भारताच्या प्रसिद्ध महिला चित्रकार रीता झुनझुनवाला
एपीजे अब्दुल कलामांनाही पडली होती चित्रांची भूरळ
लेकर पर परिंदो के आसमान में उडना चाहती हूँ |
बनकर बूंदे ओस मे पत्तो पे सोना चाहती हूँ ||
बनकर लहर सागर पर साहिल पर उमड़ना चाहती हूँ ||
महक लिए मैं फूलों की गुलिस्ता बनना चाहती हूँ ||
असे ज्यांचे सार्थ वर्णन करता येईल त्या भारताच्या प्रसिद्ध महिला चित्रकार दिल्लीच्या रीता झुनझुनवाला होय. त्यांचा जन्म कोलकाता येथे झाला. कोलकाता विद्यापीठातून १९७७ साली त्यांनी विज्ञानशाखेत प्रावीण्य मिळविले. विज्ञानशाखेच्या हुशार विद्यार्थिनी असलेल्या रीताजींनी मात्र भावी आयुष्यात चित्रकलेचा मार्ग पत्करला. आपल्या सप्तरंगी कुंचल्यातून त्यांनी गेल्या २५ वर्षांपासून समाजजीवन, भारतीय संस्कृती, बुद्ध जीवनदर्शन आणि थोर महापुरुषांचे विहंगम दर्शन भारतीयांना घडविले आहे. त्यांच्या जीवनावर बुद्ध संस्कृतीचा विलक्षण प्रभाव आहे. बुद्धांच्या जीवनावर त्यांनी जवळपास २५ नेत्रदीपक चित्रे साकारली आहेत. ही त्यांची बुद्ध उपासना स्पृहणीय आहे. ज्यात महाप्रजापती गौतमी उपदेश, राजा बिंबिसार उपदेश, शिष्य राहुल उपदेश, प्राणिमात्रांवर दयाभाव, कमलासनावर विराजमान बुद्धावरील चित्रे फारच विलोभनीय असून ती घराची शोभा वाढविणारी आहेत.
त्या म्हणतात, ‘न भूतो न भविष्यती अशा परम पवित्र सिद्धार्थ गौतमाने सत्ता, संपत्ती, माया, मोह, लोभ, प्रपंचाचा सर्वस्वी त्याग करून कठोर साधना व तपश्चर्येच्या माध्यमातून बुद्धत्व प्राप्त केले.
त्यांच्या प्रत्येक कृतीतून, उक्तीतून मानवी जीवनाला सुख, समाधान अन् शांतीचा संदेश देणारे तत्त्व प्रवाहित होत होते. त्यांच्या अनेकविध भव्य संदेश देणाऱ्या कलाकृतीतून मला शांततामय जीवनाचा मार्ग गवसला. बुद्धाशिवाय महात्मा गांधी नेहरू, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, महाश्वेता देवी, रवींद्रनाथ टागोर, सरदार वल्लभभाई पटेल, एपीजे अब्दुल कलाम, शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर, एमएफ हुसैन आदींची भावपूर्ण रेखाटने त्यांनी साकारली आहेत. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्यांना १९६९ साली ‘सोवियत लॅण्ड नेहरू पुरस्कार’ मिळाला. त्यावेळी त्या इयत्ता आठवीत शिकत होत्या. त्यानंतर त्यांना सोवियत संघातही पाठविण्यात आले. तेव्हापासून त्यांना चित्रकलेचा छंद जडला तो आजतागायत सुरू आहे. या कार्यात पतीसोबतच घरच्या सदस्यांची त्यांना मोलाची साथ आहे. त्या कोणत्याही ऑर्ट कॉलेजात गेल्या नाही.
कोलकाता आर्ट कॉलेजचे प्रोफेसर अशेष मित्रा, चित्रा मजुमदार आणि दिल्ली आर्ट कॉलेजचे प्रोफेसर बिमल दासगुप्ताकडून व्यक्तिगत रूपात त्यांनी कलेचे शिक्षण घेतले. आजपर्यंत १३ ग्रुप शो आणि १४ सोलोचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या पहिला ग्रुप शो १९८० साली ‘अॅकेडमी ऑफ फाईन आर्ट’ कोलकाता येथे झाला होता. तसेच सोलोचा पहिला प्रयोग १९८१ साली ‘त्रिवेणी कला संगम’ नवी दिल्ली येथे झाला. एक्रीलिक रंगासोबत त्या जास्तीत जास्त काम करतात. कधी कधी त्या मिक्स मीडियाचा उपयोग करतात. चारकोलचा वापरही करतात. सौम्य रंगासोबत भडक रंगाचे स्ट्रोक त्यांच्या चित्रात प्राण ओततात. चित्राला जिवंतपणा येतो.
काही कलाकृतींचा वेगळा अंदाज आहे. जसे लाकडापासून तयार केलेल्या पुस्तकाच्या मॉडेलवर स्वामी विवेकानंद आदी महापुरुषांचे चित्र. त्यांची ही कृती पाहताच विशाल ग्रंथच वाटतो. रीताजी म्हणतात , ‘मन कितीही तणावात असो हाती कुंचला येताच तणाव नाहिसा होतो. चित्र रेखाटताना मला जीवनाचा साक्षात्कार होत असल्याची प्रचिती येते.’ भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम त्यांची चित्रकला पाहून फारच प्रभावित झाले. रीताजींच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता. राष्ट्रपती कलाम यांनी राष्ट्रपती भवनासाठी त्यांच्याकडून बुद्ध पेटिंग खरेदी केली. अखिल जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धाचे ते चित्र आजही राष्ट्रपती भवनात डौलाने उभे आहे. सतत दीर्घोद्योगी कला साधनेने त्यांना आजपावेतो अनेक सन्मान, पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘ग्रॅण्ड प्रिक्स इंटरनॅशनल डी पेनच्युअर डी डियुली फ्रान्स (१९८४), ग्रॅण्ड प्रेमियो इंटरनॅशनल डी पीटुरा रोम इटली (१९८५), रोटरी क्लब नवी दिल्ली (१९९७), पेटिंग इनस्टालेशन राष्ट्रपती भवन अब्दुल कलाम (२००४), भिक्खुराम जैन फाउंडेशन अवार्ड (२०१०), संगीत श्यामला अवार्ड (२०१३) आणि अपराजिता अवार्ड (२०१८) प्रमुख आहेत. प्रेमळ, सौजन्यशील), करुणामयी रीता झुनझुनवाला यांच्या भावी उपक्रमाला शुभेच्छा. दीर्घायुष्यासाठी मंगलकामना.