माडग्याळी बोरांना हवाय राजाश्रय
देशी बोरेही तोऱ्यात; बाजारपेठेअभावी नुकसान
![](https://thinktanklive.in/wp-content/uploads/2022/12/agrowon_import_news-story_cover-images_2Madgyal_20ber-780x420.jpg)
स्पेशल स्टोरी/ नाना हालंगडे
दुष्काळी भागातील शेतकर्यांना बोरांची शेती वरदान ठरत आहे. थंडीच्या दिवसात हमखास दिसणारे हे फळ आहे. सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यात माडग्याळी तसेच ॲपल बोर मोठ्या प्रमाणात पिकते. मात्र त्याला चांगल्या बाजारपेठ आणि सरकारी पाठबळ नसल्याने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होत आहे.
रामायणात बोरांचा संदर्भ आलाच आहे. पौष्टिकतेत बोर सफरचंदापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. ‘क’ जीवनसत्त्वाच्या बाबतीत आवळा, पेरू यानंतर बोरांचाच क्रम लागतो. त्यात कॅल्शियम, फाॅस्फरस, लोह हे धातूही अधिक प्रमाणात आढळतात.
सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यात माडग्याळी तसेच ॲपल बोर तसेच माढा तालुक्यातील मोडनिंब परिसरातील अरण, ढेकळेवाडी बैरागवाडी, सोलंकरवाडी, तुळशी, मोडनिंब, आष्टी, पळसाळी, सिद्धेवाडी, तेलंगवाडी, शेटफळ आदी गावांत ६०० ते ८०० एकरांवर बोरांची शेती केली जाते. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या एकट्या ढेकळेवाडी बैरागवाडी गावात सुमारे ४०० एकरांवर बोरांची शेती आहे, म्हणून हे गाव बोरांचे गाव म्हणून प्रसिद्ध पावत आहे.
३०-३५ वर्षापूर्वी गावातील आबासाहेब नरवडे आणि बाळासाहेब ढेकळे यांनी गावात प्रथम बोरांची बाग लावली. कमी पाण्यात व कमी श्रमात त्यांना बोरांपासून समाधानकारक उत्पन्न मिळाले. तेव्हापासून या गावातील शेतकरी बोर शेतीकडे वळले.
सध्या सर्वच बाजारात ही बोरे पहावयास मिळत असून,थंडीत बोरांचा हंगाम जोमाने पहावयास मिळत आहे.बोरांची लागवड साधारणतः मान्सूनच्या प्रारंभी केली जाते. साधारणतः ६ ते ८ फूट अंतरावर प्रत्येक झाडांची रोपे लावली जातात आष्टी उपसा जलसिंचनाच्या व शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. काही शेतकर्यांनी विहीर खोदली आहे तर काहींनी बोअरवेल घेतली आहे.
बोरीची लावणी, छाटणी, कलम करणे, काढणी अशा स्वरूपात वर्षभर काम चालते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील ३००-४०० शेतमजुरांना गावात कायमस्वरूपी रोजगार मिळतोय. संपूर्ण गावाचे अर्थकारण बोर पिकाशी निगडित आहे, त्यामुळे गावातून रोजगारांसाठी कोणी स्थलांतर करत नाही, वर्षभरात फळ काढणीस येते, त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये बोरे विक्रीस येतात.
चोख व्यवस्थापन व शेणखतांचा योग्य वापर केल्यामुळे गावातील बहुतांश शेतकरी प्रतिझाडापासून २ ते ३ क्विंटल उत्पन्न घेतात, बोरांना बाजारात सरासरी ५ ते २० रूपये किलो दर मिळतो. त्यामुळे बोर पिकांतून मिळालेल्या उत्पन्नातून बहुतांश शेतकर्यांनी शेतातच टोलेजंग घरे बांधली आहेत.
बोरांचा हंगाम ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान असतो मकर संक्रांतीच्या सणासाठी बोरांना मोठी मागणी असते, माढा तालुक्यातील कुर्डुवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारा मोडनिंब उपबाजार हा उमराण, चमेली, बोरांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात हंगामात दररोज सरासरी १० ते १२ हजार गोणी बोरांची आवक होत असते. या बाजारातूनच दिल्ली, इंदोर, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, नागपूर, जयपूर, कोलकोता,चेन्नई आदी ठिकाणी बोरे पाठविली जातात. या ठिकाणांवरून बोरे खरेदीसाठी व्यापारी मोडनिंब बाजारात येत असतात.
मोडनिंब बाजारात दर वर्षी कोट्यावधी रूपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे बोरांची मुख्य बाजारपेठ म्हणून मोडनिंबची ओळख बनत आहे, प्रदेशानुसार बोरांची विविधता आढळते गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत बोरांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. उमराण, बनारसी, चमेली, अहमदाबादी, चेकमेट, चन्या मन्या, बकुळा, ॲपल अशी बोरांची काही वाण प्रसिद्ध आहेत. आपल्या राज्यात जळगावची मेहरूण बोरे, पुण्याची बाणेरी बोरे, सोलापूर मोडनिंबची उमराण बोरे, माडग्याळी बोर अहमदनगरची बकुळा ही बोरे लोकप्रिय आहेत.
सोलापूर,अहमदनगर,धुळे, बुलढाणा, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील कोरडवाहू क्षेत्रात हलक्या, मुरमाड, जमिनीत मोठ्या प्रमाणात बोरांची शेती पाहायला मिळते.सध्या ॲपल सारख्या बोरांची नवी जात विकसित झाली आहे. सफरचंदाच्या आकारासारखे हे फळ आहे. परिणामी उमराण, चमेली, बोरांना याचा मोठा फटका बसत आहे. स्थानिक बाजारात बोरांना योग्य दर मिळत नसल्याची खंत एकीकडे शेतकरी व्यक्त करीत असतानाच दुसरीकडे बदलते हवामान,भुरी रोग यांमुळे शेतकर्यांसी बोराच्या बागा कमी केल्या आहेत.
बोरापासून जॅम, कँडी, सुकविलेली बोरे, सरबत, पावडर, बिस्किट इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी व ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचे आर्थिक उत्पन्न निर्माण करण्याची संधी या परिसरात निर्माण झाली आहे.त्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे हे मात्र तितकेच खरे.