लेफ्टनंटपदी सोलापूरच्या चैतन्य दिवाणजीची देशातून एकमेव निवड
महाराष्ट्राचा अभिमान उंचावणारी बातमी
सोलापूर : सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डतर्फे देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सोलापूर येथील अभियंता चैतन्य अनंत दिवाणजी या युवकाची निवड झालीय. चैतन्य हा या पदासाठी निवड झालेला देशातील एकमेव युवक आहे. एसबीआय बँकेचे उपव्यवस्थापक अनंत दिवाणजी यांचा तो सुपुत्र तसेच दै. ‘सकाळ’च्या सोलापूर आवृत्तीचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांचा चैतन्य हा पुतण्या आहे. या निवडीबद्दल चैतन्यवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
एसएसबीच्या वतीने देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सोलापूर येथील अभियंता चैतन्य अनंत दिवाणजी या युवकाची निवड झालीय. चैतन्य याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अक्कलकोटच्या आयएमएसमध्ये झाले. सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनमध्ये अभियांत्रिकी पदवी पुणे येथील एम.आय.टी.मधून घेतली. चैतन्यच्या डोळ्यासमोर सुरवातीपासूनच भारतीय सैन्यात जाण्याचे स्वप्न होते. त्याने अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षात लष्कराद्वारे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या टेक्निकल ग्रॅज्युएटसाठी असलेल्या सैन्य दलातील लेफ्टनंट परीक्षा प्रक्रियेत सहभाग घेतला.
सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) देशपातळीवर लेफ्टनंट पदासाठी परीक्षा प्रक्रिया घेतली जाते.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेतून लेफ्टनंट पदाच्या डेहराडून येथे भारतीय सैन्य अकादमीत होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवडला गेलेला तो देशातील एकमेव तरुण आहे. यासाठी आई-वडील व मेजर मोहित शर्मा यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले. सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाद्वारे लष्करात भरती होणारा चैतन्य हा यावेळचा भारतातील एकमेव तरुण आहे.