भाई गणपतराव देशमुख यांचे निधन
शेतकरी, कामगार, वंचितांचा आधारवड कोसळला
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : सांगोला तालुक्याचे माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. गणपतराव देशमुख यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर सोलापूरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. पित्ताशयाचे ऑपरेशन करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे सांगोल्यासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने शेतकरी, कामगार, वंचितांचा आधारवड कोसळला आहे.
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय नेते भाई गणपतराव देशमुख ऊर्फ आबासाहेब यांना शुक्रवार, १६/७/२०२१ रोजी सोलापूर येथे अश्विनी हाॅस्पिटल येथे अॅडमीट करण्यात आले होते. तेथे त्यांचे पित्ताशयाचे आॅपरेशन करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर होती. उपचाराला ते प्रतिसादही देत होते. त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भाई गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षातून सांगोला विधानसभा मतदारसंघातून १९६२पासून अनेक दशके निवडून गेले. महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार गणपतराव देशमुख होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी उमेदवारी दाखल न करता त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली होती. डॉ. अनिकेत देशमुख यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला होता.
सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाकडून बाराव्या वेळेस निवडून आले. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी हे देखिल 12 वेळेस विजयी झाले आहेत. २००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते.
अत्यंत साधी राहणी
अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या राजकीय जीवनात उमेदवार उभा केला नव्हता.
१९६२ पासून सांगोल्याचे नेतृत्त्व
देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. कै. आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील व अॅड. शहाजीबापू पाटील यांनीही या मतदारसंघाचे नेतृत्त्व केले आहे. अॅड. शहाजीबापू पाटील हे सध्या सांगोल्याचे विद्यमान आमदार आहेत. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.
बहुतांश काळ विरोधी बाकांवरच
गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.