म्हैसूर दसरा संस्कृती जगप्रसिद्ध : डॉ. सुरेश हनगंडी
पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भाषा व वाडमय संकुलातील कन्नड विभागातर्फे व्याख्यान
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : म्हैसूर दसरा हा सर्वत्र जगप्रसिद्ध आहे. हा सांस्कृतिक उत्सव कन्नड संस्कृतीच्या भूतकाळाच्या वैभवाची आठवण करून देतो. हा महोत्सव आजच्या तरुणांना संस्कृतीविषयी माहिती करून देणारा आणि दिशादर्शक आहे, असे डॉ. सुरेश हनगंडी म्हणाले.
ते पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भाषा व वाडमय संकुलातील कन्नड विभागाने आयोजित केलेल्या नाड हब्ब दसरा उत्सवानिमित्त निमित्त विशेष व्याख्यानमालेत बोलत होते. संस्कृती ही आपली अस्मिता असते. या उत्सवातून आपुलकी, जिव्हाळा, प्रेम आणि बंधुभाव जपला जातो असे सांगून त्यांनी कन्नड संस्कृतीचे महत्व अधोरेखित केले. कन्नड संस्कृतीच्या पुरातनतेविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, प्रथम कदंब वंश राजाने कन्नड भाषेला राजभाषाची अधिकृत मान्यता दिली. तत्कालीन कन्नडवर राज्य करणाऱ्या सर्व राजवंशांनी कला आणि साहित्यिक संस्कृतीला चालना दिली. भारतीय संस्कृतीत कन्नड संस्कृतीचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजवंशांनी संस्कृतीस चालना दिली आणि विविध रुढी परंपरा, विधिना स्थान दिले. हा संपूर्ण उत्सव सर्वसामान्य नागरिकांसाठी एक प्रकारे मेजवानी असते. त्यामुळे नागरिकांमध्ये संस्कृतीचे महत्त्व रुजले जाते. प्रथम नाड हब्ब म्हणून विजयनगरच्या राज्यकर्त्यांनी हा दसरा उत्सव साजरा केला. हा उत्सव म्हैसूरच्या राजांने पुढे नेला.
अध्यक्षीय भाषणात भाषा आणि वाडमय संकुलाचे संचालक डॉ. पी.एन. कोळेकर सर यांनी कन्नड-मराठी भाषेचा संबंध खूप प्राचीन असल्याचे सांगितले. तसेच कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये अनुवाद आणि संशोधन केले पाहिजे, अशी सूचना त्यांनी विद्यार्थांना केली.
कार्यक्रमास भाषा व वाडमय संकुलातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक कन्नड विभागाचे प्रा. शिवानंद तडवळ यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार डॉ. गौरम्मा एळगंडी यांनी केले. कार्यक्रमासाठी तांत्रिक साह्य प्रा. देवळे डॉ. लेंडवे यांनी केले.