भाईंच्या देवराईत जलशुद्धीकरण प्लांट मंजूर
जि. प. सदस्य ॲड. सचिन देशमुख यांची माहिती
सांगोला/ नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील भाईंच्या देवराईमध्ये जिल्हा परिषद 15 व्या वित्त आयोगामधून दीड लाखाचा जलशुद्धीकरण प्लांट व कोळा गटातील अन्य गावासाठी 10 लाख रूपयाचा निधी मंजूर केला असल्याची माहिती ॲड. देशमुख यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील कोळा जिल्हा परिषद गटामध्ये सदस्य देशमुख यांनी विकासाची गंगोत्रीच राबविली असून आत्ताही 10 लाखाहून अधिक रूपयाची कामे यांनी आणलेली आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेत ते एक अभ्यासू,विकसनशील असे नेतृत्व आहे. जिल्हा नियोजन समितीवरही ते काम करीत असून,मागील 3 महिन्यापूर्वी 15 वित्त आयोगाकडून त्यांनी ही कामे सुचविली होती.
या सूचविलेल्या सर्व प्रशासकीय कामांना आत्ता मंजुरीही मिळालेली आहे. ॲड. देशमुख यांनी सूचविलेल्या 11 विविध कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये विशेषतः डिकसळ येथे तालुक्याचे भाग्यविधाते स्व.भाई डॉ. गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ साकारण्यात आलेल्या भव्यदिव्य देवराई प्रकल्पात दीड लाख रूपयाचा जलशुद्धीकरण प्लांट मंजूर केलेला आहे. ही देवराई ही 10 ऑगस्ट 2021 रोजी साकारण्यात आलेली असून ,अवघ्या पाच महिण्यातच यातील 118 प्रकारची विविध जातीची झाडे,डौलू लागली आहेत.
यामध्ये देवराई,फळबाग व घनवन आधी प्रकारची झाडे आहे. हे सर्व लोकवर्गणीतून साकारण्यात आले असून,सांगोला तालुका धनगर समाज सेवा मंडळाने भव्य अशी स्वागत कमान,अनेकांनी रंगीत बाकडे,विविध प्रकारची खते,कपाटे,टेबल यासह अनेक भेटवस्तू दिलेल्या आहेत. याच देवराईच्या उद्धाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य ॲड. देशमुख यांनी आपण भरीव मदत देणार असल्याचे घोषित केले होते. त्याअनुषंगाने त्यांनी 15 वित्त आयोगातून आपल्या अधिकारातून दीड लाख रूपयाचा पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण प्लांट मंजूर करून घेतला आहे. याला मान्यताही मिळाली असून,येत्या आठ दिवसांत हा प्रकल्प देवराईत उभारण्यात येणार आहे.
याच बरोबर कोळा गटातील कोंबडवाडी येथील सिद्धनाथ मंदिर परिसरात ही आर ओ प्लांट ,यासाठी 2 लाख रूपये व अन्य ठिकाणी विकासकामांना मंजूरी आणलेली आहे.