रझाकाराला नडणारे गणपतराव देशमुख
मराठवाडा मुक्तिसंग्रामदिन विशेष
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना विविध मार्गाने सशस्त्र लढा दिल्यानंतर निजामाने शरणागती पत्करली आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान व मराठवाडा निजामी जोखडातून मुक्त झाला. स्वातंत्र्याचा खरा आनंद या दिवशी अनुभवला.
या लढ्यामध्ये अनेकांनी लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन, काहींनी भूमिगत राहून मुक्तीसंग्रामात योगदान दिले. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातल्या काटी गावचे हुतात्मा गणपतराव देशमुख यांचे योगदान मोलाचे आहे. देशमुखी असल्यामुळे सुखात राहू शकणार्या गणपतरावांना निजाम राजवटीतील अत्याचार पाहवत नव्हते.
रझाकारांचा हैदोस आणि सामान्य जनतेची, आबालवृद्धांची, महिलाभगिनींची होणारी छळवणूक त्यांना अस्वस्थ करत होती. याच दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशप्रेमाने पछाडलेल्या गणपतराव देशमुखांनी या मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात हिरिरीने भाग घेऊन सोलापूर जिल्ह्यातील देगाव गाठले. त्या गावी पाटलाच्या वाड्यात स्वातंत्र्यदिन साजरा केला.
त्यांच्या विचारांच्या प्रभावाने काटीतील बाबुराव साळुंके, हिराचंद विभुते, जनार्दन यशवंतराव पाटील देगाव, सोपान मारुती भोसले धामणगाव, दत्तु कृष्णात जाधव धामणगाव, चंद्रकांत तात्यासाहेब जाधव धामणगाव, किसन निवृत्ती भोसले राळेरास, आदी तरुणांना त्यांनी हैद्राबाद मुक्तीसंग्रामध्ये भाग घेण्यासाठी मार्गदर्शन आणि भूमिगत क्रांतिकारकांना रसद पुरविण्याचे काम सुरू ठेवले.
आता पाचवीपासून विद्यार्थ्यांना शेतीचे धडे : कृषीमंत्री अब्दुल सत्तार
काटी भागातील लेवी गणपतराव देशमुख यांच्या ताब्यात होती.त्या लेवीचा उपयोग गणपतराव देशमुखांनी उपाशी पोटी असलेल्या जनतेला वाटण्यासाठी केला. ज्वारी अंबार खुले केले व गोरगरीब जनतेची उपासमार थांबवण्यासाठी मदत केली. याचाही राग निजामाला होता. या सर्व गोष्टींचा परिणाम रझाकारांवर झाला व त्यांनी गणपतराव देशमुखांचा काटा काढण्याचे ठरविले.
1948 ला निजामाने अध्यादेश काढून सर्वाची हत्यारे पोलीस स्टेशनला जमा करून घेतली. त्यावेळी फक्त रझाकाराकडे हत्यारे होती. यामुळे ग्रामरक्षक दलाच्या बैठकीत ठराव घेऊन हिंदूनाही हत्यारे बाळगण्यासाठीचा ठराव मांडण्यात आला. त्यामुळे रझाकार गणपतराव देशमुख यांचेवर चिडून होते.
परंतु त्याकाळात देशप्रेमी मुस्लिमांनी धोका ओळखून त्यांना गाव सोडण्यास सांगितले. परंतु गावकर्यांना सोडून जाण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. अशा कडव्या स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्या स्वातंत्र्य सैनिकाचा रजाकारानी घराच्या अंगणात झोपलेल्या अवस्थेत 5 मे 1948 च्या रात्री त्यांची हत्या केली.
दरम्यान, मातोळ्याचे क्रांतिकारक दत्तोबा भोसले यांना गणपतरावांचा घातपात होण्याची शक्यता असल्याची कल्पना देण्यात आलेली होती. दत्तोबा भोसले स्वतः मातोळ्याहून आपसिंगा मार्गे रझाकारांना गुंगारा देऊन काटीपर्यंत पोहचले होते. परंतु त्यांना येण्यास थोडा उशीर झाला आणि तोपर्यंत रझाकारांनी घात केल्याची आठवण गणपराव यांचे पुत्र जयसिंगराव देशमुख हे आवर्जुन सांगतात.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिकांची स्मारके बॅ. ए. आर. अंतुलेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उभारली गेली. याच धर्तीवर काटीचे सुपुत्र हुतात्मा कै. गणपतराव देशमुख यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी येथील ग्रामस्थाची मागणी आहे. मुक्तिसंग्राम लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ही मागणी पूर्ण व्हावी ही अपेक्षा.
लेखक
प्रमोद पाटील
ग्रंथालय निरीक्षक सोलापूर
पाहा खास व्हिडिओ