भगवान महावीर : कालजयी महापुरुष

प्राचार्य सुभाष शास्त्री यांचा विशेष लेख

Spread the love
अहिंसा अर्थात निर्मळ अशा सत्याची साधना आहे. कला, शिल्प, साहित्य, संगीत, धर्मकारण, इतिहास, संस्कृती, पुरातत्व, चिकित्साशास्त्र, राजकारण व समाजकारण इत्यादीच्या निर्माणकार्यात अहिंसेचे मूळात अधिष्ठान असणे गरजेचे आहे. भ. महावीर प्रत्यक्ष हिंसेबरोबर मनातील हिंसक भावनेलाही त्याज्य मानायचे. भ. महावीरांच्या जयंतीनिमित्ताने अहिंसेच्या उदात्त आचरणातून सच्च्या मानवतेला एक उंची देऊया व सांस्कृतिक अमरत्वाच्या दिशेने जाऊयात.

भगवान महावीर जयंती नेहमीप्रमाणे साजरी केली जाईल. मंदिरात स्तुती-स्तवन, पूजा-अनुष्ठान, सांस्कृतिक कार्यक्रमपूर्वक आचरिलीही जाईल. मिरवणुका इत्यादिने महावीरांना आपल्याला समजून घेता येईल का? महत्त्वाचा प्रश्न आहे. अमूल्य अशा महावीरांचे मूल्यांकन अशा आयोजनातून, ग्रंथबद्ध करण्यातून करू शकतो का? मौल्यवान अशा सोन्याद्वारे सत्यच लपविण्याचा हा प्रयत्न नव्हे का? भ. महावीरांना एका विशिष्ठ धर्मापुरते मर्यादित करुन त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे मूल्यांकन करणे चुकीचे ठरेल. भ. महावीरांच्या विचारांचा उलगडा हा मात्र त्यांच्या अहिंसा तत्त्वातून होणार आहे. वैश्विक स्तरावर अहिंसेच्या पृष्ठभूमीतून समस्त मानवजातीला अभय देऊन आश्वस्त करणारे ते कालजयी महापुरुष होते.

अनंत काळापासून जगातील विभिन्न देशांत लोककल्याणाची स्वस्थ निष्काम भावना असणारे अनेक सत्पुरुष होऊन गेले. अशा आदर्श विश्वपुरुषांच्या परंपरेत आपण भ. महावीरांना त्यांनी आचरणपूर्वक प्रतिपादन केलेल्या वैश्विक व सार्वकालिक अशा अहिंसा तत्वाच्या संदर्भात मुख्यत: स्मरतो. भ. महावीरांप्रमाणे अनेक महापुरुषांनी आपल्या सदाचरणातून अहिंसा या मानवतामूलक शब्दाला उदात्तता दिली. मग भगवान गौतम बुद्ध असोत, भ. महावीर असोत, महात्मा गांधी असोत. या महापुरुषांनी “अहिंसा” या शब्दाला मात्र एक भारदस्त अध्यात्मिक व प्रसंगानुरुप मोघमपणे उच्चारण्यात येणारी संकल्पना कधीच मानली नाही तर त्यांनी स्वत:च्या आचरणातून, विचारांतून मानवकल्याणासाठी परम उपयोगी तत्व म्हणून सप्रमाण सिद्ध केले.

आज आपण पाहतो जगातील अनेक देशात साम्राज्यशाहीची भावना तीव्रतेने बळावत चालली आहे. त्यासाठी स्वार्थ, हिंसा, कपट इत्यादीच्या मदतीने कुठल्याही थराला जाण्यास तयार होतात. प्रश्न पडतो की, अशा प्रवृत्तीच्या सहाय्याने हे शक्य आहे का? शक्य झाले तरी ते शाश्वत आहे का? स्वातंत्र्यलढ्यात आपण पाहिलेच आहे की, जहालवृत्ती व अहिंसकवृत्ती यापैकी प्रभावी काय होते ते? भ. महावीरांचे म्हणणे आहे, “माणसाचा मूळ स्वभाव शांततेचा, तटस्थ राहण्याचा आहे. जसा पाण्याचा मूळ गुणधर्म शितलता आहे. कार्यसिद्धीसाठी या मूल स्वभावाशी अभिन्न राहावेच लागते. मूलवृत्ती असलेली अहिंसा ही क्षम, करुणा, प्रेम, शांती, सहिष्णुता इत्यादिनेच समृद्ध होत असते. यातून अहिंसेची उदात्त बाजू समोर येते. अहिंसाभावाची थोडीजरी उपेक्षा झाली तर जगात अनेक अनाहूतं घडतात, हे आपण रोज अनुभवतो.

कोविडच्या या कठिण काळातही रुग्णाच्या सेवेची आपल्या स्वार्थासाठी हेळसांड करणारे, अमानविय कृत्य करणारे, परिस्थितीचा गैरफायदा घेणारे कमी आहेत का? भरकटलेल्या मनाची ही उदाहरणं आहेत. याचबरोबर अत्यंत मनापासून मानव कल्याण, जीवदयेच्या भावनेतून सेवा देणारा वर्ग पाहायला मिळतो.

भ. गौतम बुद्धांनी पदोपदी अहिंसा, करुणा, शांती, कर्तव्य इ. मूल्यांचे आचरणपूर्वक प्रबोधन केले. ख्रिस्त धर्मात क्षमाभावाचे उदात्त स्वरुप हे अहिंसेचेच पोषक आहे. कुराण व शिख तत्वज्ञानातसुद्धा अहिंसेला आचरणात श्रेष्ठ स्थान दिले आहे. न्याय, बंधुता, समतेचा विचार जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला त्यांच्या मुळात अहिंसावृत्तीच आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे.

महात्मा गांधींना “वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीर परायी जाणे रे” ही प्रार्थना अत्यंत प्रिय का होती तर या प्रार्थनेतील समतेची, मानवतेची संवेदना त्यांना महत्त्वाची वाटत होती. असो.

पण दुर्दैव असे आहे की, आज आपले खानपान, राहणीमान, अर्थार्जन, राजकारण, समाजकारण, दैनंदिन व्यवहार, स्वार्थ, हिंसाचार, भ्रष्टाचार इ. अवांछित मनोभावाने व्यापलेले असल्याने समाजात अनिष्ठ व विघातक बाबीच जास्त प्रमाणात दिसून येतात.

अहिंसा अर्थात निर्मळ अशा सत्याची साधना आहे. कला, शिल्प, साहित्य, संगीत, धर्मकारण, इतिहास, संस्कृती, पुरातत्व, चिकित्साशास्त्र, राजकारण व समाजकारण इत्यादीच्या निर्माणकार्यात अहिंसेचे मूळात अधिष्ठान असणे गरजेचे आहे. भ. महावीर प्रत्यक्ष हिंसेबरोबर मनातील हिंसक भावनेलाही त्याज्य मानायचे. भ. महावीरांच्या जयंतीनिमित्ताने अहिंसेच्या उदात्त आचरणातून सच्च्या मानवतेला एक उंची देऊया व सांस्कृतिक अमरत्वाच्या दिशेने जाऊयात.

– प्राचार्य सुभाष शास्त्री, सोलापूर

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका