भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सहाजणांवर गुन्हा
सोलापूरच्या एसटी विभाग नियंत्रकांना धमकावले
सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सहाजणांनी सोलापूरच्या एसटी विभाग नियंत्रकांना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात का सहभागी होत नाहीत , म्हणून दमदाटी केली. तर कर्मचाऱ्यांवरील निलंबन मागे घ्या, त्यांना कामावर जाण्याची सक्ती करू नका असे म्हणून त्यांना कार्यालयातून बाहेर जाण्यास अडथळा आणल्याप्रकरणी विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत देशमुख हे विविध आंदोलने व वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. पुरुषोत्तम बरडे यांच्यासोबतही त्यांचा काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता.
भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, गणेश भोसले , नितीन करजोळे , गीता पाटोळे , धनश्री खटके , सविता कस्तुरे यांनी सोलापूर विभागाच्या आगार नियंत्रकाच्या कार्यालयात धाव घेतली. मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता त्यांनी कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी, तुम्ही कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी का होत नाही , असा जाब विचारला.
शासनाकडून एसटी महामंडळ बंद ठेवण्यासंदर्भातील सूचना नाहीत. संपामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत असल्याने कर्मचाऱ्यांची समजूत काढली जात असल्याचे त्या सर्वांना सांगितले. तरीही , देशमुख यांनी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घ्या , अन्यथा तुम्ही काम कसे करता हे बघून घेतो , अशी दमदाटी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे .फौजदार चावडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पुढील तपास पोलिस हवालदार पोळ हे करीत आहेत.
चर्चेतील नेते
श्रीकांत देशमुख हे विविध आंदोलने व वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. पुरुषोत्तम बरडे यांच्या सोबतही त्यांचा काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता.