भटक्या विमुक्तांनी भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे
भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत वंजारे यांचे आवाहन
थिंक टँक न्यूज नेटवर्क
देश गंभीर समस्यांच्या विळख्यात असून देशात धर्मांधता, जातीयता, आर्थिक आणि सामाजिक विषमता,बेरोजगारी, उपासमार आदी प्रश्नांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. परस्परांवरील विश्वास नष्ट झाला असून देशात अराजकाची परिस्थिती आहे. संवैधानिक संस्थांची मोडतोड करण्यात आली असून त्या शेवटच्या घटका मोजत आहेत.
अशा विपरीत परिस्थितीतून देश बाहेर पडला पाहिजे आणि वैविध्यातील एकता पुन: प्रस्थापित व्हावी यासाठी देशातील दोनशे पेक्षा अधिक सामाजिक संघटना एकत्र आल्या असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. ही यात्रा राजकीय नसून सामाजिक आणि सांस्कृतिक आहे त्यामुळे भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष उपराकार लक्ष्मण माने यांच्या सुचनेनुसार विदर्भातील भटक्या विमुक्तांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून भटक्या विमुक्तांचे प्रश्न जैसे थे आहेत. आजही भटके विमुक्त माणुसकीच्या जगण्यापासून पारखे आहेत. पंडित नेहरू, मोरारजी देसाई, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी वेळोवेळी भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांची दखल घेतली होती आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक पावले सुद्धा उचलली होती. पण बदलत्या काळात भटक्या विमुक्तांचे प्रश्न जटिल बनले असून ते देशाच्या मुख्य प्रवाहातील सामाजिक, राजकीय पृष्ठभागावर यावे हा भटक्या विमुक्त जमाती संघटनेचा हेतू आहे.
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून दिनांक १५ नोव्हेंबर रोजी ती वाशीम येथे असणार आहे. यावेळी उपराकार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांची भेट घेण्यात येणार असून भटक्या विमुक्तांच्या वतीने त्यांना समस्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. त्यामुळे भटक्या विमुक्त जमातीच्या हजारो कार्यकर्त्यांनी वाशीम येथे उपस्थित रहावे असे आवाहन प्रशांत वंजारे यांनी केले आहे.
शहाजीबापूंच्या इलाख्यात ठाकरेंचा बॉम्ब, लक्ष्मण हाकेंची पक्ष प्रवक्तेपदी नियुक्ती
“घे चुना.. मळ पुन्हा” गायछाप गुजरातेत गेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही