ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

भाई गणपतराव देशमुख : दुष्काळी भागाचं सोनं करणारं ऋषीतुल्य नेतृत्व

“राजकीय मानदंड” ग्रंथ घडविणार इतिहास

Spread the love

सांगोला/नाना हालंगडे
पंढरपूर पाण्याचं.. मंगळवेढा दाण्याचं आणि सांगोला सोन्याचं अशी एक म्हण पूर्वी महाराष्ट्रात रूढ होती. ही म्हण सांगोल्याच्या बाबतीत खऱ्या अर्थाने सत्यात आणि वास्तवात अधिक ठळकपणे अधोरेखित करण्याचं भाग्य महाराष्ट्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व व राजकारणात ध्रुवतारा असणारे स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांना लाभले. भाई गणपतराव देशमुख यांच्या कार्य कर्तृत्वाचा सखोल वेध घेणारा महाग्रंथ “राजकीय मानदंड : भाई गणपतराव देशमुख” प्रा. डॉ. किसन माने यांनी साकारला आहे. त्याचे प्रकाशन रविवारी सांगोला येथे होत आहे.

स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या जीवन कार्यावरील प्रा. डॉ. किसन माने लिखित “राजकीय मानदंड : भाई गणपतराव देशमुख” या चरित्रग्रंथाचे रविवार, १जानेवारी, 2023 रोजी सकाळी ११.३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह (टाऊन हॉल) सांगोला येथे प्रकाशन समारंभाचे आयोजन केले आहे. सदर प्रकाशन समारंभ श्रीमती रतनबाई (बाईसाहेब) गणपतराव देशमुख यांच्या शुभहस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व पाणीपुरवठामंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे व प्रमुख पाहुणे माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्या उपस्थितीत प्रकाशन समारंभ संपन्न होणार आहे.

सदर प्रकाशन सोहळ्यास सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे -पाटील, महानंदा दूधसंघाचे संचालक चंद्रकांतदादा देशमुख व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष प्रा. पी.सी. झपके सर, शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी, माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने, सांगोल्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रणजीत केळकर, सूतगिरणीचे माजी चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे, ज्येष्ठ साहित्यिक माजी प्राचार्य कृष्णा इंगोले, सूतगिरणीच्या व्हाईस चेअरमन श्रीमती कल्पनाताई शिंगाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, शेकापचे तालुका चिटणीस दादाशेठ बाबर व सूतगिरणीचे संचालक बाळासाहेब बनसोडे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तरी या प्रकाशन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी जि. प. सदस्य प्रा. डॉ. किसन माने यांनी केले आहे.

साधेपणातील मोठेपणा
आज सांगोला सोन्यासाठी प्रसिद्ध नसला तरी सोन्यासारख्या मौल्यवान व कर्तुत्वान व चारित्र्याचा आदर्श असणारे गणपतराव देशमुख यांच्यामुळे सांगोला हा सोन्यासारख्या शुद्ध माणसाचा तालुका म्हणून जागतिक पातळीवर परिचित आहे. स्वार्थी, तत्वहीन आणि गढूळ राजकारणाच्या जमान्यामध्ये अपवाद असणारे व आदराने घ्यावे असे सर्वपक्षीय नाव म्हणजे गणपतराव देशमुख होय. साधेपणा आणि समाजाप्रतीची आढळनिष्ठा या बाबीमुळे त्यांच्या हयातीत आणि पश्चातही त्यांचा आदरानेच उल्लेख करावा लागतो.

देशातील राजकारणी नेतृत्वांना गणपतराव देशमुख यांचे चरित्र आणि चारित्र्य ही आचारसंहिता म्हणून वंदनीय ठरेल. कर्तुत्व नेतृत्व दातृत्व आणि समाजाप्रती असणारे ममतेचे मातृत्व आबासाहेबांनी व्रतस्थ राहून आयुष्यभर निभावले. अनेक वेळा आलेल्या सत्ता आणि मान सन्मानाच्या प्रलोभनांना बळी न पडता जनसामान्यांसाठी शेतकरी, कामगार, शोषित, वंचित आणि दुर्लक्षित लोकांसाठी बांधिलकीची निस्वार्थी नाळ आबासाहेबांनी कधीच तुटू दिली नाही. डोंगरा एवढे प्रचंड कार्य करूनही त्याचे भांडवल त्यांनी कधीच केले नाही. हा साधेपणातील मोठेपणा त्यांनी समाजासमोर आणि नेत्यांसमोर ही वसा आणि वारसा म्हणून ठेवला.

पाचवीला पुजलेला दुष्काळ उशाला घेऊन नव्या हरित उषःकालाची दारिद्र्य मुक्त शेतकऱ्याची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले. वैचारिक, सुसंस्कृत, अभ्यासू आणि तितकेच नीतिमान वर्तन असलेल्या नेतृत्वाची वाणवा असतानाही आबासाहेब त्याला अपवाद ठरले. आम्ही दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काळात मरणार नाही. ही भीष्मप्रतिज्ञा आबासाहेब वारंवार बोलून दाखवत.

ही प्रतिज्ञा खरी करून दाखवण्यासाठी विरोधी पक्षात राहून त्यांनी प्रचंड संघर्ष करून सांगोला तालुक्याला पाणी मिळवून दिले. शिक्षणाशिवाय समाज परिवर्तन होणार नाही. हे मनात फक्के ठरवून तालुक्याच्या शैक्षणिक आलेख उंचावला. त्यामुळे सांगोला तालुक्याची शिक्षण क्षेत्रातील प्रगती ही अधिक उठावदार दिसून येते. सहकारी सूतगिरणी, महिला सूतगिरणी भ्रष्टाचार विरहित चालवून सहकाराचा देशाला आदर्श घालून दाखवला.

बाजार समिती, खरेदी विक्री, संघ दूध संघ व जलसंधारण कामाच्या बाबतीत ही महाराष्ट्र समोर आदर्श निर्माण केला. माणसांच्या सर्वांगीण प्रगती बरोबर तालुक्यातील पशुधनाचे जतन आणि संगोपन त्यांनी दुष्काळात चारा छावण्या काढून केले. ही गोष्ट आबाला विरुद्ध आणि सर्वपक्षीय लोक आजही खुल्या मनाने मान्य करतात. ही वस्तुस्थिती आहे. बाबासाहेबांनी प्रचंड कर्तुत्व गाजवणे ते कायम सूर्यफुला वाणी समाजसन्मुख आणि जमिनीवर पाय ठेवून नम्रच राहिले. साधना, सिद्धी आणि प्रसिद्धी या साधक व तपस्वी लोकांच्या जीवनातील तीन अवस्था व पायऱ्या असतात. गणपतराव देशमुख हे तिन्ही अवस्थातून सिद्ध झालेले व्यक्तिमत्व होते.

राजकारण आणि समाजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या कार्याला जागतिक कीर्तीची किनार लाभली आहे. आजचे स्वार्थी, लहरी आणि गढूळ राजकारण सरड्याप्रमाणे रंग बदलताना दिसते. सर्वसामान्य जनतेचा राजकारण आणि राजकारणावरील विश्वास उडून जाताना दिसतो आहे. अशा काळातही सांगोल्याचे गणपतराव देशमुख हे आदर्श नेतृत्व ची दंतकथा बनवून जनसामान्यांच्या ओठावर कायम आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका