राजू शेट्टींच्या जागी सुरेखा पुणेकरांना विधान परिषदेची संधी?
सुरेखा पुणेकर यांचा १६ रोजी राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई : विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांचे नाव नव्याने समाविष्ठ होण्याचे संकेत आहेत. राजू शेट्टींच्या (Ex. M.P. Raju Shetti) जागी ही अदलाबदली असल्याची चर्चा आहे. या आतल्या गोटातील बातमीला पुष्टी देणारी घटना म्हणजे येत्या 16 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथील राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार (Depuity Chief Minister Ajeet Pawar) यांच्या उपस्थितीत लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी आजवरच्या कलेच्या वाटचालीत रंगभूमी गाजवली आहे. ‘नटरंगी नार’ या स्टेजशो ने विक्रम स्थापित केला आहे. पुणेकर यांची आमदार होण्याची इच्छा अनेक वर्षांपासून आहे. त्यांनी उघडपणे ती बोलूनही दाखवली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काही पक्षांकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र राजकीय घोडेबाजारात त्यांची जादू चालू शकली नाही. आता त्यांच्या आमदारकीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. विधान परिषदेच्या 12 जागांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप मंजूर केलेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, राजू शेट्टी यांच्या नावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे.
राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून राजू शेट्टी यांचं नाव दिले होते. राज्यपालांच्या आक्षेपानंतर राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांचा पत्ता कट केल्याचं बोलले जात आहे. त्याजागी आता सुरेखा पुणेकर यांची वर्णी लागेल, अशी शक्यता आहे. राजू शेट्टी हे सरकारच्या धोरणांवर थेट निरोधी भूमिका घेत असल्याने कदाचित हे घडून येत असावे, असे बोलले जात आहे.
कोण आहेत सुरेखा पुणेकर
शाळेची पायरीही न चढलेल्या सुरेखाताईंनी वयाच्या आठव्या वर्षी पायात घुंगरू बांधले. बैलागाडीचा तमाशा आणि पारावरच्या तमाशापासून त्यांनी लावणीची सुरुवात केली. ‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’, ‘पिकल्या पानाचा’, ‘झाल्या तिन्ही सांजा’, ‘कारभारी दमानं’, अशा एकापेक्षा एक लावण्यांनी त्यांनी रसिकांना वेड लावले. महिलांसाठी ‘नटरंगी नार’ उभी करून तमाशा कलेचं खानदानीपण त्यांनी महाराष्ट्रापुढे आणलं. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नयनबाणांनी घायाळ करणाऱ्या सुरेखा पुणेकर ‘बिग बॉस’मध्येे (Big Boss) सहभागी झालेल्या पहिल्या लोककलावंत ठरल्या.