थिंक टँक स्पेशलमाध्यमविश्वराजकारणरोजगार/शिक्षणविज्ञान/तंत्रज्ञानशेतीवाडी

राणेंची भ्रांती आणि पवारांची औद्योगिक क्रांती

विजय चोरमारे यांचा सणसणीत लेख

Spread the love

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री असलेले नारायण राणे यांना काँग्रेसने विधानपरिषदेवर पाठवले होते. म्हणजे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदार संघातून पराभूत झाल्यानंतर त्यांनी वांद्रे मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली. तिथेही त्यांचा पराभव झाला. दोन पराभवांनंतरही राणे यांना काँग्रेसने विधान परिषदेवर पाठवले होते. विधान परिषदेत असताना नारायण राणे यांनी एकदा भाजप-शिवसेना युतीवर जोरदार हल्ला केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तो जिव्हारी लागला.

माध्यमांचा प्रपोगंडा!

 

नंतर बोलताना फडणवीस यांनी राणे यांच्या आरोपांना उत्तर न देता, राणे यांच्या ब-याच फाईल्स आपल्याकडे असल्याचे सभागृहात जाहीरपणे सांगितले. त्यानंतर राणे यांचा आवाजच बंद झाला. पुढे फडणवीस आपल्याकडे असलेल्या राणे यांच्या फाईल्स घेऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे गेले. त्या फाईल्स बघून दोघांनी राणे यांना राज्यसभेवर घेतले आणि पुढे मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेऊन त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी दिली.

रामदेव बाबांचा पतंजली समूह उतरणार माध्यम क्षेत्रात

या प्रवासात बरेच रंजक तपशील आहेत. ते टाळून एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करावा लागेल. सप्टेंबर २०१७मधली घटना आहे.

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप प्रवेशासाठी राणेंची धडपड चालली होती, तेव्हा दिल्लीत पत्रकारांनी ‘राणेजीं का क्या करेंगे?’, असा प्रश्न भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांना विचारला होता. तेंव्हा ‘राणे? मैं तो गाने सुनने जा रहा हूँ. आना हैं तो चलो’, असं म्हणत शहा यांनी विषय उडवून लावला होता.

“सेक्स तंत्रा” कार्यक्रम अखेर रद्द

 

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे केंद्रातले मंत्रिपद राणे यांनी स्वीकारून सव्वा वर्ष झाले आहे. या काळात त्यांनी आपल्या खात्यासंदर्भात कधी काही बोलल्याचे ऐकिवात नाही. अर्थात ठाकरे परिवाराला शिव्या देण्यासाठी त्यांना मंत्री केले आहे, त्यामुळे त्यांच्याकडून तशी काही अपेक्षाही बाळगण्यात अर्थ नाही. परंतु महाराष्ट्राचा विकास आपण आणि आपल्या दोन मुलांनीच घडवून आणला आहे, अशा अविर्भावात ते प्रत्येक विरोधी नेत्याबद्दल तुच्छतेने बोलत असतात. वेदांता आणि फोक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यापासून फडणवीसांपर्यंत सगळे नेते तोंड लपवत असताना, `पडलो तरी नाक वर` अशा अविर्भावात एकटे राणेच वावरताना दिसत आहेत.

 

याच अविर्भावात त्यांनी एका प्रश्नावर `शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी कोणती औद्योगिक क्रांती घडवून आणली? असे बालिश विधान केले. राणे मुख्यमंत्री होते, उद्योगमंत्री होते आणि आताही ते केंद्रात उद्योगाशी संबंधित खात्याचेच मंत्री आहेत. राणे यांना अभ्यासू नेते मानले जाते. परंतु त्यांचे हे विधान त्यांच्या अभ्यासूपणाबद्दलची भ्रांती (भ्रम) दूर करणारे आहे.

पितृपंधरवडा : पिंडदान, केस कापणे हा मूर्खपणाच!

 

तर नारायण राणे यांच्या माहितीसाठी शरद पवार यांनी औद्योगिक क्षेत्रात केलेल्या क्रांतिसंदर्भातील ही काही उदाहरणे. अर्थात राणे यांच्यादृष्टिने ही कामे किरकोळीत मोडणारी असू शकतात. पण ती त्यांना माहीत असावयास हवीत.

हर्षवर्धन पाटील बदाबदा मारायचे; शहाजीबापूंनी जागवल्या बालपणीच्या आठवणी

१९९०च्या दशकातील घटना आहे. नानासाहेब नवले यांच्या अध्यतेखाली एका संस्थेने हिंजवडीमध्ये साखर कारखान्याचा पायाभरणी कार्यक्रम आयोजित केला होता. शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. साखर कारखान्याच्या पायाभरणी कार्यक्रमात बोलताना, “या ठिकाणी साखर कारखाना होणार नाही, ही जागा माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे,” अशी थेट घोषणाच पवार यांनी केली. त्यावर पवारांचे अनेक सहकारी नाराज झाले, दुखावले.

 

पवारांनी त्यांची समजूत काढली. साखर कारखान्यासाठी पर्यायी जागा देण्याचे तसेच माहिती तंत्रज्ञान पार्कसाठी संपादित जमिनींचा चांगला मोबदला देण्याची ग्वाही दिली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या घोषणेमुळे पवारांचे नेतृत्व मानणा-या साखर उद्योगाला धक्का बसला. पवारांच्या त्यावेळच्या निर्णयामुळे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पुणे हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे आणि देशातील प्रमुख आयटी हब आहे. पवार आयटी क्रांतीची केवळ कल्पना करून थांबले नाहीत, तर पुणे परिसरात या कंपन्यांना लागणाऱ्या पूरक व्यवस्थाही त्यांनी उभ्या करून दिल्या.

एमआयडीसी, सिडको आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाने राज्यात ३७ आयटी पार्क विकसित केले आहेत. तेथे सुमारे १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, सुमारे पावणे तीन लाख जणांना रोजगार मिळाला आहे. आयटी उद्योगासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी खासगी क्षेत्रालाही सहभागी करून घेण्यात आले असून त्याअंतर्गत ५४६ खासगी आयटी पार्क मंजूर करण्यात आले आहेत. तेथे ९२,४८४ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.

 

आयटी क्रांतीमध्ये पुणे विभाग राज्यात अग्रेसर असून, या भागात १९३ खासगी आयटी पार्क आहेत. त्यानंतर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर (१७५), ठाणे (१६४), नागपूर (५), नाशिक (५), औरंगाबाद (३), आणि वर्धा (१) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

कोव्हिड-१९ काळातील लॉकडाउनमध्ये २०२०मध्ये महाराष्ट्रातील तंत्रज्ञान कंपन्यांनी, त्यातही प्रामुख्याने पुणे आणि मुंबईतील कंपन्यांनी २२ हजार कोटींहून अधिक रुपयांची सॉफ्टवेअर निर्यात केली. राज्याच्या सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये पुणे आणि मुंबईचा वाटा ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यातील १० लाख लोकांना रोजगार देण्यासाठी जून २०१५मध्ये आयटी आणि आयटीईएस धोरण राज्य सरकारने आखले. त्यातून ५० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. २०१८-१९मध्ये महाराष्ट्रातील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमधून ८५ हजार कोटी रुपयांची सॉफ्टवेअर निर्यात केली गेली. हाच आकडा २०१९-२०मध्ये ८७ हजार कोटी रुपयांवर पोहोचला. सॉफ्टवेअर निर्यात क्षेत्रात भारतातील पहिल्या चार शहरांमध्ये पुण्याचा समावेश होतो. महाराष्ट्रातील आयटी निर्यातीत पुण्याचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. विकसित होणारे आयटी क्षेत्र आणि त्यासाठीच्या पायाभूत सुविधांची उपलब्धता यामुळे पुण्यामध्ये दुसरे बेंगळुरू होण्याची क्षमता आहे. आयटी क्षेत्राने पुणे महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था आणि भूगोल बदलला असून, त्यामध्ये शरद पवार यांचे योगदान निर्विवाद आहे.
शरद पवारांनी पुढाकार घेतला नसता तर पुण्याच्या प्रदेशात आज जसा एमआयडीसीचा विकास झाला आहे तसा तो झाला नसता, ही वस्तुस्थिती आहे. पुणे प्रदेश भारतातील सर्वांत मोठा ऑटो हब बनला आहे आणि या भागात सुमारे १.३० लाख नोंदणीकृत लघू आणि सूक्ष्म उद्योग (एमएसएमई) आणि ६५० ते ७०० मोठे उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये मिळून सुमारे १७ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. देशातील मोटारींच्या उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा उत्पन्न आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत अंदाजे ३५.१ टक्के आहे. या वाहन उद्योगांसाठीच्या सहायक उद्योगांची पुणे, पिंपरी-चिंचवड भागांतील संख्याही चार हजारांपेक्षा जास्त आहे. भारतीय ऑटोमोबाइल उद्योगातील सर्व दिग्गज कंपन्या उदा. टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज ऑटो, जनरल मोटर्स, फोक्सवॅगन, मर्सिडीज पुणे परिसरात आहेत.

चार वेळा मुख्यमंत्री असलेले शरद पवार उद्योगमंत्रीही होते. त्या काळात त्यांनी दूरदृष्टिने ज्या गोष्टी केल्यात त्याही महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. उद्योगमंत्री असताना पवारांनी आपले मित्र असलेले सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील यांना एमआयडीसीचे डेप्युटी सीईओ बनवले. त्यांच्यामार्फत एमआयडीसीसाठी जमिनींचे यशस्वी अधिग्रहण केले.
श्रीनिवास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘पुणे-मुंबई रस्त्यावरील रसायनीजवळील पाताळगंगा एमआयडीसीची साडेचारशे एकर जमीन दहा हजार रुपये एकराप्रमाणे केवळ ४५ लाख रुपयांमध्ये अधिग्रहीत झाली. रिलायन्सचे धीरूभाई अंबानी, बॉम्बे डाईंगचे नस्ली वाडिया, इंडियन ऑईल, कपिल मेहरा, डीएस कोठारी, योगेश मफतलाल या उद्योजकांनी जमिनी घेतल्या. या कंपन्यांनी जमिनींचा योग्य उपयोग केला. त्यानंतर जेजुरीची एमआयडीसी उभी राहिली. उद्योग वसाहतीला आवश्यक असणारी बरड जमीन. रस्ते, रेल्वे, नाझरे धरणातील कऱ्हा नदीचे पाणी, वीज या सर्व सुविधा तिथे उपलब्ध होत्या. ही एमआयडीसी पुरंदरसारख्या दुष्काळी भागाला वरदान ठरली आहे. सध्या या एमआयडीसीत दोनशेहून अधिक कारखाने आणि सहा हजाराहून अधिक कामगार काम करीत आहेत.

या एमआयडीसी उभ्या राहत असताना पवार सतत लक्ष ठेवून होते. पाठपुरावा करत होते. केवळ पुणे जिल्हाच नव्हे, तर राज्याच्या इतर भागांतही जिथे जिथे एमआयडीसी उभ्या राहात होत्या, तिथे तिथे पवार व्यक्तिगत लक्ष ठेवून होते. तिथे कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेत होते. पाताळगंगासोबतच कोकणातली नागोठणे, कुडाळ, रत्नागिरी या ठिकाणच्या एमआयडीसी पवारांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिल्या असल्याचे श्रीनिवास पाटील सांगतात.
राणे यांच्या माहितीसाठी मुद्दाम सांगावी अशी गोष्ट म्हणजे रत्नागिरी येथे फिनोलेक्सचा कारखाना पवार यांनीच पाठवला. त्याला परवनगी देताना एक महत्त्वाची अट घातली, ती म्हणजे कंपनीने रत्नागिरीत इंजिनियरिंग कॉलेज सुरू करावे. कॉलेज, वसतिगृह आणि स्टाफ कॉलनीला एम आय.डी.सी. मध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली. फिनोलेक्स कॉलेजमध्ये केमिकल, मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग यासारखे अभ्यासक्रम शिकविले जातात. कंपनीत कार्यरत सुमारे ७५ टक्के कर्मचारी या कॉलेज मध्ये शिक्षण घेतलेले आहेत. फिनोलेक्स कंपनीचे रत्नागिरीच्या विकासात किती योगदान आहे, याची कल्पना राणे यांना असावी.

रत्नागिरीचे विमानतळही शरद पवार यांच्या प्रयत्नातूनच साकारले आहे.

तूर्तास एवढेच!

राणे यांच्या कुडाळ-कणकवलीसाठी पवार यांनी काय काय केले, याची नुसती जंत्री दिली तरी राणे यांचे डोळे फिरल्याशिवाय राहणार नाहीत!
……………….
(इनपुट्सः राधेश्याम जाधव, श्रीरंग गायकवाड)

पाहा खास व्हिडिओ

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका