनिकतेच्या दिशेने झेपावणारी होती. शिवाय, परंपरेचा अवकाश व्यापतानाच, त्या परंपरेलाही गांधींनी नवा आयाम दिला होता. ‘मी सनातन हिंदू आहे’, असे म्हणताना गांधी अस्पृश्यतेला कृतिशील विरोध करत होते. वर्णव्यवस्थेला प्रसंगी गोंजारणारे गांधी स्वतः भंगीकाम करत होते. त्यांचे ब्राह्मण अनुयायी मृत जनावरांची कातडी कमावण्याचे उद्योग करत होते. ‘लष्करी शिक्षण अपरिहार्य आहे’, असे सांगणा-या कॉंग्रेसच्या व्यासपीठावर गांधी अहिंसा सांगत होते. आणि, मुख्य म्हणजे राजकारणातून ‘धर्म’ हद्दपार करत होते. नवा ‘राष्ट्रवाद’ उभा करत होते.
टिळकांनंतर गांधी येणे हे फक्त सत्तांतर नव्हते. राष्ट्रवादाची नवी मांडणी होती. समता आणि धर्मनिरपेक्षतेची नवी बैठक होती. इंग्रज ख्रिश्चन आहेत आणि ते आपला धर्म बुडवत आहेत, अशी मांडणी गांधींनी कधीच केली नाही. त्या पल्याडचा राष्ट्रवाद गांधींनी सांगितला. गांधींनी धर्माधिष्ठित राष्ट्रवाद नाकारला. गांधींनी हिंसा नाकारली. हिंदू धर्मातील विषमता नाकारली. अस्पृश्यता नाकारली.
हा विद्रोह होता. बंड होते. अन्य कोणी हे केले असते, तर प्रस्थापितांनी त्याला कधीच फेकून दिले असते. गांधींनी मात्र प्रस्थापित परिभाषेत, परंपरेच्या शैलीत हे असे सांगितले की, गांधी हा बंडखोर आहे, हे गांधीवाद्यांनाही समजले नाही. प्रस्थापितांनी या बंडखोरालाच आपला नेता करून टाकले!
मात्र, गांधींची बंडखोरी ख-या अर्थाने समजली होती ती कडव्या हिंदुत्ववाद्यांना. बाकी समाजसुधारक आणि धर्मचिकित्सक परवडले, पण हा स्वयंघोषित ‘सनातनी हिंदू’ नको, हे आक्रमक हिंदुत्ववाद्यांना कळून चुकले होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे वेगळे संघटन उभे करणे स्वाभाविक होते.
गांधी मुस्लिमांचा अनुनय करतात, असे म्हणणा-या मुंजे आणि सावरकरांच्या हिंदू महासभेने मुस्लिम लीगसोबत आघाडी करून सरकारे स्थापन केली. १९१६ मध्ये ‘लखनौ करार’ झाला, तेव्हा मुस्लिमांना स्वतंत्र-विभक्त मतदारसंघ देणारे लोकमान्य टिळकच होते!
ज्या बाबासाहेबांच्या ‘मूकनायक’ ची जाहिरात, शुल्क भरूनही टिळकांच्या ‘केसरी’ने नाकारली, त्याच ‘मूकनायक’मधून गांधींचे विचार प्रसिद्ध होत असत. महाडचा सत्याग्रह १९२७चा. त्या सत्याग्रहाच्या मंडपात एकच प्रतिमा होती, ती गांधींची. टिळकांपेक्षा गांधी वेगळे आहेत, हे बाबासाहेबांना समजले होते. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या होत्या. ‘आंतरजातीय लग्नाशिवाय अन्य लग्नाला जाणार नाही’, ही गांधींची प्रतिज्ञा बाबासाहेब भेटल्यानंतरची. पूर्वीच्या कॉंग्रेसचा विचार केला तर अशी प्रतिज्ञा क्रांतिकारक होती. अर्थात, बाबासाहेब आणि गांधींचे संबंध पुढे बिघडत गेले. त्याला वासहतिक राजकारणाचे आणि दोघांच्या ‘पोझिशनिंग’चे संदर्भ आहेत. संविधानाच्या निमित्ताने मात्र गांधी आणि आंबेडकर पुन्हा एका चौकात आले.
मुद्दा इथे असा, लोकमान्यांची कॉंग्रेस आणि गांधींची कॉंग्रेस यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. कॉंग्रेसवर आपली मांडही कायम ठेवायची; तरीही नव्या राष्ट्रवादाची, धर्मनिरपेक्षतेची, समतेची मांडणी करत कॉंग्रेसची भूमिका आमूलाग्र बदलायची आणि कॉंग्रेस घराघरात न्यायची, हे गांधींनी ज्या मुत्सद्देगिरीने केले, त्याला तोड नाही. त्याच्या मुळाशी होती, गांधींची सर्वसामान्य माणसाविषयी असणारी निःसंदिग्ध कळकळ, तळमळ. आणि, या ‘लिटल मॅन’मध्ये असणारे असामान्य धैर्य. गांधी मजबुरीचं नाहीं, मजबुतीचं नाव!
गांधींना स्थितप्रज्ञ संत करून टाकण्याच्या नादात गांधींचं हे विद्रोही, परिवर्तनवादी रूप आपल्या लक्षात येत नाही.
ते ‘त्यांच्या’ लक्षात आलं. म्हणून त्यांनी अखेरीस या विद्रोही क्रांतिकारकाचा खून केला!
– ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे