‘भीक’ शब्दावर चंद्रकांत पाटील ठाम
सीएसआर, देणगीला समानार्थी शब्द असल्याचा दावा
थिंक टँक / नाना हालंगडे
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या विधानावरून राज्यात गदारोळ माजला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी माफी मागायला हवी अशीही मागणी केली आहे. मात्र, असे असले तरी चंद्रकांत पाटील हे आपल्या शब्दांवर ठाम असल्याचे दिसून येत आहेत. भिक्षा किंवा भिक हा अपमानजनक शब्द नाही. भीक म्हणजे सध्याचा सीएसआर, देणगीला समानार्थी शब्द असल्याचे ठाम मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी शाळा उभ्या केल्या तेव्हा त्यांना भीक मागितली असं विधान केलं आहे. या विधानानंतर याचे पडसाद तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.
चंद्रकांत पाटील हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “मी महापुरुषांबद्दल आदरच व्यक्त केला आहे. त्या शाळा सुरू करताना त्यांनी सरकारकडे अनुदान मागितलं नाही, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. आता भीक म्हणजे काय, आत्ताच्या भाषेत सीएसआर, वर्गणी किंवा देणगी म्हणू.”
“आपण साधारणतः म्हणतो की, दारोदार भीक मागीतली आणि संस्था वाढवली. संत विद्यापीठ सुरू करण्यासाठी सरकाच्या मदतीवर कशाला अवलंबून राहता? समाजामध्ये देणारे लोकं खूप आहेत, हे सांगताना मी वाक्य जोडलं की, शाळा कोणी सुरू केल्या बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या. तेव्हा दहा रुपये सुध्दा लोकं द्यायचे. त्यावर त्यांनी संस्था चालवल्या. या प्रत्येक गोष्टीला शेंडा-बुड नाही म्हणून वाद निर्माण करायचं चाललंय जे कोणी ही क्लीप पाहतात ते या लोकांचं काय चाललंय असं म्हणतात”, असे चंद्रकांत पाटील असे म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांना याच मुद्द्यावर पत्रकारांनी छेडले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, अरे बाबा मधुकरी मागून शिकलो म्हणजे काय? भीक मागून शिकलो. लोकांकडे हात पसरून मी शाळा चालवल्या, धान्य गोळा करायचे भाऊराव पाटील. मी त्या भागातला आहे, माहिती नसेल तर कर्मवीर भाऊराव पाटील वाचा असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे घरोघर धान्य मागायचे त्याला देणगी मागत होते असं म्हणू. हा प्रचलित शब्द आहे की भीक मागून मी माझी संस्था वाढवली यात काय चुक आहे, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
शिवसेना आक्रमक
शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. ज्या पुण्यात तुम्ही भीक मागून निवडून आला त्याच पुण्यात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शाळा भीक मागून सुरू केल्या असे म्हणताना तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही महापुरुषांचा अपमान केला आहे. तुम्ही जिथे दिसाल तिथे शिवसैनिक तुमच्या तोंडाला काळे फासतील, असा इशारा दिला आहे.