मौसम मस्ताना, गरज नसताना!
जिल्ह्यात अवकाळी आकाड; पिकांचे अतोनात नुकसान
सांगोला / नाना हालंगडे
ऋतुमानाचे चक्र पुरते बदलून गेले असून, ऐन हिवाळ्यात पाऊस कोसळत असल्याने बळीराजा पुरता हैराण झाला आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, हातातोंडाला आलेला घास हिरावला गेला आहे. या अवकाळी मुळे अवकाळी आकाड अन् बळीराजाची आकाडी झाली आहे.
गतवर्षापासून कोरोना संसर्ग वाढला अन् तसा पाऊसही वाढलेला आहे. त्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडलेला आहे. सांगोला तालुक्यात गेली दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून, आता हिवाळ्यातही हा पाऊस आक्रमक झालेला पहावयास मिळत आहे. आधीच कोरोना महामारीमुळे बळीराजा हैराण झाला आहे. खरीप हंगाम बऱ्यापैकी साधला. पण त्या मालाला दर नसल्याने त्याचे कंबरडे मोडले.
त्यानंतर मे 2021 पासून जी पाऊसाला सुरुवात झाली ते आत्तापर्यंत खंडतेने पाऊस पडीत आहे. जूनच्या पाऊसानंतर रब्बीच्या पेरण्या झाल्या. त्यानंतर हंगाम बऱ्यापैकी साधला. पण सतत अवकाळी पाऊस येत असल्याने या रब्बी पिकांवर, फळबागावर याचा मोठा विपरीत परिणाम झालेला आहे. रब्बितील पिके चांगली साधली आहेत. आता या पाऊसाने ती भुईसपाट झालेली आहेत. फळबागांनाही मोठा फटका बसलेला आहे.
मागील पंधरा दिवसापासून हा अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान यामुळे रब्बीवर मोठा विपरीत परिणाम झालेला आहे. बुधवार मध्यरात्रीपासून हा पाऊस सांगोला तालुक्यात सर्वदूर कोसळत असून, बळीराजाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान यामुळे झाले आहे.
सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. पण काही केल्या थंडी पडलेली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिके ही यावर्षी येवू शकत नाहीत. गेली 7 महिन्यापासून खंडतेने हा पाऊस सुरूच आहे. आज गुरुवार पहाटे पासून तर या पाऊसाने हाहाकार माजविला आहे. तालुक्यात या सर्वदूर पाऊसामुळे मोठे नुकसान ही झाले आहे. मोसम मस्ताना गरज नसताना हा बेभानपणे कोसळत आहे.
ज्वारीची पिके भूईसपाट
सांगोला तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र 38 हजारच्या पुढे असून, काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके भूईसपाट झाली आहेत.
कोळे व परिसरात कालपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डाळिंब, द्राक्षे व ज्वारीचे नुकसान झाले आहे. या सर्वांचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत. – सीताराम सरगर (पंचायत समिती सदस्य, कोळे)