महावितरणचे 1 लाख कृषी पंपांना कनेक्शन
थिंक टँक / नाना हालंगडे
शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून थांबावे लागत असल्याचा पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी महावितरणने केलेल्या गतिमान कारवाईला यश येत असून चालू आर्थिक वर्षात नवीन कनेक्शन देण्याच्या बाबतीत एक लाखाचा टप्पा नुकताच ओलांडला, अशी माहिती, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.
ते म्हणाले की, महावितरणने १ एप्रिल २०२२ नंतर ३० जानेवारी २०२३ अखेर चालू आर्थिक वर्षात दहा महिन्यात दिलेल्या पेड पेंडिंग जोडण्यांची संख्या १, ०४, ७०९ इतकी झाली. त्यापैकी सुमारे ५४,००० इतकी कनेक्शन महावितरणने केवळ गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत दिली आहेत.
शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करून शुल्क भरल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कनेक्शन मिळण्यासाठी काही वेळ थांबावे लागते. याला पेड पेंडिंगचा प्रश्न म्हणतात. ऊर्जा खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची सूचना महावितरणला दिली होती. महावितरणने गेल्या सहा महिन्यात विशेष नियोजन करून कारवाई सुरू केली आहे.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सुमारे पन्नास हजार कृषी पंपांना वीज कनेक्शन दिली होती. त्यापेक्षा जास्त कनेक्शन नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या तीन महिन्यात देण्यात आली.
महावितरणने पेड पेंडिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या नियोजनानुसार कामाला गती आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ३१ मार्च २०२३ पर्यंत आगामी दोन महिन्यात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी जोडण्या देण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत.