लाच घेताना बाळासाहेब केदार अखेर जाळ्यात
जमिनीच्या मोजणीसाठी 10 हजार मागितले
सोलापूर : अती तेथे माती होते.. भ्रष्ट मार्गाने पैसा खाण्याची चटक लागलेले राजकारणी असोत की सरकारी बाबू. अर्थात अनेक सरकारी बाबू थेट पैसे घेत नाहीत. ते झिरो कर्मचारी नेमून सरळ मार्गाने वसुली करतात. असाच एक जणू वसूलदार असलेला बाळासाहेब एकनाथ केदार अखेर लाच स्वीकारताना अलगद जाळ्यात अडकला. सांगोला भूमी उप अभिलेख कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
सांगोला तालुक्यातील नेहमीच चर्चेत असलेले व वादग्रस्त कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय म्हणून या कार्यालयाची ओळख आहे. या कार्यालयाच्या अनेक तक्रारी आहेत. त्या नेत्यांकडून तिथल्या तेथे मिटवल्या जातात. आणि मग लाचखाऊ लोकांचे फावते.
सांगोला भूमी उप अभिलेख कार्यालयात झिरो कर्मचाऱ्याचा सुळसुळाट आहे.
गायगव्हाण येथील हॉटेल व्यवसायिक तक्रारदाराने एसीबीच्या कार्यालयात धाव घेऊन या लाचखोर व्यक्तीबाबत तक्रार दिली. तक्रारदार हे हॉटेल व्यवसायिक असून त्यांचे मौजे गायगव्हाण येथील गट क्रमांक 41 मधील 32 आर जमिनीची मोजणी होऊन नकाशा मिळवून देण्याकरिता उपअधीक्षक भुमिअभिलेख येथे काम करीत असलेले खाजगी इसम बाळासाहेब एकनाथ केदार ( रा. वासुद, ता.सांगोला) यांनी भूमी अभिलेख कार्यालय सांगोला येथील उपाधिक्षक मॅडम हे त्यांच्या चांगल्या परिचयाचे असून त्यामुळे आरोपी हे मोजणी नकाशा देण्याचे काम करीत असल्याचे भासवून सदरचा नकाशा देण्याकरता तक्रारदार यांना 10 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वतः स्वीकारली.
यातील आरोपी यांना चौकशी कामे ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.