भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पं. नेहरू हे भारताच्या आधुनिक मूल्यव्यवस्थेचे शिल्पकार, हे खरेच; पण तिस-या महापुरुषाशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होऊच शकली नसती.
या महामानवाचे नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर.
अशा उत्तुंग क्षमतेचा आणि कर्तृत्वाचा महापुरुष जगाने आजवर पाहिलेला नाही.
ब्राझीलमधील माझी एक मैत्रीण बाबासाहेबांवरील सिनेमा बघून एवढी थक्क झाली की म्हणाली, “जगाच्या इतिहासात हा असा एकमेव महापुरुष आहे, ज्याने एकाच हयातीमध्ये एक ‘राज्यघटना’ जाळली. आणि, त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना दिली.” ‘मनुस्मृती’ नावाची एक घटना (दुर्घटना) बाबासाहेबांनी जाळली आणि ‘भारतीय संविधान’ नावाची राज्यघटना देशाला दिली. राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आधुनिक भारत जन्माला येऊ लागला.
बाबासाहेबांनी गांधी-नेहरुंसह कॉंग्रेसला असे बदलवून टाकले. डॉ आंबेडकरांचा उल्लेख करताना, ‘भीमराव रामजी आंबेडकर’ असे पूर्ण नाव वापरा, असा फतवा उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ सरकारने अलिकडे काढला आहे. आपल्यातला राम संपला की इकडचा-तिकडचा राम आयात करणारे हे लोक. रामजी आंबेडकरांविषयी आम्हाला प्रेम आणि आदरच आहे. पण ज्या रामाबद्दल तुम्ही बोलत आहात, त्याबद्दलही सांगितलं पाहिजे.
एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना नाकारणे आणि त्याच हयातीत दुसरी राज्यघटना साकारणे हे साधे काम नाही. अशा कामांसाठी अनेक पिढ्या खर्ची पडतात. कोणीतरी मार्टिन ल्यूथर किंग ‘आय हॅव अ ड्रिम’ म्हणतो, तेव्हा कुठे बराक ओबामांना ‘येस, वी कॅन!’, असे म्हणणे शक्य होत असते. बाबासाहेबांनी ते एकाच हयातीमध्ये केले. उण्यापु-या ६५ वर्षांच्या आयुष्यात बाबासाहेबांनी अशक्य ते शक्य करुन दाखवले. त्यात, गांधी-नेहरु-आंबेडकर या तिघांचा विचार करता, सर्वात कमी आयुष्य लाभले ते आंबेडकरांना. पण, खडतर वाट कापत बाबासाहेबांनी या देशाला समतेचे अधिष्ठान दिले.
‘मनुस्मृती’ हीच आपली राज्यघटना आहे, असे म्हणणारे वाचाळवीर आजही आपण बघत असतो. ‘मनुस्मृती’ ला आपल्या संस्कृतीचे अधिष्ठान मानणारा एक गट आजही दिसतो. विविध प्रकारचे युक्तीवाद वापरुन तो ‘मनुस्मृती’ चे समर्थन करत असतो. ही अवस्था आज असेल तर बाबासाहेबांनी ‘मनुस्मृती’ जाळली, तेव्हाचे चित्र काय असेल? २५ डिसेंबर १९२७ या दिवशी महाडमध्ये ‘मनुस्मृती’ चे दहन झाले. अण्णाजी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते ‘मनुस्मृती’ जाळली गेली. ‘मनुस्मृती दहन दिन’ हाच खरे म्हणजे ‘स्त्रीमुक्ती दिन’ म्हणून साजरा व्हायला हवा.
गांधी आणि नेहरु कितीही प्रामाणिक आणि लोकशाहीवादी असले तरीदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेटेपर्यंत दलितांच्या प्रश्नांची जाणीव त्या तीव्रतेने या दोघांनाही झालेली नव्हती. पाश्चात्य वळणाच्या नेहरुंना ‘भारत’ समजावून सांगितला तो गांधींनी. पण, गांधींना खरा भारत समजला तो बाबासाहेबांमुळेच.
बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ सुरु केले, तेव्हा १९२० मधील एका अग्रलेखात त्यांनी गांधीजींना उद्देशून थेटपणे म्हटले, ‘आफ्रिकेमध्ये कोणाला हॉटेलमध्ये प्रवेश मिळाला नाही तरी तुम्हाला त्रास होतो आणि इथे माझे समाजबांधव जनावरांपेक्षा वाईट आयुष्य जगत असताना तुम्हाला त्याची काहीही पर्वा वाटत नाही?’ भारतातले जातवास्तव गांधी आणि नेहरुंना आंबेडकरांमुळेच समजले.
गंमत बघा, नेहरुंनी लिहिलेली ‘इंदिरेस पत्रे’ प्रसिद्ध आहेत. मी सुरुवातीला त्या पुस्तकाचा उल्लेखही केला होता. आठवतं ना? त्यातील एका पत्रात छोट्या इंदिरेला उद्देशून नेहरु म्हणतात, ‘पूर्वी आपल्या देशात जातव्यवस्था फार बळकट होती. आता मात्र ती बरीच शिथिल होते आहे.’ नेहरुंच्या पत्राचे तेच वर्ष आहे, ज्यावर्षी बाबासाहेब चवदार तळ्याचा सत्याग्रह करत होते! जातव्यवस्थेचे नेहरुंचे आकलन किती अपुरे होते आणि त्यांचे अनुभवविश्व कसे मर्यादित होते, याचाच हा पुरावा. बाबासाहेब भेटल्यानंतरच नेहरुंचा ‘भारताचा शोध’ पुरा झाला!
शहरात वाढलेले, इंग्रजाळलेले नेहरु १९२० मध्ये पहिल्यांदाच खेड्या-पाड्यात फिरु लागले. तेव्हा त्यांचा अनुभव तेच मांडतात, ‘मला दुःख होते आणि स्वतःची लाज वाटते. माझ्या श्रीमंतीतल्या, आरामातल्या आयुष्याची लाज वाटते मला. त्याचप्रमाणे शहरात गुंतून पडलेल्या राजकारणाचीही लाज वाटते. इथं माझी कित्येक भावंडं असं आयुष्य जगताहेत की त्यांना पुरेसे कपडे मिळत नाहीत. खायला अन्न नाही. तरीही त्यांच्याकडं दुर्लक्ष करणा-या राजकारणाची मला शरम वाटते. आज माझ्यासमोर भारताचे हे चित्र उभे राहिले आहे. उघडे-नागडे, उपाशी, भंगलेले आणि अत्यंत दुर्दैवी…!’ या दौ-यानंतर नेहरु आमूलाग्र बदलले. गांधींसोबत आतून जोडले गेले. आणि, आंबेडकरांमुळे तर त्यांचे टिपिकल उच्चभ्रू जगणेच खोडले गेले!
बाबासाहेबांनी गांधी-नेहरुंसह कॉंग्रेसला असे बदलवून टाकले.
डॉ आंबेडकरांचा उल्लेख करताना, ‘भीमराव रामजी आंबेडकर’ असे पूर्ण नाव वापरा, असा फतवा उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ सरकारने अलिकडे काढला आहे. आपल्यातला राम संपला की इकडचा-तिकडचा राम आयात करणारे हे लोक. रामजी आंबेडकरांविषयी आम्हाला प्रेम आणि आदरच आहे. पण ज्या रामाबद्दल तुम्ही बोलत आहात, त्याबद्दलही सांगितलं पाहिजे. बाबासाहेब १९३१ मध्ये काळाराम मंदिरात सत्याग्रह करत होते, तेव्हा त्या रामाचे दरवाजे उघडले गेले नाहीत. बाबासाहेबांना तोवर आशा होती. बुद्ध, कबीर, बसवण्णा यांच्या विचारांसह हिंदू धर्मात समतेचे दरवाजे उघडले जातील, अशी त्यांना आशा होती. ही शेवटची आशा फोल ठरली. आणि मग मात्र १९३५ ला येवल्याच्या मुक्तीभूमीवर बाबासाहेबांनी घोषणा केली. ‘हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.’ आणि त्यानंतर १९५६ मध्ये नागपुरात बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
बाबासाहेबांच्या वाट्याला जो विखार आला, जी विषमता आली, ती अन्य कोणाच्या वाट्याला आली असती तर त्याच्या संयमाचा बांध फुटला असता. बाबासाहेब मात्र सम्यक सकारात्मकतेने आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्तर देत राहिले, काम करत राहिले. मला तर अनेकदा गांधींच्या अहिंसेपेक्षाही बाबासाहेबांची अहिंसा जास्त मोठी वाटते.
राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी नक्की काय केले, ते समजून घेतले पाहिजे. नवा देश उभा करताना नेहरु एकाकी होते. कॉंग्रेसमध्येही एकाकी होते. कारण, धर्माच्या आधारावर फाळणी झाली असेल, तर धर्माच्याच आधारावर देश उभा राहायला हवा, असा आग्रह धरला जात होता. धार्मिक दंगली उसळलेल्या असताना तर हा आग्रह अस्मितेचे रुप धारण करत होता. अशावेळी नेहरु आणि गांधी अधिकच जवळ आले हे खरे, पण एकूण मुख्य प्रक्रियेत गांधी नव्हते आणि अकाली ते गेलेही.
अशावेळी आंबेडकरांनीच या राष्ट्राची बांधणी केली. बाबासाहेबांनी कॉंग्रेसला ‘जळतं घर’ म्हटलं, हे खरं; पण देश आव्हानात्मक वळणावर असताना याच कॉंग्रेसच्या खांद्याला खांदा लावून राज्यघटनेचं शिल्प पुरं केलं. कारण, व्यापक उद्दिष्टांसाठी किमान समान कार्यक्रम आखावा लागतो, ही राजकीय समज बाबासाहेबांकडंही होती. फॅसिझम, जातीयवादाचा पराभव करत, नवा धर्मनिरपेक्ष आणि मूल्याधिष्ठित देश उभा करायचा, तर कॉंग्रेसच आपला ‘पार्टनर’ असू शकतो, हे बाबासाहेबांना पुरेपूर माहीत होते.
बाबासाहेबांनी केवळ राजकारण नाही केलं. एका संस्कृतीला जन्म दिला. बाबासाहेबांपासून प्रेरणा घेऊन साहित्यिक लिहू लागले. व्यवस्थेनं नाकारलेल्या पालावरचं आयुष्य पानावर उमटू लागलं. गावकुसाबाहेरचं जगणं गावरुपात एकवटलेल्या जगापर्यंत पोहोचू लागलं. कवी स्वतःला व्यक्त करु लागले. समतेच्या वाटेवरुन चालणारी रंगभूमी विकसित झाली. पथनाट्य, जलसे यांच्यासोबत शाहिरीही बाबासाहेबांच्या वाटेनं निघाली.
बाबासाहेबांनी इथल्या समाज आणि संस्कृतीला काय दिलं, हे समजून घ्यायचं असेल तर ‘काला’ हा सिनेमा बघा. रजनीकांतच्या फॅन्सनी तर तो सिनेमा हिट्ट केलाही. पण, पा. रंजीथ नावाच्या तरुण लेखक- दिग्दर्शकावर बाबासाहेबांचा किती प्रभाव आहे, हे याच सिनेमातून समजतं. ‘ती जमीन तुझ्यासाठी सत्ता असेल, आमच्यासाठी आयुष्य आहे!’ असं म्हणणारा ‘काला’ बाबासाहेबांकडूनच प्रेरणा घेत असतो. अर्थात, ‘काला’मधील सांस्कृतिक समंजसपण, त्यातला स्त्रीवाद आपल्याला कधी समजणार आहे? किती झेपलंय आपल्याला ते माहीत नाही, पण एक मात्र खरं, आपल्या जगण्यावर नि अवघ्या असण्यावरच बाबासाहेबांचा खोल, अमिट प्रभाव आहे!
*****
(संजय आवटे यांच्या ‘We The Change- आम्ही भारताचे लोक’ या पुस्तकातून हा लेख साभार)