राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा दीपकआबा?
उमेश पाटलांच्याही नावाची चर्चा
दीपकआबा साळुंखे – पाटील व उमेश पाटील हे दोन्ही नेते पक्षात चांगलेच सक्रिय आहेत. यापेक्षा वेगळा चेहरा या पदावर मिळणे दुरापास्त आहे.
सोलापूर : विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. साठे हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांचा राजीनामा मंजूर झाला तर जिल्हाध्यक्षपदाची माळ माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे- पाटील यांच्या गळ्यात पडू शकते. याशिवाय जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील हे सुध्दा दावेदार असू शकतात.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशा स्थितीत त्यांनी राजीनामा दिल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.
कोणावर जबाबदारी?
सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने आपली ताकद भक्कम केली आहे. येत्या काही दिवसांत नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका, काही ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. अशा स्थितीत जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी अनुभवी व्यक्तीवर दिली जावू शकते. दीपकआबा साळुंखे यांनी यापूर्वी हे पद भूषविले असल्याने त्यांच्या नावाचा प्राधान्याने विचार केला जावू शकतो.
नव्या जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी आमदार दीपकआबा साळुंखे व जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. श्रेष्ठी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
साठे यांचा राजीनामा स्वीकारणार का?
विद्यमान जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचा राजीनामा स्वीकारण्यात येणार का याबद्दलदेखील साशंकता व्यक्त होत आहे. कारण निवडणुकीला खूप कमी अवधी आहे. मात्र राजीनाम्याचे कारण देताना प्रकृती अस्वास्थ्यामुळे, तसेच जास्तीचा प्रवास होत नसल्याने हा राजीनामा दिल्याचे साठे यांनी स्पष्ट केले आहे. हीच वस्तुस्थिती असेल तर त्यांचा राजीनामा स्वीकारला जावू शकतो.
गटबाजी रोखण्याचे आव्हान!
शरद पवार हे माढा लोकसभा मदारसंघातून निवडणुकीस उभे होते तेव्हा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दीपकआबा साळुंखे – पाटील यांच्याकडे होती. या निवडणुकीत दीपकआबा यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली होती. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीच्या प्रदेश कमिटीवर घेण्यात आले. मागील काही वर्षांत जिल्ह्यात पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, मोहोळ या तालुक्यांतील राष्ट्रवादीत गटबाजीची प्रचंड धुसफूस सुरू आहे. अनेक पदाधिकारी पक्ष सोडून गेले आहेत. ही गटबाजी रोखण्याचे आव्हान नव्या जिल्हाध्यक्षापुढे असणार आहे.
जमेच्या आणि चुकीच्याही बाजू
‘जनता दरबार’च्या माध्यमातून जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील हे माजी आमदार राजन पाटील यांच्यावर जोरदार आरोप करत आहेत. त्यामुळे उमेश पाटील यांच्या जिल्हाध्यक्षपदाला माजी आमदार राजन पाटील यांचा सर्वात मोठा विरोध असेल हे निश्चित आहे. याशिवाय उमेश पाटील यांच्या माध्यमातून नव्या दमाच्या व्यक्तीकडे जिल्हाध्यक्षपद गेल्यास राष्ट्रवादीतील ज्येष्ठ मंडळी नाराज होण्याची शक्यता आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत दीपकआबा साळुंखे – पाटील यांनी बंडखोरी केली होती. शिवसेना उमेदवार तथा विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांना त्यांनी पाठिंबा दिला होता. आम. पाटील यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दीपकआबा साळुंखे – पाटील यांच्यासमोरच झालेली टीका या गोष्टी देखील आगामी काळात समोर येण्याची शक्यता आहे.
असे असले तरी दीपकआबा साळुंखे – पाटील व उमेश पाटील हे दोन्ही नेते पक्षात चांगलेच सक्रिय आहेत. यापेक्षा वेगळा चेहरा या पदावर मिळणे दुरापास्त आहे.