महेश मांजरेकरचे कार्यक्रम उधळून लावू
बापूसाहेब ठोकळे यांचा खणखणीत इशारा

सांगोला/नाना हालंगडे
महेश मांजरेकर यांनी कलाकारांचा घोर अपमान केला आहे. त्यांना ललित भाषा येत असेल तर आम्ही दलित भाषेत उत्तर देवू. त्यांनी तातडीने माफी मागावी अन्यथा त्यांचे टिव्हीसह इतर ठिकाणचे कार्यक्रम उधळून लावू असा इशारा बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी सांगोला येथे दिला.
सांगोला येथे बुधवारी बँड बँजो, गोंधळी तसेच विविध कला प्रकारातील कलाकारांनी एकजूट दाखवत तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी ठोकळे बोलत होते.
यावेळी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, सुप्रसिध्द शाहीर सुभाष गोरे, बहुजन नेते बाबासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे, गिरिधर इंगोले, संघर्ष बँजोचे सुशीलकुमार मागाडे, बिरुदेव केंगार, इरफान फारुखी, हमीद शेख, लारसन ठोकळे आदी उपस्थित होते.
सांगोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या आंदोलनास सुरुवात करण्यात आली. विविध वाद्ये वाजवत कलाकारांनी तहसीलदार कार्यालय गाठले. तेथे भाषणे झाली.
बापूसाहेब ठोकळे म्हणाले की, बँड, बँजो कलाकार हे अनंत अडचणींचा सामना करीत आपली कला जिवंत ठेवत आहेत. या कलाकारांची समाजासोबत नाळ जोडलेली आहे. कोणतेही शुभकार्य, मिरवणुकांमध्ये हे कलाकार आपली सेवा देत असतात. असे असताना कोणतेही कारण नसताना महेश मांजरेकर यांनी त्यांच्या वेब सिरीजमध्ये या कलाकारांचा घोर अपमान केला आहे. ही व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. मांजरेकर यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कलाकार पेटून उठले आहेत. मांजरेकर यांनी कलाकारांची बिनशर्त माफी मागावी. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत.
नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेब सिरीजमधील मांजरेकरच्या वादग्रस्त विधानामुळे कलाकारांबाबत महेश मांजरेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील बँन्ड कलाकार कमालीचा नाराज झालेला आहे. आम्ही कलाकार मंडळी स्वाभिमानी बाण्याचे आहोत. आम्ही “कुणाच्या ध्यात ना मध्यात”. आम्हाला आमचे काम भले आणि आम्ही, घेतलेल्या ऑर्डरप्रमाणे काम (वाजविणे) करणे ही आमची सामाजिक बांधिलकी आहे. असे असताना मांजरेकरला आमच्या कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा व बेताल वक्तव्य करण्याचा अधिकार दिला कोणी?
शाहीर सुभाष गोरे म्हणाले की, अशा प्रकारच्या अवमानकारक, अश्लील संवाद करून सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्यांना वेळीच कठोर शासन झाले तर भविष्यात आम्हा कलाकारांकडे कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही. यासाठी तातडीने मांजरेकरावर गुन्हा दाखल करून वेब सिरीजचे लेखक व दिग्दर्शक रामचंद्र गावकर यांचेवर योग्य ती कार्यवाही होण्याची मागणी करत आहोत. जर सदर महेश मांजरेकर व त्यांचे सहकारी यांचेवर लवकरात लवकर अटकेची कार्य कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल.
यावेळी शहाजी गडहिरे म्हणाले की, उद्यापासून लोकशाही मतदार उत्सव सुरू होत आहे. भारतीय राज्यघटनेने सर्वांना अधिकार दिले आहेत. कलाकारही आपली कला सादर करून समाजाची सेवा करतात. त्यांना कला सादर करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार हिरावून घेण्याचा अधिकार मांजरेकर यांना नाही. त्यांनी कलाकारांची माफी मागावी.
पाहा व्हिडिओ