राष्ट्रसंत तुकडोजी आणि ग्रामीण विकास
जयंतीदिन विशेष : डॉ. हेमराज निखाडे यांचा विशेष लेख
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ ला अमरावती जिल्ह्यातील यावली या छोट्याशा खेड्यात झाला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योतर (1909 ते1968) काळात आपल्या आदर्श कल्पनेतील नव्या ग्रामीण भारताची उभारणी करण्यासाठी केलेले प्रयत्न महत्वपूर्ण आहेत. आज राष्ट्रसंत आणि ग्रामीण भारताचा विचार करतांना अनेक प्रश्न दिसतात. खेडी ही आर्थिकदृष्ट्या मागास, राजकीय अनास्था आणि सामाजिक जागृतीचा अभाव या दृष्टीने ती ओस पडत होती. म्हणजेच रोजगाराची व्यवस्था शहरात होईल या आशेने खेड्यातील लोक शहराकडे धाव घेत होते. शहरे मात्र खेड्यातील माणसाचा काम मागेल त्या प्रकारे वापर करू लागली. कृषिजीवन आणि ग्रामसंस्कृती सोडून आलेल्या खेडयातील नागरिकाला शहरी संस्कृतीत अनेक नव्या समस्या निर्माण होत राहिल्या. त्यामुळे पुढील काळात खेडयाकडे न बघता त्यांनी शहरातच राहणे पसंत केले. परंतु खेड्यात कृषिशी निगडित ग्रामीण माणूस राहिला. त्यामुळे खेड्यात सामाजिकदृष्ट्या जाण असलेले व ग्रामासाठी नवं काही करू पाहणारे अभावाने आढळून येतात. याचे कारण ग्राम म्हणजे खेडे. खेडे म्हणजे काही घरांची वस्ती. या घरात राहणारे खेडूत लोक, शेती करणारे शेतकरी, आणि शेतीवर राबणारे मजूर असा अर्थ घेतल्याने ग्रामविकासाला मर्यादा आल्या. कित्येक शतकापासून सुरू असलेली ही स्थिती अजूनही पूर्णपणे सुधारली नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानी ग्रामगीतेतील अर्पण पत्रिकेत हे चित्र रेखाटताना असे म्हटले आहे की, सर्व ग्रामासी सुखी करावे।अन्न वस्त्र पात्रदी द्यावे।परी स्वतः दुःखची भोगावे।। भूषण तुझे ग्रामनाथा।।कष्ट करोनि महाल बांधसी।परी झोपडीही नाही नेटकीशी।। स्वातंत्र करीता उडी घेशी। मजा भोगती इतरची ।।। ही परिस्थिती ग्रामीण जनमानसाची आजही तशीच दिसते. राष्ट्रसंतांनी आपली वाणी आणि लेखणी झिजवून ग्रामीण जनमानसा च्या व्यथा आणि वेदना कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
• आजची ग्रामीण वस्तुस्थिती
भारताला स्वातंत्र्य मिळून आज जवळजवळ ७२ पूर्ण झाले. तरीही आपल्या देशातील ग्रामीण भागात आज दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा, दळणवळण, वाहतूक,यांच्या अभावाचा परिणाम ग्रामीण जनमानसात दिसून येतो. ग्रामीण भाग हा शेतीशी निगडित आहे.त्यामुळे सतत पडणारे दुष्काळ,सतत ची नापिकी, छुपी बेरोजगारी, स्त्रीयांचे समाजातील स्थान,यांच्या जोडीला रूढी, प्रथा आणि परंपरा नेहमी ग्रामीण समाजाला चिकटून राहिल्या. अर्थात शहराच्या तुलनेत आज खेडी आधीपेक्षा बेहोश होत आहेत. ग्रामस्वराज्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून गांधीजीनी खेड्याकडे चला ही हाक दिली. आधुनिक सुविधांचा पाऊस पडावा म्हणून भूतपूर्व राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलामांनी सांगीतले की,शहरातील सुविधा खेड्यातील माणसापर्यंत पोहचू द्या. परंतु ज्या प्रमाणात अशी उपलब्धी व्हायला पाहिजे. ती होऊ शकली नाही. राष्ट्रसंतानी खेड्याला आदर्श ग्राम बनविण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या विचाराचा प्रभाव भारतातील ग्रामीण जनमानसात ताकदिने रुजला नाही. याचे कारण जागतिकीकरण होय.जागतिकीकरणाच्या परिणामाने दुर्देवाने वर्षानुवर्षे ग्रामीण जनजीवन विस्कळीत होत राहीले. खेड्यातल्या सशक्त युवक युवती यांनी शिक्षणासाठी गावं सोडलं. कष्टकरी मायबाप आणि ज्यांनी शिक्षण सोडून शेती स्वीकारली ते असे दोनच प्रकारचे लोक गावात उरले आहेत. खऱ्या अर्थाने गावाला सक्षम करण्यासाठी जो ग्रामीण रक्तवाहीन्यांचा(तरुणांचा) प्रवाह होता.तो शहराकडे येत राहीला. म्हणून प्राधान्याने असे म्हणावेसे वाटते की, आज खेडी नाईलाजाने बेहोश होत आहे. अचानक येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचं मनोधैर्य त्यांच्यात दिसत नाही.म्हणून आजच्या आधुनिक विचार प्रवाहातही ग्रामीण शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखता येत नाही. निराशा मनोमनी दिसते. प्रत्येक सरकार आणि प्रत्येक गावात आत्महत्या हा कायम विषय झाला आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या हा कलंक कृषिप्रधान भारतातून पुसून काढण्याचे प्रयत्न शासनस्तरावर होत आहे. अशावेळी जगण्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ग्राम समाजाला संतांच्या विचारांची नितांत गरज वाटते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याच्या वेगवेगळ्या कारणांना सोडविण्याची ताकद राष्ट्रसंताच्या आदर्श ग्रामनिर्माण संकल्पनेत आणि ग्रामगीतेतील पानोपानी दिसते.
• ग्रामस्वच्छता
आज गावागावात स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते. खेडोपाडी अस्वछता कायम आहे.नालीचे व सांडपाण्याचे व्यवस्थापन हा मुख्य प्रश्न अजूनही ग्रामीण भागात आहे. नालीबांधकाम नसणे किंवा असल्यास नाल्या पूर्णपणे बंद असणे या दोन कारणांमुळे पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी वाहत जाते.बरेचदा अशा कारणाने विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. तेव्हा पुन्हा राष्ट्रसंताची आठवण होते. गावचे रस्ते तयार होताच नालीबांधकाम केलं पाहिजे. त्यामुळे सांडपाण्याची सोय केली जाईल. सर्व मिळोनि करावी ग्रामसफाई।नाली मोरी ठायी ठायी।हस्ते परहस्ते साफ सर्वही।चहूकडे मार्ग।।(अ.12.54) अन त्यात जी जी निघेल घाण । ती दूर न्यावी गावापासून।अस्ताव्यस्त न देता फेकून नीट व्यवस्था लावावी।।(अ12.54) ही राष्ट्रसतांनी केलेली सूचना किती महत्वाची आहे. याचे उपयोजन करणे गरजेचे आहे. नाहीतर पावसाळ्यात साथीचे नवे नवे रोग पसरतात.गावेच्या गावे होरपळून निघतात. रोगग्रस्त खेडे सावरायला बराच दीर्घ कालावधी लागतो. त्यामुळे ग्रामीण भागातील खेडयाचे तेथील जनमानसाचे दुःखमय जगणे वेगळे आहे. स्वच्छतेविषयी आजही खेड्यात जागरूकता नाही.गावात प्रवेश करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्त्रिया मुले शौचास बसलेले दिसतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजही भारतातील हजारो खेड्याची हीच स्थिती आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याबाबत वस्तुस्थिती दर्शक विधान करताना असे म्हणतात की,नदी किनारी वा बोरंगात।शौचासी जाती स्त्रीयादी समस्त (अ.12.57) एरव्ही तो वांढाल गडी । जो वाटेल तिकडे मळा सांडी।ते खतद्रव्यांची करिती नासाडी। वानर जैसे ।।(अ.12.59)गावाच्या रस्त्यावर कडेला, नदीच्या किनारी वा बोरंगात मलविसर्जनास बसणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रसतांनी वानर संबोधले आहे. अशा प्रकारच्या सवयी थांबविणे,आरोग्याच्या आणि आदर्श ग्रामाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अन्यथा एकीकडे देश प्रगतीच्या दिशेने भरारी घेईल आणि दुसरीकडे रोगराई वाढेल.हे आज प्रत्यक्ष अनुभवता येत आहे. त्यावर ते उपाय सांगताना म्हणतात की, तैसेचि करावे चरसंडास । मळ दिसोची ना द्यावा कोणास। आपल्या मळाची आपण व्यवस्था लावणे सोयीचे।।(अ12.56) चरसंडा साचा उपयोग करताना तेथे बसलिया शौचास।माती झाकोनी सावकाश।मलमूत्र येवोनि खतरुपास।कारणी लागो म्हणोनिया(अ12.58) तसेच शौचगृहे ही नव्या प्रकारे निर्मावी सर्वांसाठी(अ13.68) असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी ग्रामीण समाजाला दिला.अलीकडे हागणदारी मुक्त गाव योजना शासनस्तरावर राबविण्यात येत आहे.तरीही अनेक गावात हा प्रश्न कायम आहेच. याशिवाय गावात प्रमुख ठिकाणी मुत्रीघरे असावी.मृत जनावरांसाठी विल्हेवाट स्थळ असावे. आज अनेक गावात अंत्यसंस्कार गृह दिसत नाही. हे ग्रामजीवणाचे अनेक ठिकाणी नदी किनारी किंवा नाल्याच्या जवळ मृत देहाला अग्नी देतात.कोणी शेतात अंत्यसंस्कार करतात. काहीजण समाधी बांधतात.या सगळ्या गोष्टींचा उलगडा ग्रामगितेत होतो. कोणी प्रेताची समाधी करिती।उगीच जागा गुणतोवोनीधरिती। ऐसे कविता सारीच क्षिती।गुंतुनी जाईल त्यायोगे (अ22.106)मेला त्याची एक समाधी।जन्माला त्याच्या घराची गर्दी।मग उरेल काय भूमी कधी।जगण्यासाठी इतरांना?(अ 22.107)त्यांनी मानवाला जिवंत मानवा नाही घर ।कासतालुन नाही वावर।तेथे समाधीचे अवडंबर।मृतासाठी कासयासी?(अ22.115)त्यामुळे ग्रामीण जनमानसात जाणीव जागृती केली पाहिजे. शासकीय पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांना सामाजिक बांधिलकी जोपासून प्रत्येक नागरिकांनी आपले गावं कसे सक्षम करता येईल. यासाठी प्रयत्न करीत राहिले तर नक्कीच राष्ट्रसंताच्या आदर्श गाव संकल्पनेला न्याय देता येईल.
• आदर्शग्राम विकासाची दृष्टी
गावामध्ये सहकार्य भावना वाढीस लागली पाहिजे. एकदा संघटन निर्माण झाले की, नवीन नवीन उपक्रम राबविणे सहज शक्य होते. गावचे तरुण तरुणी जर सहकार्य भावनेने संघटित झाले तर आजही गावे सुंदर स्वच्छ आणि सक्षम बनायला वेळ लागणार नाही. असे गावं सुंदर करताना प्रत्येकांनी घरोघरी परसबागा लावाव्यात प्रत्येक घराच्या परिसरात वृक्षारोपण करून स्वच्छ पर्यावरण निर्माण करण्याची गरज ग्रामगीतेने दर्शविलेली आहे . झाडे दिसती ओळीत बद्ध । सरळ , सुंदर , हिरवी शुद्ध । घरमालकचि करी खुद्द । काम आपुल्या हातांनी ‘ ( अ . १३ . ४२ ) घराभोवती बाग के ली । सांडपाण्यावरि झाडे । वाढली । फळाफुलांची रोपे , वेली । भाजीपाला नित्याचा (अ . १३ , ४३) परिसर बागेच्या योजनेमुळे घराभोवतालचे वातावरण प्रसन्न करीत राहील सोबतच त्या कुटुंबाला रोज भाजीपाला सहजपणे उपलब्ध होईल.यामुळे ग्रामविकासास गति येईल. अशाप्रकारचे वातावरण काही बंगाली समाजातील गावे गडचिरोली जिल्ह्यात आहेत तिथं असे वातावरण दिसून येते. त्याचप्रमाणे गावातील रस्त्यांचे दुतर्फा वक्षारोपण करावे गावातील वातावरण स्वच्छ राहावे, प्राणवायुचे प्रमाण हवेत भरपूर असावे यासाठी गावातील रस्त्याचे दुतर्फा वृक्षारोपण करण्याची आवश्यकता ग्रामगीता प्रतिपादन करीत आहे.आज निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वाटते. सडकांचिया दुतर्फा छान । सर्वांनी करावे वृक्षारोपण ‘ ( अ . १३ . ७१ ) वृक्षरोपण केल्यामुळे वातावरणात प्राणवायुचे प्रमाण तर वाढेलच त्याचसोबत तापमानावर ही परिणाम होईल.निसर्गाच्या सानिध्यात आपण निसर्ग नियमांचे पालन करू शकू. त्याचप्रमाणे गावात सार्वजनिक बगीचा असणे आवश्यक आहे.शहरात ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तीत सार्वजनिक बागेसाठी जागा राखीव ठेवली जाते व पुढे त्या जागी सार्वजनिक बगीच्याची योजना कार्यान्वित केली जाते. गावातही अशाच प्रकारची बाग उभारण्याची कल्पना ग्रामगीतेत राष्ट्रसंतांनी केलेली आहे . ते म्हणतात एक असावा सुंदर बाग । त्यात मनःस्वास्थाचेचि असावे अंग । प्रसन्नता वाढाया नाना रंग । वृक्ष , वेली , लताकुंज । । ( अ . १३ . ९७ ) त्यात क्रीडांगणे , पाळणे । बालक – युवकांची प्रसन्नविती मने । जातीपातीचे विसरोनि रडगाणे । सहभोजने चालवावी ॥ ( अ . १३ . ९८ ) सार्वजनिक बागेमुळे शुद्ध वातावरण राहील व मनही प्रसन्न राहील.हे गावातील सुशोभिकरण नव्हे तर गावातील सहकार्य भावना वाढीस लावण्यासाठी निर्माण केलेले वातावरण असेल.ज्याप्रमाणे सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते त्याचप्रमाणे प्रसन्न हवेत असलेली गावे प्रगतीच्या दिशेने प्रवास करतील असे वाटते. गावचे आरोग्य हेच गावचे धन हा विचार वाढवायचा असेल तर त्यासाठी गावात व्यायामाची शाळा निर्माण करावी. सुंदर करावा आखाड़ा । मुले बागडती उल्हासे तडतडा । आदर्श मल्ल – खेळाडूंचा धडा । गिरवावया ॥ ‘ (अ . १३ . १०१ ) सुंदर मुलांची शरीरे । दिसती गुलाब जैसे गोजिरे । बागचि फुलले हरेभरे । सुपुत्रांचे । । ( अ . १३ . १०२ ) सध्याच्या माहिती संप्रेषण व आधुनिक काळात आखाड्याकडे दुर्लक्षच झाले आहे. गावात आता आखाडे दिसतच नाहीत.असतील तर तिथं कोणी जाताना दिसत नाही. मोबाईल मध्ये तासंतास घालवणारी पोर तेवढी गावात दिसतील, व्यायामाचे वर्गही गावात आढळत नाही. व्यायामाला फारसे महत्त्व देणारी गावात मंडळी उरली नाही. परंतु व्यायाम ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे,त्यामुळे आखाड्याकडे लक्ष द्यावेच लागेल. शरीर हीच खरी संपत्ती आहे असे समजून आपण आपल्या मुलाबाळांना व्यायामाचे पाठ शिकवावे. आखाड्यात जावून व्यायाम करावे हेच राष्ट्रसंत सांगत आहेत.आखाड्याकडे शासनाचे लक्ष नाही हे उघड सत्य आहे म्हणून स्थानिक जाणकार लोकांनी आखाड्यांची पुनर्रचना करण्यासाठी पाऊले उचलली पाहिजे.आजची मेहनतिसाठी,उद्याच्या उज्ज्वल आरोग्यासाठी आखाडे महत्वपूर्ण आहे .राष्ट्रसंतांनी जीवनभर आखाड्यांचा पाठपुरावा केला. कित्येक गावात आखाडे सुरु केले . ‘ परि इकडे नाही ध्यान ( अ . १५ . ७० ) असेच त्यांनी मोठ्या दुःखाने ग्रामगीतेत म्हटले आहे. यावर शासन आणि समाजाने विचार करावा अन्यथा याचे परिणाम ग्रामजीवनास खूप भारी पडतील.. म्हणून सहकार्य देऊन नि घेऊन आपण गावासाठी कार्य केले पाहिजे.
गावकऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करावी ” तेथे असावी सुंदर विहीर । पाणी पिण्यास थंडगार ‘ ( अ . १३ . १०० ) अशी सूचना ग्रामगीतेत राष्ट्रसंतांनी केलेली आहे. शासनाव्दारे गावोगावी पाणी पुरवठ्याच्या योजना आखण्यात येत आहे हे प्रगतीचेच लक्षण आहे.नसेल त्या गावात लवकरात लवकर पाण्याची टाकी बांधली पाहिजे. त्या योग्य वेळी स्वच्छ केल्या पाहिजे. याकडे संबंधित ग्रामपंचायत आणि गावातील नागरिकांनी वेळोवेळी लक्ष दिले पाहिजे. गावात रात्री प्रकाशाची व्यवस्था झालीच पाहिजे. गावातील रस्त्यावर रात्रीचे अंधारात अनेकदा दुर्घटना घडत असतात म्हणून दिवाबत्तीची व्यवस्था ग्रामपंचायतीने करणे क्रमप्राप्त आहे. पन्नास वर्षापूर्वीचौका – चौकात दिवाबत्तीची सोय केली जात असे. आजकाल वीजेचे दिवे दिसू लागले आहेत. वं . महाराज गावातील मार्गावर प्रकाशाची व्यवस्था केली पाहिजे हे सुचविताना म्हणतात ‘ मार्गावर अंधार पडे । तेथे प्रकाशाची व्यवस्था घडे । ऐसे करावे चहूकडे । कार्यकत्यांनी ‘ ( अ . १३ . ८२ ) कोंडवाड्याची सोय करावी मोकाट जनावरे – गाईगुरे पिकांची नासाडी करतात अशा जनावरांना कोंडवाड्यात आणून बंदिस्त करणे अत्यावश्यक असते. अनेक गावात कोंडवाडेच नाहीत म्हणून ‘ कोंडवाड्याचीहि व्यवस्था करावी ‘ ( अ . १३ . ८३ ) अशी सूचना ग्रामगीतेच्या माध्यमातून गावकऱ्यांना राष्ट्रसंतांनी केलेली आहे. आरोग्यधाम अर्थात दवाखाना गावात असावा. आजच्या काळात ही सुविधा गावोगावी पोहचली असली तरी आजारावर पाहिजे तसा उपचार केला जात नाही.गावात आजही प्रसूती किंवा शस्त्रक्रिया आरोग्य केंद्रात केली जात नाही.अनेकदा रुग्ण दगावतो. म्हणूनच वं . महाराज म्हणतात , गावाचे आरोग्य असावे उत्तम । सर्व प्राणीमात्रांसि लाभावे क्षेम । म्हणोनि चालवावे आरोग्यधाम । गावामाजी ‘ ( अ . १३ . १०९ ) सुतिकागृहाची व्यवस्था अवश्य व्हावी गावात दवाखान्यासोबत सुतिकागृहही असलेच पाहिजे असा आग्रह करताना वं . महाराज म्हणतात ‘ जेथे पुरुषांचा दवाखाना । तेथे हवी सुतिकागृहाचीहि योजना । दोहोचीहि आवश्यकता ग्राम – जना । भासतसे अत्यंत ‘ ( अ . १३ . ११२ )
• बेरोजगारी निर्मूलन
निसर्गाची अधुरी साथ आणि आधुनिकीकरनाची अधुरी साधणे यामुळे ही अवस्था प्राप्त झाली आहे. दोन चार वर्षांत दुष्काळ हा ठरलेलाच आहे. बेकारी नि बेरोजगारी गावातल्या गल्लोगल्ली आहे.अविकसित आणि विकसनशील राष्ट्रांत कळीचा प्रश्न बेरोजगारी आहे . विकसित राष्ट्रे रोजगार निर्माण करण्यासाठी प्रात्यक्षिकदृष्ट्या प्रयत्न करतात आणि बेरोजगारी निर्मूलन करण्याच्या दृष्टीने आर्थिक योजना महत्त्वाची भूमिका बजावते. परि जयांना होणे आहे साहेब । लोकांवरी कसावया रुबाब । न कष्टता इच्छिती आराम खूब । तेचि राहती बेकार । । ३३ । । ( अध्याय १८ , ‘ श्रम – संपत्ती ‘ ) त्यांच्या मते, प्रत्येकाने कार्य करायला हवे . ग्रामीन जीवनात येणाऱ्या अडचणी घालवण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हायला हवेत , जोडधंदा हा शेतीचा फार मोठा आधारस्तंभ आहे. , स्त्री – पुरुषांसाठी छंद निर्मिती करून ग्राम उद्योगात भर घातली पाहिजे.अलीकडे ग्रामीण उद्योगाला अवकळा प्राप्त झाली आहे. कौशल्यपूर्ण कार्य ककरण्याची इच्छा ग्रामीण वातावरणात दिसत नाही.पूर्वीचे कलाकुसर आता गावात दिसत1 नाही. मृत प्राण्याच्या कातडीपासून तयार केलेली पादत्राणे , चट्या , खुर्व्या , पलंग , गोणे , साबण , बैलांची शृंगारसाधने , रंग यांच्या उत्पादनाचे कार्य अंमलात यायला पाहिजे.पण वास्तवात असे चित्र उलट झाले आहे.ह्या सगळ्या वस्तू आता शहरात बनू लागल्या आणि ग्रामीण माणूस खरेदी करतो आहे. कदाचित राष्ट्रसंताच्या ऐसी असावी कलाकुसरी । उद्योगधंदे घरोघरी । जराहि न दिसेल बेकारी । वाढली कोठे । । ६७ । । ( अध्याय १८ , ‘ श्रम – संपत्ती ‘ ) या विचारला उपयोगात आणले असते तर आज बेरोजगारी चे प्रमाण कमी दिसले असते. ग्रामीण अर्थव्यवहारात ते उद्योग समिती , श्रीमंतांचा आर्थिक वाटा , अल्प बचत ग्रामीण पेढी , सहकारी संस्था या मापदंडांकडे ते निर्देश करतात. गावी असावी उद्योग – समिती । जी सतत करील उद्योग उन्नती । गावाचे आर्थिक जीवन हाती । घेवोनि लावील सोय जी । । ८७ । । गावाचिया धनिकांकडोनि । संपत्तीचा वाटा मिळवोनि । सर्वांच्या हितासाठी रात्रंदिनी । उपयोग करावा तयांचा ॥ ८८ ॥ काही असती जमीनदार । तेचि गावचे अर्थभंडार । त्यांना सर्व कारभार । सोपवावा लावावा मजूरांवरी । । ८९ ॥
• ग्राम आणि राजकारण
राजकारण हा ग्रामीण भागातील केंद्र बिंदू होत आहे.प्रत्येक बाबीला राजकीय जोड देणे हे अगत्याचे समजले जाते. गावातील काही पुढारी नेते स्वतःला मोठं समजून घेतात.मी पणाचा आव आणून गावाचा मुखीया समजतात. त्यामागे तो स्वतः एखाद्या राजकिय पक्षाचा नेता समजतो.पण नेता कसा असावा,याबाबत राष्ट्रसंताच्या विचाराला लक्षात घेतले पाहिजे. ज्या नेत्यांना खरोखरच ग्रामविकास करायचा आहे त्यांनी प्रथमतः सत्याशी नाते जोडले पाहिजे. आपल्या कष्टावर जगले पाहिजे.कुणाचे उपकार अंगी न घ्यावे । कमीत कमी खर्चाने राहावे ।।(अ.7.33)अशी वागणूक ठेवली तर त्यांच्या शब्दाला वजन येते. न करावी कोणाची निंदस्तुती।आपण आदर्श करावी कृती । स्त्रिया, मुले, वृद्धादी सर्वसांगाती । वागावे प्रेमे, विश्वासे ।(अ.7.42)गावातील काही तरुणगावातला युवक कोणत्यातरी राजकिय पक्षाचा कार्यकर्ता झालेला आहे. थोड्याच दिवसात तो गावाचा नेता म्हणून नावारूपास येतो. परंतु प्रत्येक गावातील तरुणांनी नेता बनण्यापूर्वी प्रचारक झाले पाहिजे. समाजाची सेवा केली पाहिजे. कायद्याचा अभ्यास केला पाहिजे.लोकांना मार्गदर्शन केले पाहिजे.त्यांना समाजकार्यात सहभागी करून घेतले पाहिजे. प्रचारक हा बुद्धिवान असतो,त्यामुळे त्याला चौफेर ज्ञान असले पाहिजे. काही जीवनोपयोगी कलाही आत्मसात केल्या पाहिजे. हे गुण जर नेत्यांनी स्वतः मध्ये आणले तर ग्रामीण विकास व्हायला वेळ लागणार नाही.यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फार मोलाचा सल्ला देताना म्हणतात की, तरी वक्त्या पंडिताहूनी लोका।वजन तयाचे ।।(अ 9.14)असे लोक निर्माण झाले तर नवा भारत निर्माण करता येईल. राष्ट्संतांनी अशा सेवकाला वनपुष्पे म्हटले आहे.नसेना कोणा त्यांची माहिती ।सुगंध उधळती वनपुष्पे(अ.9.15)राष्ट्रासतांनी साधे उदाहरण दिले आहे.मोठे महाल उभारले पहावयास उंच दिसले। तरी ते दगडावरी ठाकले।पायाच्याची ।(अध्याय 9.16)पाईक दगड काही दिसेना।परी महत्त्व त्याससी असे जाणा ।(अ 9.17)ही बाब लोकांसमोर मांडली.
• समारोप
आज कोणत्या ना कोणत्या रूपाने येणारे संकट पेलण्याची क्षमता खालावली आहे.त्यावर मात करताना निराशा,अपयश, वैफल्यग्रस्त जीवन वाट्याला येते.व्यसन हे त्यांच्या जीवनाचा भाग होते.आज ग्रामीण समस्या वाढण्याचे कारण असे की, व्यसनाधिनता घरोघरी पसरत चालली आहे. कृषीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होतो.रूढी प्रथा परंपरा चे वाढते प्रस्थ खेड्याच्या जनमानसिकतेतून बाहेर पडू शकत नाही. श्रम करण्याची क्षमता आहे परंतु माल विकण्यासाठी असणारे ज्ञान व कौशल्य आत्मसात केले नाही.अर्थात व्यापारी,दलाल,बुवा, भोंदूसाधू हे सगळे शेतकऱ्यांच्या कष्ठावर गरीबीचा फायदा घेत आहे.आधुनिक शेती करणे काळाची गरज आहे, त्यादृष्टीनं प्रयत्नही होत आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीची मशागत करणे ही बाब छोट्या शेतकऱ्याला परवडत नाही.पशुपालनाचा जोडधंदा आता शेतीला पूरक राहिला नाही. उत्पनाची साधने वाढायला पाहिजे होती.परंतु घटत चाललेले शेतीचे क्षेत्र आणि शेतीवर वाढत चाललेली छुप्पी बेरोजगारी यामुळे नव्या समस्या ग्रामीण समाजात आहेत.मुलीच्या लग्नकरिता,मुलांच्या शिक्षणासाठी, कुटूंबाच्या भल्यासाठी रात्रंदिवस श्रमाचा गाडा ओढणाऱ्या शेतकऱ्याचे स्वप्न पूर्ण होईल काय ? राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचा तेथील येथील जनमानसावर का पडू नये ?शहरे ग्रामीण भागातील समाजाला हात देऊन साथ देत नाही,शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून काही ना काही प्रमाणात भौतिक सुधारणा होत आहे.जसे गावातील कच्चे रस्ते डांबरीकरण,सिमेंटचे रस्ते होत आहेत,दळणवळण वाहतूक व्यवस्था सुधारली आहे,पूर्वीच्या मनोरंजन साधनाऐवजी नव्या मनोरंजन साधनांनी खेड्यात आपले ठाण मांडले आहे.टी.व्ही.मोबाईल, लॅपटॉप.फर्निचर, असे बरेच काही…..!तरीही मात्र भारतातील बरीच गावे हागणदारी मुक्तीच्या प्रश्नातच उभी आहे.आरोग्यविषयक जनजागृतीची मोहीम कामात येत नाही.व्यसन हे ग्रामीण समाजात खोल रुजले आहे. शासन गावस्तरावर दारूबंदीची मोहिम राबवित आहे. परंतु आजही लपून – चोरुन विषारी दारुची विकी गावात सुरु आहे.व्यसनाच्या जगात वावरत असलेली ग्रामीण भागातील शेतकरी अत्यंत लाजिरवाणे जगताना दिसतो.यंत्रसंस्कृतीचा प्रवेश झाला हे गैर नाही,पण अप्रत्यक्षपणे श्रम संस्कृतीच्या अंत होत आहे हे खोटे नाही.ग्रामपंचायत मार्फत दिवा बत्तीची सोय झाली,खेडे रस्त्यावर चमकून दिसते.रस्त्यावरचा लख्ख प्रकाश घरात पडतो आहे. मात्र खेडयातील शेतकऱ्यांच्या जीवनातला अंधार दुःख दैन्य अजूनही कमी होत नाही,हा शोक वाटतो. अस्पृश्यता,जातीभेद,स्त्री- पुरुष भेद,मतभेद, गल्लीभेद,शेजार धर्म भेद,मोहल्ला भेद,असे कितीतरी भेद गावाच्या सीमांतर्गत विसावलेले आहे.दारिद्र्यामुळे हाय मोकडुन रडणारे आवाज बंद झाले नाहीत.चोरी- मारामारीचे खेड्यात नवल वाटत नाही.भाऊबंदकितील धुऱ्यातील वाद मिटले नाही.साक्षरता वाढली अन श्रम संस्कृती खालावली.कलाजीवन संपले आणि कायद्याच्या चौकटीत राहून फक्त स्व जगणे सुरू झाले.अनौपचारिक संबंध असलेली ग्रामसंस्कृतीतील मूल्ये खालावली. औपचारिकता वाढीस लागली. अनेक समाजविघातक प्रथा कायदयाने बंद करुनही पशूबळीसारख्या प्रथा पूर्वीसारख्याच आनंदने ग्रामसंस्कृतीत आहेत. म्हणून यासाठी एकच उपाय आहे ! गावागावात राष्ट्रसंताच्या विचाराने समाजकार्याची ज्योत पून्हा उजळली पाहिजे . आणि नव्या दिशेने नव्या उषेचे गीत सूर ‘ पून्हा निर्माण व्हावे.असे वाटते. सामूदायीक प्रार्थनेने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता येईल काय ? हा ही विचार आता प्रगल्भ व्हावा.आणि राष्ट्रसंताच्या आदर्श कल्पलेतील प्रत्येक गाव साक्षात निर्माण व्हावा.
संदर्भ ग्रंथः 1) रचनाकार वं . राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज : ग्रामगीता , १२ मार्च २०१७। 2 ) संपा . अक्षयकुमार काळे : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यक्ती आणि वाङ्मय प्र . आ . १५ ऑगस्ट २००८ 3 ) प्रा . रघुनाथ कडवे : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यक्तीमत्व ( जीवनकला ) प्र आ . २२ जुलै २०१३ 4 ) वी . स चौघुले : संतांची समाजधारण प्र आ २१ जानेवारी २०१२ 5 ) गजानन श . वेले राष्ट्रसंतांचे सामाजिक आणि धार्मिक विचार प्र . आ . २५ जुलै २०१०
– डॉ. हेमराज दा. निखाडे (एम.ए. एम.एड., ;नेट & जे.आर. एफ. अस्थायी सहायक प्राध्यापक)
मराठी विभाग रा.तु. म. नागपूर विद्यापीठ नागपूर. मोबाईल : ८३२९०१९८५६