राजू शेट्टींच्या विराट ऊस परिषदेने कारखानदारांना भरली धडकी
आ. शहाजीबापू पाटलांनाही गर्दीचा फटका

थिंक टँक / नाना हालंगडे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर येथे विराट ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेस हजारो ऊस उत्पादक उपस्थित होते. मागील वर्षाची एफ.आर.पी. आणि ज्यादा २०० रुपये रक्कम देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. येत्या काही दिवसांत ही मागणी पूर्ण न झाल्यास ७ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
मागील वर्षाची एफ.आर.पी. आणि ज्यादा २०० रुपये रक्कम देण्याची मागणी केलीय. दरम्यान ७ नोव्हेंबर २०२२ पूर्वी ही रक्कम द्या अन्यथा पुण्यात आल्यावर काय होईल सांगता येणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टींनी दिला.
ते कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथल्या विक्रमसिंह मैदनावर २१ व्या ऊस परिषदेत बोलत होते.
दरम्यान, वजन काटेही ऑनलाइन करण्याची मागणी करत शेतकरी अंगावर आले तर सरकारचं अवघड होईल असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे. राजू शेट्टींनी कारखानदारांना १७ नोव्हेंबर२०२२ पर्यंतचा अल्टिमेटम दिला. १७ नोव्हेंबर पूर्वी कारखान्यांनी पैसे नाही दिले तर उसाच्या तोडी बंद पाडत बेमुदत राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याच्या घोषणा शेट्टी यांनी केलीय.
चालू गळीत हंगामात एकरकमी एफआरपीसह अधिकचे ३५० रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या ऊसाची एफ.आर.पी. अधिक २०० रुपये तातडीने जमा करा, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत १३ ठराव मंजूर करण्यात आले.
जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर दरवर्षी प्रमाणे यांदाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानीची २१ वी ऊस परिषद पार पडली. यावेळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होती.
स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. परंतु, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर ऊस परिषदेस गैरहजर होते.
शेट्टी म्हणाले, ‘संघटनेची पुन्हा नव्याने सुरुवात केली जाणार आहे. एकवीस वर्षांपूर्वी उत्पादकांच्या मागणीसाठी आंदोलनाची घोषणा याच दिवशी केली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न संपत नाहीत म्हणून निराश होऊन घरात बसणार नाही. एकवीस वर्षांपूर्वी राज्यातील विविध साखर कारखान्याचे संदर्भ देत या भागातील कारखान्यांना तो दर देणे का परवडत नाही, अशी विचारणा केली होती. मात्र, आज त्या कारखान्यांपेक्षा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखाने किमान तीनशे रुपयांपेक्षा जास्त दर उसाला देत आहेत, हे स्वाभिमानीच्या आंदोलनाचे यश आहे. स्वाभिमानीच्या ऊस परिषदेमध्ये जे ठरते त्या पद्धतीनेच काम होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आजवर संघर्ष केला.
ते म्हणाले, ‘मी, सहकार संपवायला निघालोय अशी वल्गना करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की संघटनेच्या चळवळीमुळेच सहकार टिकून आहे. २१ वर्षांतील आंदोलनामुळेच सहकारात शिस्त निर्माण केली आहे. साखर कारखाने वजनात दहा टक्के काटा मारतात. यातून राज्यात एक कोटी ३२ लाख टन उसाची चोरी केली जाते. यातून साडेचार हजार कोटींची साखर काळ्या बाजारात विकली जाते.’वर्षाला साडेचार हजार कोटींचा दरोडा टाकणाऱ्या कारखानदारांवर सरकार कारवाई करणार आहे की नाही; की सरकारचादेखील यात काही हिस्सा आहे, असा आरोप करून श्री. शेट्टी म्हणाले, ‘साडेचार हजार कोटींची साखर काळ्या बाजारात विकली जाते. त्यामुळे कारखान्याच्या गोदामांवर छापे टाकण्याची मागणी केली होती.
वजनात काटामारी होत असल्याचे पुरावे देऊन ट्रॉलीचे वजन दोन दिवसांत दहा किलोने कमी होऊ शकते का? टोळ्यांनी फसविल्याने राज्यातील १३० वाहनधारकांनी आजवर आत्महत्या केल्या आहेत.’ ते म्हणाले, ‘कारखानदार काटामारी करतात असे म्हटले की त्यांना राग येतो. मात्र, दोनशे पैकी एकाही कारखान्याने बाहेर वजन करून कारखान्यात ऊस घाला, आमचा काटा पारदर्शक आहे, असे म्हटले नाही. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास कितपत ठेवावा, हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. आलमट्टीच्या पाण्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांना फटका बसतो. धरणाची उंची वाढवल्यास शेती पूर्णपणे नामशेष होण्याचा धोका आहे. त्यामुळे आलमट्टीच्या उंची वाढीस आमचा ठाम विरोध राहील.’ ते म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय बाजारात भारत ब्राझीलपेक्षा साखर उत्पादनात अव्वल ठरला आहे.
शंभर लाख टन साखरेची निर्यात झाली आहे. ३३०० ते ३४०० रुपये दरांनी साखर विकली गेली. देशात महिनाभर पुरेल इतकीच साखर शिल्लक आहे. शिवाय दहा लाख टनाने उत्पादनही घटणार आहे.’ ते म्हणाले, ‘गेल्या चार वर्षांत औषधांच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असताना ऊसदरात मात्र त्या पटीने वाढ होताना दिसत नाही. प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी संघटनेने तीन वेळा मोर्चा आणि आंदोलने केली. केवळ स्वाभिमानीच्या आंदोलनामुळेच प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान खात्यावर मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मी विशेष अभिनंदन करेन.’
सोन्याची कांडी भंगाराच्या किमतीत विकू नका. त्याला सोन्याची किंमत घ्या. यावर्षी अतिवृष्टीने सोयाबीन, उडीद, मूग, भुईमूग, भात, कापूस, भाजीपाला आदी पिके नष्ट झाली आहेत. फक्त उसावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. त्यामुळे उसाला योग्य मोबदला मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. सात नोव्हेंबरपूर्वी दराचा फॉर्म्युला ठरला पाहिजे. त्यानंतर आणखी वेळ मिळणार नाही, असेही श्री. शेट्टी यांनी सरकारला बजावले. गतवर्षी तुटलेल्या उसाला दोनशे रुपये प्रतिटन १७ नोव्हेंबरपूर्वी मिळाले पाहिजेत; अन्यथा आम्ही काय करू सांगता येणार नाही. गतवर्षीच्या उसातून टनाला सरासरी ३८० रुपये कारखान्याकडे शिल्लक आहेत, असा दावाही त्यांनी केला.
गतवर्षीचा दर गृहीत धरून यावर्षी एकरकमी एफआरपी आणि ३५० रुपयांची मागणी केली आहे. हंगाम संपल्यानंतर लगेचच कारखान्यांनी ३५० रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना अदा करावेत; अन्यथा त्यांना सळो की पळो करून सोडू. १७ आणि १८ नोव्हेंबरला तोडी बंद पाडू. तरीदेखील मागणी पूर्ण झाली नाही तर बेमुदत आंदोलन करू, असा इशारा श्री. शेट्टी यांनी दिला. कारखान्याचे काटे ऑनलाईन करण्याच्या निर्णयाचा जाब साखर आयुक्तांना विचारणार आहे. साखर कारखान्याच्या काट्यांना राजकीय दबाव आहे. त्यामुळे हा प्रश्न सहजासहजी मार्गी लागणार नाही. त्यासाठी संघटनेलाही ताकद लावावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.
केंद्राच्या परवानगीशिवाय एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तो आम्हाला कदापि मान्य नाही. ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसांत एकरकमी एफआरपी मिळायला पाहिजे. तत्पूर्वी, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहिदांना श्रद्धांजली वाहून ऊस परिषदेला प्रारंभ झाला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे, स्वाभिमानी पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालिंदर पाटील, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप आदींनी भाषणातून सरकार आणि साखर कारखानदारांवर टीकेचा भडीमार केला.
स्वाभिमानी पक्षाचे शिरोळ तालुका अध्यक्ष शैलेश आडके, डॉ. महावीर अकोळे, माजी नगरसेवक शैलेश चौगुले, विठ्ठल मोरे, राजेंद्र गड्ड्याणावर, सागर मादनाईक, शंकर नाळे, शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा अपराज, डॉ. सुभाष अडदंडे, सचिन शिंदे, संदीप राजोबा, जयकुमार कोले यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष, युवती आघाडीचे राज्यातील विविध जिल्ह्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
परिषदेतील ठराव
दोन टप्प्यांत एफआरपी देण्याची बेकायदेशीर दुरुस्ती राज्य सरकारने तातडीने रद्द करावी * गतवर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी पूर्णपणे देऊन अधिक २०० रुपये तातडीने द्या * राज्यातील सर्व कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करावेत. * मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना खरिपातील पीक विम्याच्या नुकसानभरपाईची अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वी द्या * केंद्राने साखरेचा किमान विक्री दर ३५ रुपये करावा * गुऱ्हाळ प्रकल्पांनाही इथेनॉल उत्पन्नाची परवानगी द्यावी * यंत्राद्वारे तोडणी केल्यास पाचटाची तोडणी घट १.५ टक्के करा* केंद्राने साखर कारखान्यांना साखरेच्या पोत्यावर ‘नाबार्ड’ कडून तीन टक्के व्याज दराने तारण कर्ज द्यावे * शेतीपंपाचे भारनियमन रद्द करून विनाकपात दिवसा बारा तास वीज द्या बॉम्ब पडला तरी हलायचे नाही.
पावसाचा अंदाज घेत ऊस परिषदेला प्रारंभ झाला. अखेरच्या टप्प्यात पावसाचा अंदाज असतानाच आपल्याला उसाला दर घ्यायचा आहे. आपल्याला लढायचे आहे. पाऊस काय बॉम्ब पडला तरी आता हलायचे नाही, असा विश्वास शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना दिला.
ठरावांचे वाचन सुरू असतानाच उपस्थित शेतकऱ्यांनी मंजूर मंजूरचा गजर सुरू केला. यावेळी शेट्टी यांनी ठराव तर वाचू द्या. ही काय कारखान्याची सभा नाही, असे म्हणतात हशा पिकला.ठराव न्यायालयात सादर करणार शेट्टी यांच्याकडून ठरावांचे वाचन सुरू असताना उपस्थितांनी हात उंचावून पाठिंबा दिला. यावेळी शेट्टी यांनी परिषदेतील संमत ठरावाचे व्हिडीओ न्यायालयात सादर करणार असल्याचे स्पष्ट केले.एपीजे अब्दुल कलाम यांच्या आठवणी अठरा वर्षांपूर्वी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी शेट्टी यांना उद्देशून ‘मैं, धन्यवाद देता हु ऐसे मतदारांको जिन्होंने वोट और नोट भी दिये,’ असे गौरवोद्गार काढले होते. त्याची आठवण करून देत आज त्यांची जयंती असून आजची परिषद त्यांना समर्पित केल्याचे श्री. शेट्टी यांनी स्पष्ट केले.
ट्रॅफिकचा शहाजीबापूंना फटका
सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांना या ऊस परिषदेमुळे झालेल्या ट्रॅफिक जामचा फटका बसला.ऊस परिषदेसाठी हजारो शेतकरी जयसिंगपुरात आले होते. जयसिंगपूर ते हातकणंगले हा रस्ता शेतकऱ्यांमुळे जाम झाला होता.