
स्पेशल स्टोरी/ नाना हालंगडे
संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम उशीराने सुरू झालेला आहे. त्यामुळे धान्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अनेक ठिकाणी अजूनही वापसा नाही. ज्वारीच्या पेरण्याही कमीच झाल्या आहेत. याबाबत रब्बीतील पिकांची काळजी हा विशेष लेख जरूर वाचा.
*गहू : गव्हाची पेरणी करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यातील संदेशाचा अवलंब करावा. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास थायरम अथवा कँप्टन २.५ ग्रॅम या बुरशीनाशकाची अधिक प्रती १० किलो बियाण्यास अँझोटोबँक्टर किंवा अँझोस्पीरीलम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणूचे प्रत्येकी २५० ग्रँमचे एक पाकीट घेऊन बिजप्रक्रीया करावी बागायती गव्हास अर्धे नत्र, संपुर्ण स्फुरद, पालाश पेरणीचेवेळी द्यावे. उरलेले अर्धे नत्र पेरणीनंतर ३ आठवड्यांनी खुरपणीनंतर द्यावे. जिरायत गहू पिकास संपूर्ण नत्र व स्फुरद पेरणीचेवेळी द्यावे.
*हरभरा : बागायती हरभरा पेरणी १५ नोव्हेंबरला पूर्ण झालेली आहे. पेरणीचे अंतर ३० ×१० सें.मी. ठेवावे. २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीवेळी द्यावे बियाणे जाती परत्वे ६०+१०० किलो प्रति हेक्टरी वापरावे प्रतिकिलो बियाण्यास २ ग्रँम थायरम + २ ग्रँम कार्बेन्डँझीम यांची बिजप्रक्रीया करावी, तसेंच पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम व स्फुरद जिवाणूसंवर्धनाची २५० ग्रँमचे प्रत्येकी एक पाकीट घेऊन प्रति १० किलो बियाण्यास बिजप्रक्रीया करावी या सोबतच अगोदर दिलेले हरभरा लागवड तंत्रज्ञान मेसेचा अवलंब करावा.
*करडई : पेरणी झालेल्या पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच पुढीलपैकी एक किटकनाशक फवारावे. डायमिथोएट (रोगार) ३० इ.सी. ५०० मि.ली. किंवा मँलेथिऑन ५० इ.सी. १००० मि.ली. ५०० लिटर पाण्यातून फवारावे किंवा क्विनॉलफॉस १.५ टक्के भुकटी २० किलो प्रतिहेक्टरी धुरळावी. अथवा ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी क्रायसोपर्ला कार्नीयाच्या १० ते १५ हजार अळ्या प्रतिहेक्टरी पिकावर सोडाव्यात.
*पुर्वहंगामी ऊस लागवड
लागवड डिसेंबरपर्यत पूर्ण करावी.या पूर्वी दिलेले पूर्व हंगामी ऊस लागवड तंत्रज्ञान सर्व भाग अवलंब करावा.
*रब्बी सुर्यफुल : पेरणी १५ नोव्हेंबर पूर्ण झालेली आहे.पेरणीपुर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर व स्फुरद जीवाणू प्रत्येकी २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी. रासायनिक खते ६०:३०:३० किलो नत्र, स्फुरद पालाश प्रति हेक्टरी द्यावे. यापैकी ३० किलो नत्र, संपुर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्यावेळी दुचाडी पाभरीने पेरून द्यावे उरलेले ३० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी पाण्याच्या पाळीपूर्वी द्यावे.
*रब्बी ज्वारी : बागायत रब्बी ज्वारीस राहीलेला ५० टक्के नत्राचा हप्ता पीक पेरणीनंतर ३० दिवसांनी द्या. पीक पहिले ३० ते ३५ दिवस कोळपण्या किंवा खुरपण्या देऊन तणमुक्त ठेवा शक्य असल्यास कोरडवाहू ज्वारीस आच्छादनांचा वापर करा कोरडवाहू पिकात २-३ वेळा आंतरमशागत करून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणेचा प्रयत्न करा.
*तूर : तुरीवरील शेंगाचे नुकसान करणा-या पिसारी पतंग, शेंगावरील माशी, घाटेअळीच्या नियंत्रण करा. किनॉलफॉस २५ इ.सी. ८०० मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यू. एस. सी. ५५० मि.ली. ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंगा पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेण्झोएट यांची फवारणी करावी.तुरीवरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी एचएनपीव्ही च्या रोगग्रस्त २५० अळ्यांची (एलई/हे.) पहिली फवारणी पीक फुलो-यात असताना करावी.
*फुलपिकांची काळजी अशी घ्या
-शेवंतीची लागवड करून चार आठवडे झाल्यानंतर शेंडे खुडावेत.
-गुलाबाची छाटणी पूर्ण करावी.
-अँस्टर, निशिगंध व ग्लँडीओलस यास हेक्टरी ५० किलो, १०० किलो व ६५ किलो नत्र अनुक्रमे द्या.
*फळपिकांची काळजी अशी घ्या
*आंबा : आंब्याला मोहोर फुटताच त्याचे संरक्षणासाठी किटकनाशकाची फवारणी किड व रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून करावी फवारणीत १० लिटर पाण्यात २५ टक्के क्विनॉलफॉस (प्रवाही) २० मि.ली. करावी. किटकनाशके आलटून पालटून वापरावीत आंब्याच्या मोहोराची गळ होऊ नये म्हणून १० पी.पी.एम.एन.ए.ए. संजीवक फवारावे. त्यानंतर फळधारणा झाल्यावर ८ ते १० दिवसांनी ह्याच संजीवकाची दुसरी फवारणी करावी म्हणजे फळगळ थांबेल. कलमाच्या खोडावरील फुट काढावी आंबा मोहोरासाठी आवश्यक संजीवके पानांमध्ये व झाडाच्या शेंड्यामध्ये तयार होतात. दरवर्षी मोहोर येणाऱ्या नीलम, तोतापुरी यासारख्या आंबा जातीमध्ये वाढ उत्तेजक व वाढ निरोधक संजीवक यांचे प्रमाण दरवर्षी सुयोग्य राहते. त्यामुळे या जातींना दरवर्षी मोहोर येतो.
मात्र, हापूस सारख्या काही जातीमध्ये हा समतोल साधला जात नाही.आंब्याला मोहोर येण्याच्या वर्षी व येण्याच्या वेळी ऑक्झिनचे प्रमाण हे मोहोर न आलेल्या वर्षाच्या तुलनेत बऱ्याच पटीने अधिक असते. जिब्रेलिन संजीवके आंब्याला मोहोर न आलेल्या वर्षी जास्त प्रमाणात राहतात. त्यामुळे आंब्याला मोहोर न येण्यासाठी जिब्रेलिन कारणीभूत आहे असे समजले जाते. आंबा मोहोराच्या वेळी सायटोकायनिन संजीवकाचे प्रमाण हे जास्त राहते ज्यावर्षी आंब्याला मोहोर येत नाही त्यावर्षी सायटोकायनिनचे प्रमाण कमी राहते लिपिड्सचे प्रमाण आंबा मोहोरण्याच्या वेळी जास्त राहते नंतर कमी होते. आंबा मोहोरासाठी वाढ उत्तेजक व वाढ निरोधक यांचे प्रमाण सुयोग्य असावे लागते. वाढ उत्तेजकाचे प्रमाण वाढल्यास झाडाच्या वाढीला उत्तेजक मिळते.
*डाळींब : नवीन लागण झालेल्या झाडांना काठ्यांचा आधार द्या.आंबेबहार धरण्यासाठी पाणी तोडावे.डाळींबावरील रोग व किडीचा बंदोबस्त करावा. बागेमध्ये झाडांखाली पडलेली रोगट, सडलेली फळे गोळा करून नायनाट करावीत डाळींबावरील तेलकट डाग रोगाचा बंदोबस्त करणेसाठी फळांची संपूर्ण काढणी झाल्यास ब्रोमोपोल ५०० पीपीएम फवारावे. झाडाच्या खोडाला निमऑइल+ ब्रोमोपोल ५०० पीपीएम+ कॅप्टन०.५% मुलामा द्यावा पानगळ आणि छाटणी नंतर ब्रोमोपोल ५०० पीपीएम+ कॅप्टन ०.५% फवारावे.
*द्राक्षे : द्राक्षाची वांझ फुट वेळीच काढावी उत्पादन व गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने गर्डलिंग ऑक्टोबर छाटणीनंतर घडात फळधारणा झाल्यावर लगेच करावे गर्डलिंग करण्याअगोदर वेलीवरील सर्व फुटीचे शेंडे खुडण्यास विसरू नये द्राक्षावरील केवडा, करपा, भुरी रोगाचे नियंत्रण करावे. करपा रोगाचे नियंत्रणासाठी ऑक्टोबर छाटणीनंतर बोर्डोमिश्रण ०.२ ते ०.४ टक्के किंवा कार्बेन्डँझिम १०० ग्रँम यापैकी एकाची प्रति १०० लिटर पाण्यातून १० दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या कराव्यात केवडा रोग नियंत्रणासाठी बोर्डोमिश्रण ०.२ ते ०.४ टक्के किंवा मेटँलँक्झील एम.झेड.-७२ २५० ग्रँम यांची १० दिवसांच्या अंतराने प्रति १०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
*पेरू : मृग बहाराच्या फळाची काढणी चालू ठेवावी. ज्याठिकाणी आंबेबहार धरावयाचा असेल त्या बागेचे पाणी तोडावे. ज्या बागेतील पूर्वीच्या हंगामातील फळे संपली आहेत त्या बागा स्वच्छ करून झाडांना व्यवस्थीत आकार द्यावा. पेरूवरील फळकुजवा देवी रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपिकोनाझोल ५०० ग्रँम किंवा कार्बेन्डँझिम ५०० ग्रँम किंवा मँन्कोझेब १२५० ग्रँम यांची ५०० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.
*बोर : फळ पोखरणा-या अळीच्या बंदोबस्तासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भुरीरोगाच्या बंदोबस्तासाठी बुरशीनाशकाच्या ८-१० दिवसाचे अंतराने २-३ फवारण्या कराव्यात.
*अंजीर : अंजिरावरील तांबेरा रोग नियंत्रणासाठी क्लोरोथँलोनिल १००० ग्रँम प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून दर १५ दिवसांचे अंतराने फवारावे. तुडतुडे व खवले किडीच्या नियंत्रणासाठी वरील औषधात डायमेथोएट ३० इ.सी. ५०० मि.ली. फवारावे.
*लिंबू : हस्तबहार धरला असल्यास राहिलेला नत्राचा अर्धा हप्ता प्रतिझाड ४०० ग्रँम द्यावा लिंबावरील किड व खै-या रोगाचे नियंत्रणासाठी ५०० लिटर पाण्यात मोनोक्रोटोफॉस ३६ डब्ल्यू.एस. ७०० मि.ली. अथवा डायमेथोएट ३० इ.सी.८२५ मि.ली. अथवा मँलेथिऑन ५० इ.सी. ७०० मि.ली. + स्ट्रीप्टोमायसीन ५० ग्रँम व मॅनकोझेब एकत्र मिसळून फवारावे. आवश्यकतेनुसार १५-१५ दिवसांच्या अंतराने ४ फवारण्या कराव्यात._ *जनावरांची काळजी अशी घ्या*
खरीपातील काढणी केलेल्या चा-याची व्यवस्थीत साठवणूक करा.
सुबाभळमध्ये मायमोसीन व इतर सर्व झाडपाल्यामध्ये टँनिन हे अपायकारक पदार्थ आहेत. प्रमाणापेक्षा जास्त झाडपाला खाऊ घातल्यास जनानरांच्या शरीरात अपायकारक पदार्थाचे प्रमाण वाढते, सुबाभळीचा पाला जास्त खाऊ घातल्यास जनावरांच्या अंगावरील केस गळून पडतात. यामुळे दिवसभरात खाऊ घातलेल्या चा-यात सुबाभळीच्या चा-याचे प्रमाण १/३ पेक्षा कमी ठेवा त्यामुळे कोणताहि उपाय होत नाही.
रब्बी हंगामातील ओट या चारा पिकाची ३० सें.मी. अंतरावर पेरणी करा. पेरणीसाठी १०० कि.ग्रँ. प्रती हेक्टर बी वापरावे व पेरणीच्यावेळी हेक्टरी १०० कि.ग्रँ. व ५० कि.ग्रँ. स्फुरद द्यावे ओट पिकाच्या केंट, आर.ओ.१९ किंवा फुले हरीता या वाणांचा वापर करा. तसेच मका या चारापिकाची ३० सें.मी. अंतरावर पेरणी करा. पेरणीसाठी हेक्टरी ७५ कि.ग्रँ. बी वापरा पेरणीच्यावेळी हेक्टरी १०० की.ग्रँ. नत्र ५० कि.ग्रँ. पालाश द्यावे. मका चारा पिकासाठी ऑफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझीट, गंगा सफेद-२ या वाणांचा वापर करा. लसूण घास, बरसीम या चारा पिकांची ३० सें.मी. अंतरावर पेरणी करा. पेरणीसाठी हेक्टरी २५ कि.ग्रँ. बी वापरा, लसूण घासास पेरणीचेवेळी हेक्टरी १५ कि.ग्रँ. नत्र, १५० कि.ग्रँ. स्फुरद व ४० कि.ग्रँ. पालाश द्या तर बरसीम पिकास पेरणीचेवेळी १५ कि.ग्रँ. नत्र, ९० कि.ग्रँ. स्फुरद ३० कि.ग्रँ. पालाश द्या. लसूण घासाचे आर.एल. ८८, सिरसा-९, आनंद-२, आनंद-३ हे वाण पेरावेत तसेंच बरसीम या चारा पिकाच्या वरदान-४, जे.बी.-१, मेस्काबी या वाणांची लागवड करावी.
हिवाळा हा निरोगी ऋतू समजला जातो. जनावरांचे, पक्ष्यांचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगला फायदा मिळतो.
पशुखाद्यामध्ये अधिक ऊर्जा निर्माण करणाऱ्या पदार्थांचा (उदा. ज्वारी, गहू, मका यांचा भरडा इत्यादी) वापर करावा._
_पैदाशीकरिता वापरण्यात येणाऱ्या वळूंना योग्य आहार व्यायाम द्यावा आहारात भरडधान्य, शेंगदाणा पेंड, खनिज, क्षारमिश्रण व वाळलेला चारा यांचा समावेश करावा.
जनावरांच्या वापरासाठी जास्त थंड पाण्याचा वापर टाळावा. यासाठी हौदात साठविलेल्या पाण्यापेक्षा विहीर अथवा बोअरच्या ताज्या पाण्याचा वापर करावा. ते पाणी साठविलेल्या पाण्याच्या तुलनेत कमी थंड असते.
रात्रीच्यावेळी जनावरांस योग्य निवाऱ्याची व्यवस्था करावी. जनावरे बांधतात ती जागा कोरडी असावी. त्याठिकाणी शेण, मूत्र साठून दलदल होणार नाही याची काळजी घ्यावी.
जनावरांच्या गोठ्यात कोंबड्याच्या शेडमध्ये येणाऱ्या थंड वाऱ्याला अटकाव करण्यासाठी सर्व बाजूने बारदाना लावावा किंवा इतर प्रतिबंधक उपाययोजना करावी. गोठ्याभोवती हिरवे कुंपण नियोजनपूर्वक वाढविणे फायदेशीर ठरते. गोठ्याचे नवीन बांधकाम करताना थंड वाऱ्याच्या प्रवाहाचा योग्य विचार करावा
एका महिन्यापर्यंतच्या वासरांची विशेष काळजी घ्यावी लहान वासरे, गाभण गाईंच्या बसण्याच्या ठिकाणी भुश्याच्या आच्छादनाचा वापर करावा. गाभण जनावरांची वेगळी व्यवस्था अधिक उबदार ठिकाणी करावी. जेणेकरून त्यावर लक्ष ठेवणे शक्य होईल.
जनावरांच्या गोठ्यात सिमेंटचा कोबा असल्यास खबरदारी महत्त्वाची आहे, कारण असा कोबा तुलनेने अधिक थंड असतो. याशिवाय थंडीचा जोर अधिक असणाऱ्या कालावधीमध्ये उष्णतानिर्मितीसाठी शेकोटी, विद्युत बल्बचा वापर करावा
दूध काढतेवेळी कास धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. जनावरांना सतत धुण्यापेक्षा केवळ खरारा करण्यास प्राधान्य द्यावे. शक्य असल्यास जनावर धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा पहाटेच्या वेळी जनावरांचे निरीक्षण काळजीपूर्वक करावे.
थंडीमुळे जनावरांच्या आरोग्यास अपाय नसला तरी व्यवस्थापनाच्या दृष्टीने जनावरे रात्री व पहाटे गोठ्यातच ठेवावीत.
जनावरांची क्षय, बुळकांडी, सांसर्गिक गर्भपात विषयक तपासणी करून घ्यावी पावसाळ्यातील अस्वच्छ पाण्यामुळे पोटात झालेले परजीवी कमी करण्यासाठी जंतनाशक औषधांची मात्रा जनावरांना हिवाळ्याच्या सुरवातीसच द्यावी._
_चांगल्या आरोग्यामुळेच जनावरांच्या प्रजननाची क्रिया हिवाळ्यात सुरू राहते. या ३ ते ४ महिन्यांत प्रत्येक जनावराची प्रजनन प्रक्रिया सुरू आहे किंवा नाही याबाबत पशुपालकांनी जागरूकता ठेवावी. जनावर माजावर येणे ही प्रजननाची पहिली पायरी असल्यामुळे आपली जनावरे माजावर येतात का याकडे लक्ष द्यावे. जनावरांकडे लक्ष ठेवूनही त्यांचा माज लक्षात न आल्यास अशा जनावरांची पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी.
जनावरांचा माज ओळखण्यासाठी सकाळी जनावरे गोठ्यात उभी राहण्यापूर्वी, तर सायंकाळी गोठ्यात परतलेली जनावरे बसल्यानंतर बळस, सोट टाकतात काय याचे निरीक्षण दररोज करावे. माजावर आलेली जनावरे लक्षात आल्यास त्यांना योग्यवेळी कृत्रिम रेतन करून घेणे शक्य होते. सकाळी माजावर येणाऱ्या जनावरांकरिता संध्याकाळी कृत्रिम रेतन करावे संध्याकाळी माज दाखविणाऱ्या जनावरांना दुसऱ्या दिवशी सकाळी कृत्रिम रेतन करावे.
हिवाळ्यात जनावरे गाभण राहिल्यास अशा पोषक वातावरणामुळे गाभणकाळ सुलभरीत्या पार पडतो, गर्भाची वाढ झपाट्याने होते. गाभण जनावरांचे आरोग्यही हिवाळ्यात टिकून राहते. पावसाळ्याच्या सुरवातीस गाभण राहिलेल्या कालवडी, गाई, तर पावसाळा संपताना गाभण राहिलेल्या शेळ्या, मेंढ्या हिवाळ्यात अधिक प्रमाणात गाभण काळ पूर्ण करतात.
नवजात वासरांचे थंडीपासून संरक्षण करावे लहान वासरे, वगारी, रेडे हिवाळ्यात थंडी सहन न करू शकल्यामुळे मृत्युमुखी पडतात. दुधाळ जनावराकडे बारीक लक्ष, मात्र वासराकडे दुर्लक्ष केल्यामुळे असा अपघात घडतो. याचा परिणाम पान्हा चोरणे म्हणजे दूध कमी मिळणे अशा आर्थिक बाबीवर होतो.
हिवाळ्याच्या पोषक वातावरणाचा फायदा जनावरांच्या प्रजननाच्या दृष्टीने पुरेपूर घेण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी व्यायलेल्या गाई, म्हशीसुद्धा या काळात माजावर येऊन गाभण राहतील याकडे लक्ष द्यावे.
कोंबड्यांच्या व्यवस्थापनाचीही या काळात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. याकरिता कोंबड्याच्या खाद्यात अधिक ऊर्जेचा पुरवठा करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढवावे.
★कोंबड्यांच्या पिल्लांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही. तापमान नियंत्रित करण्यासाठी पिलांना अतिरिक्त उष्णतेची आवश्यकता असते. दर आठवड्याला खालीलप्रमाणे पिलांच्या शरीराचे तापमान राहील याची व्यवस्था करावी.